Friday, June 2, 2017

अशीच शाळेतील आठवण येते

अशीच शाळेतील आठवण येते 

फक्त कॉलेजचेच नाही तर यापेक्षा आपल्या लहानपणीच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचा अभिमान हा जास्त असतो. याचा मी दोन वेळा अनुभव घेतलेला आहे. माझी शाळा रावेर, जिल्हा जळगाव येथील 'सरदार जी. जी. हायस्कूल, रावेर'
१. सुमारे २० वर्षांपूर्वी, माझ्या पक्षकाराच्या कामानिमित्ताने मी 'जिल्हाधिकारी' यांच्याकडे गेलो, ते नसल्याने 'रहिवासी जिल्हाधिकारी' काम पहात होते. त्यांची निवृत्ती जवळ आली होती. ते वेळेच्या बाबतीत अत्यंत कडक होते, निष्कारण व कामाशिवाय इतर विषयाबाबत वेळ न घालविणारे म्हणून प्रसिद्ध ! मी तेथे गेल्यावर कसा कोण जाणे 'सरदार जी. जी. हायस्कूल, रावेर' चा विषय निघाला आणि परिणाम ---- 'त्यांच्या केबीनमध्ये मी सुमारे दीड तास होतो, माझ्या आणि त्यांच्या काळातील सर्व शिक्षकांच्या आठवणी निघाल्या, त्यांचे शिकवणे कसे अजून लक्षात आहे हे सांगून झाले, त्यांची माहिती व सध्याचा ठावठिकाणा विचारून झाले, त्यांच्या वेळच्या विद्यार्थ्यांच्या आठवणी निघाल्या, मला आपुलकीने घरच्यासारखे चहापाणी (जिल्हाधिकारी कार्यालयातील - हे महत्वाचे) झाले आणि गहिवरलेल्या आवाजाने मला 'पुन्हा येत जा, बरे वाटते' म्हणून निरोप दिला.' मी बाहेर आल्यावर ही भलीमोठी गर्दी माझ्याकडे संतापाने पहात होती.
२. साधारणतः ६ वर्षांपूर्वीची घटना, माझ्या मुलीने १२ वी यशस्वीरीत्या पार केली. वेगवेगळ्या 'इंजीनिअरिंग कॉलेज' मध्ये फोन करून माहिती विचारत होती. तेथील कर्मचारी यथाशक्ती माहिती देत होते आणि त्यांचेच कॉलेज किती उत्तम आहे हे पटवून देत होते. तेथील प्राचार्यांशी अथवा संचालकांशी बोलण्याचा तिला तो पर्यंत प्रसंग आला नाही, मात्र प्रत्येकच कॉलेज इतके चांगले हे पाहून ती गोंधळून गेली. तिचे बरेच फोन सुरु होते. अचानक तिचा - 'बाबा, इकडे या, कॉलेजचे प्राचार्य स्वतः बोलत आहेत. त्यांना तुमच्याशीच बोलायचे आहे. हं, घ्या म्हणून फोन दिला.' (आपल्या वडिलांशी आपले कॉलेजचे संबंधाने स्वतः प्राचार्य काय बरे बोलणार असतील आणि त्यांच्याशी बोलण्यासारखे काय असणार ? हे तिला समजेना ) मी फोन घेतला, संभाषण सुरु झाले -
'हं, मी भोकरीकर वकील बोलतोय.' मी म्हणालो.
हे वाक्य जेमतेम पूर्ण झाले न झाले तोच 'काहो, ते रावेरच्या आपल्या 'सरदार जी. जी. हायस्कूल' मध्ये भोकरीकर सर होते ते कोण ?'
मी सांगीतले 'काका !''
'काय पण शिकवायचे ?' त्यांचा उत्साह मला जाणवत होता. 'तुम्ही कुठे शिकले /' त्यांचा मला प्रश्न.
मग मी थोडाच मागे राहणार होतो ? मी दणकून सांगीतले - ''सरदार जी. जी. हायस्कूल, रावेर' !
'तुम्ही असे करा, तुमच्या मुलीला घेवून आज जमेल का ? बरं, ठीक उद्या दुपारी ११ वाजता या, मग बोलू निवांत !'
संभाषण संपले. दुसरे दिवशी मी आणि माझी मुलगी तिच्या आईसह कॉलेजमध्ये गेलो. मी 'व्हिजिटिंग कार्ड' पाठवले, लगेच बोलावल्याचा निरोप मिळाला, आम्ही बसलो, शिपाई आला, त्याला सांगितले गेले 'सध्या मध्ये कोणाला पाठवू नको, मी कामांत आहे.' शिपाई गेला. मग माझ्याशी गप्पा सुरु झाल्या ! त्यांच्या काळातील शिक्षक, दीक्षित सर काय शिकवायचे ? डी. टी. कुलकर्णी सरांचा काय दरारा ? आपले रोडे-बहादरपूरकर सर ! आणि हो एस, आर कुलकर्णी सर म्हणजे नाना, काय पण इंग्रजी ? वानखेडे सर काय, लोहार सर काय ? वां, वा ! आज मी येथे आपल्या शाळेमुळे आहे ! मला समजेना येथे आपण कशासाठी आलो आहे ! पण शाळेसंबंधाने आणि शिक्षकांसंबंधाने त्यांच्या ज्या भावना होत्या त्यापेक्षा मी काही वेगळा नव्हतो ! या सगळ्या आठवणी आणि गप्पांमध्ये अर्धा तास गेला. बाहेर विद्यार्थ्यांचा प्रचंड गोंगाट सुरु होता. मध्यंतरी दोन वेळा शिपाई डोकावून गेला, शेवटी रागरंग पाहून त्याने 'चहाचे' विचारले. 'अरे हो, चहा राहिलाच, आण लवकर !' चहा अत्यंत लवकर आला, जणू याचीच वाट पाहत होता.
शेवटी मी निघतानिघता कसाबसा विषय काढला कारण मला दोन्हीकडून म्हणजे मुलीकडून आणि तिच्या आईकडून ढोसणे सुरु होते 'माझ्या मुलीला इंजिनीअरिंग साठी विचारायचे होते.'
हं, ते काही महत्वाचे नाही, ते होवून जाईल. किती 'परसेंट' आहेत ?' त्यांचे विचारणे.
मुलीने १२ वीच्या परीक्षेतील गुण सांगितले, 'हो हो, नक्की मिळेल, मी बसलोय, काही अडचण येणार नाही.' त्यांचे उत्तर ! आणि आम्ही सर्व बाहेर आलो.
आम्ही बाहेर आल्याबरोबर विद्यार्थ्यांचा हा लोंढा आंत गेला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव येथे पाहता आले नाही.

२७ फेब्रुवारी २०१६

No comments:

Post a Comment