Saturday, June 3, 2017

कानडा राजा पंढरीचा

कानडा राजा पंढरीचा

अलीकडील या संगणकामुळे आणि त्याच्या या महामायाजालामुळे हवे ते संगीत, हव्या त्या वेळी आणि हवे त्याचे ऐकता येते. ज्ञानाची खोली वाढविण्याचे आणि विविध प्रकारचे संगीत सहजपणे ऐकण्याची खूप मोठी सोय, जवळपास नगण्य किंमतीत झालेली आहे.
संगीत हा असा विषय आहे की कोणाचे गाणे, वादन आपण ऐकले की ती व्यक्ती या भूतलावर आहे की नाही याचा आपल्याला विसरच पडतो. काल संघ्याकाळी मी डॉ. वसंतराव देशपांडे आणि सुधीर फडके यांनी पूर्वी गायलेले आणि आता जे आपणाला अभंगस्वरूप वाटू लागलेले आहे, असे 'कानडा राजा पंढरीचा' हे 'झाला महार पंढरीनाथ' या चित्रपटातील गीत ऐकले. आधुनिक वाल्मिकी म्हणून ज्यांना संबोधले जाते त्या गजानन दिगंबर माडगूळकर यांचे गीत, त्यावर भक्तीरसाने चिंब भिजलेल्या स्वराचा साज चढविला तो सुधीर फडके यांनी आणि प्रत्यक्ष गायले ये - डॉ. वसंतराव देशपांडे आणि सुधीर फडके यांनी ! ही सर्व भूलोकीची गंधर्व मंडळी आपल्याला का कोण जाणे, पण सोडून देवलोकीच्या गंधर्वांना आपले गाणे ऐकवायला निघून गेली !
मूळ 'धानी' रागावर आधारलेले हे गीत काही वेळा आपणांस 'मालकंस'चा भास देते ! राग कोणताही असो, आपल्याला समाजात असो व नसो ! यातील भक्ती भाव मात्र अतिशय सच्चा आणि पक्का आहे ! ज्याला मराठी समजत नाही त्याच्या डोळ्यातील भाव बदलायला लावणारी ही रचना आणि स्वर आहेत !
कानडा राजा पंढरीचा
वेदांनाही नाही कळला अंतपार याचा
निराकार तो निर्गुण ईश्वर
कसा प्रकटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटिवर, पुतळा चैतन्याचा
परब्रह्म हे भक्तांसाठी
मुके ठाकले भीमेकाठी
उभा राहिला भाव सावयव, जणु की पुंडलिकाचा
हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे राखतो
पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा

२४ ऑक्टोबर २०१६


No comments:

Post a Comment