Friday, June 2, 2017

लग्नातील सनई बँड आणि 'डीजे'

लग्नातील सनई बँड आणि 'डीजे'

आम्ही आमच्या गांवी रहात होतो, आमच्याच नांवाच्या गल्लीत. आमचे घर म्हणजे गल्लीच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत ! घराच्या मागील भागांत गांवातून वहाणारा नाला, हा पूर्वी उघडा होता; आता बंदीस्त केला आहे. त्यांवर नगरपालिकेने दुकाने वगैरे पण बांधलेली आहे. आता या भागाला वेगळ्या नांवाने ओळखत असतील पण ते नविन नांव तेवढे लक्षात रहात नाही. नाल्यावर रहातो, असे म्हटले की पत्ता चुकायची शक्यताच नाही. या भागांत मोठी मोकळी जागा असल्याने गांवातील महत्वाचे जाहीर कार्यक्रम, प्रचार सभा, भाषणं हे येथेच होत. हे ठिकाण गांवाच्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी असल्याने सर्वांना सोयीचे व जवळ पडायचे. अजून काही कार्यक्रम गांधी चौकात पण व्हायचे. तर आमच्या घराच्या जवळ गांवातील प्रसिद्ध मारूतीचे मंदीर होते. नाल्यावरचा मारुती म्हणून सर्वांना परिचित ! रोज सकाळी दर्शनाला येणाऱ्या भाविकांना जेमतेम उभे रहाता येईल एवढीच जागा, पण गर्दी असेच ! नाल्यावर गांवातील वेगवेगळ्या सात-आठ दिशांकडून येणारे रस्ते मिळत, त्यामुळे पहातापहाता सर्व बाजूंनी माणसं जमत.
ही अशी मध्यवर्ती जागा व मोक्याचा भाग असल्याने या नाल्याच्या भागाचे महत्व लग्नाचे हंगामात फारच वाढत असे. सकाळी, दुपारी, संध्याकाळी व रात्री वेगवेगळ्या कारणाने मिरवणुका निघत. वरात, शाळेच्या मिरवणुका, प्रभातफेऱ्या, नवरदेवाची मिरवणूक नाल्यावरून नेणे व नाल्यावरच्या मारूतीचे दर्शन हे महत्वाचे ! गांवातील जवळपास सर्व समाजाच्या लग्नाच्या मिरवणुका या नाल्यावरून निघत. मग रात्रीच्या वेळी मिरवणुकीसोबत गॅसबत्ती घेवून जाणारे, त्यांच्या कमीजास्त प्रकाश टाकणाऱ्या गॅसबत्त्या !
सोबत वाजंत्री वाजवणारे, त्यात एक कायम आपले गाल फुगवून एकच स्वर देणारा पिंगाणीवाला, त्याला भोंगा म्हणतात. दुसरा स्वरसाथ देणारा स्वरपेटी वाजवणारा साथीदार ! ही दोन जणं कोणीही असली तरी चालत, मात्र भोंगेवाल्याचा स्वर देण्याचा दम चांगला हवा. संबळ वाजविणारा ताल शिकलेला असायचा त्यामुळं बरा साथ करायचा. खरी मजा यायची ती सनईवाला जर चांगला असेल तरच ! तोडी, भीमपलास, सारंग, भूप, देसकार, भैरवी वगैरे राग व त्यातील गीते सहजसुंदर वाजवायचा. वातावरण मंगल व प्रसन्न वाटायचे. त्यावेळी अमळनेरचा सनईवादक फार प्रसिद्ध होता, त्याची बिदागी पण जास्त असायची.
काही हौशी व पैसेवाले मग बॅंडवाले पण बोलवायचे, कारण सनईवाल्या गुरवाशिवाय मिरवणूक नसायची, बॅंडवाला ऐच्छिक असायचा. सनई वाजवणारा गुरव मग कसेही वाजवो पण ते मंगलवाद्य म्हणून सर्वसंमत होते. सनई हवीच ! दोन्ही असले म्हणजे मग ती 'पार्टी' मोठी, हौशी व श्रीमंत समजली जाई.
सनईवादनाने मिरवणुकीत आपली जर झलक दाखवली तर मग बॅंडवाल्यांचा 'इज्जत का सवाल' असायचा ! मग त्यांचे कडून सुरूवात व्हायची ती 'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ---' या आरतीने ! काय आरती वाजवायचे ? अंगावर रोमांच उभे रहायचे ! वाजवणारा हिंदु आहे का मुस्लीम हा प्रश्न ऐकणाऱ्याला काय पण वाजवणाऱ्याच्या पण डोक्यात नसायचा ! यानंतर बऱ्याच वेळा स्वर निघायचे ते वाजविण्यासाठी 'मिया मल्हार'चे आणि खात्री व्हायची की आता 'गुड्डी' मधले 'बोलरे पपीऽऽ हराऽऽऽऽ' होईल, अगदी तसेच व्हायचे. त्यानंतर जबरदस्त सादरीकरण म्हणजे 'कुहू कुहू बोले कोयलिया' हे 'स्वर्णसुंदरी' चित्रपटातील 'आदीनारायण राव' यांनी संगीत दिलेले गीत वाजवले जाई. त्यांची सरगम व तालांचे झटके हे बॅंडवाले असे काही दाखवत की मिरवणुक पहायला आलेले धन्य होवून जात. हो, ही अशी सनईवादक आणि बँडवाले वाजविणारी मंडळी असली की लग्नाशी, त्या वरातीशी कसलाही संबंध नसलेली मंडळी पण लग्नाची मिरवणुक पहायला म्हणण्यापेक्षा ऐकायला येत ! नवरामुलगा मुकाटयाने घोड्यावर बसलेला असे. बॅंडवाल्यांमधे चाळीसगांवचा बॅंड, जळगांवचा पोलीस बॅंड व भुसावळचा रेल्वे बॅंड नावाजलेला होता.
बॅंडवाल्याने ही कलाकुसर दाखवल्यावर मग सनईवाले मागे थोडीच रहाणार - 'तेरे सूर और मेरे गीत' हे गूॅंज उठी शहनाई' मधील गीत असे काही वाजवत की यापेक्षा सुयोग्य गाणे व स्वर ते कोणते असे ऐकणाऱ्याला वाटे. त्यानंतर मग 'बाबुल की दुवाएॅं लेती जा ---' हे गाणे वाजवीत असतांना तर बॅंडवालेसुद्धा ऐकायला थांबलेले असत. हौशी मंडळी या गाण्यांवर नाचत, पण नाचण्यांत मनापासून हौस दिसे, उत्साह दिसे ! धुंदीत नाचतांना क्वचितच दिसत.
अशी एकमेकांची परीक्षा पहाणारी आणि प्रेक्षकांना, श्रोत्यांना मनमुराद आनंद देणारी एकपेक्षा एक अशी गाणी वाजविली जायची, हौशी मंडळी नाच करायची. त्यावेळी 'पिंजरा' या चित्रपटातील 'ज्वानीच्या आगीची मशाल हाती' हे गाणे बॅंडवाले सुंदर वाजवायचे आणि त्यासोबत मशाली घेवून त्यांच्या सोबतचा कलाकार नाचायचा ! किंचित अंधारात दोन्ही हातांत मशाली घेवून नाचत असलेला हा कलाकार आपली खरोखरच कला दाखवत असायचा. मग अशी गाणे ऐकायला मिळत असतील तर स्वाभाविकपणे ही नवरदेवाची मिरवणुक आपल्या घराजवळच रेंगाळावी, अजिबात पुढे जावू नये असेच वाटे आपल्याला. नाल्यावर मी रहात असल्याने अशी असंख्य गाणी ऐकलीत, मिरवणुका पाहिल्यात ! लग्नाचा हंगाम आला की या आठवणी येतात.
आता औरंगाबादला मी आहे. घराजवळ पण मारोती मंदीर आहे, मंदीरावर लग्नाची मिरवणुक देखील येते. मात्र फरक एवढाच पडलेला आहे की आता कर्कश्श, कानाचे पडदे फाटतील एवढ्या मोठ्या आवाजातील अर्थहीन, पांचट गाण्यांचा आवाज ऐकून घरातही एकमेकांचे बोलणे एकमेकांना ऐकू येत नाही. त्या आवाजाने खिडक्यांची तावदानं थरथरतात, आपल्या कोणाच्याही छातीत धडधड वाटेल एवढा मोठा आवाज असतो. ध्वनिप्रदूषण वगैरे हे अलिकडील शब्द कुचकामी ठरतील एवढा मोठा आवाज असतो. केव्हा एकदा ही मिरवणुक नामे कटकट पुढे जाईल असे वाटते. यांत मिरवणुकीतील लोकांना पावित्र्य, मांगल्य कसे काय वाटते कोण जाणे ? निदान समाधान तरी वाटते का याची पण शंका आहे. काही वर्षांत आपण खरंच किती पुढे आलो आहे नाही.

२३ मे २०१७

No comments:

Post a Comment