Friday, June 2, 2017

महाविद्यालयीन विद्यार्थी

महाविद्यालयीन विद्यार्थी


नूतन मराठा कॉलेज मधे माझे बारावी ते बी. कॉम. पर्यंत शिक्षण झाले. त्या कॉलेजने म्हणजे तेथील प्राध्यापकांनी, कर्मचाऱ्यांनी माझ्यावर खूप मनापासून प्रेम केले. हा अनुभव त्या वेळीच नाही तर अजूनही येवू शकेल, येतो. कोणत्याही प्राध्यापकाने कॉलेजच्या लायब्ररीतून त्यांच्या नांवाने मला कितीही आणि कोणतीही पुस्तके घ्यायला कधीही आडकाठी केली नाही. प्रा. शेखर सोनाळकर, प्रा. विवेक काटदरे, प्रा. एस्. आर. पाटील, प्रा. अजित वाघ, प्रा. बी. बी. देशमुख, प्रा. आर. टी. बावस्कर, प्रा. रमेश लाहोटी, प्रा. सुलोचना साळुंखे वगैरे या सर्व मंडळींचे माझ्यावर खूप ऋण ! कै. डॉ. के. आर. सोनवणे हे आमचे प्राचार्य होते, त्यांनी तर माझे खरंच खूप लाड पुरवले असेच म्हणता येईल. कर्मचाऱ्यांमधील श्री. महाडिकांनी तर माझा संदर्भ दिलेल्यांची पण कामे अगदी अलिकडे केलेली आहेत.
मध्यंतरी नूतन मराठा कॉलेजचा जुन्या विद्यार्थ्यांचा कसलाचा कार्यक्रम झाला होता, त्यावेळी मला आवर्जून बोलावले होते. खूप समाधान वाटले. आमचे मित्र कविवर्य श्री. शशिकांत हिंगोणेकर होते, प्रमुख पाहुणे म्हणून ! बरीच मंडळी नविन होती, स्वाभाविकच आहे ! पण माजी विद्यार्थ्यांच्या या भावना पाहून नविन मंडळींना बरे वाटले. जुन्या लोकांनी आपल्यासाठी कसला व काय ठेवा ठेवला आहे हे त्यांना समजले.
या काळांत माझे मित्रमंडळही खूप व भले मोठे होते. मित्र हे फक्त आपल्याच वर्गातील होते असे नाही. विज्ञान शाखेतील, कला शाखेतील पण ! यापैकी बऱ्याच जणांची मैत्री आजही टिकून आहे. त्यांच्या मुलाबाळांना, पत्नीला या अजूनही टिकून असलेल्या मैत्रीची गंमत वाटते, आश्चर्य वाटते. आम्ही जवळपास दिवसभर कॉलेजवरच असायचो. एकदा तर प्रा. सोनाळकर सरांनी आम्हाला विचारले पण की 'कॉलेज संपल्यावर काय, कुठे रहाल ?' कारण आम्ही दिवसभर काय करू याची समस्या तर प्राध्यापकांना पण होती.
परिक्षेचा काळ हा प्रत्येकाची कसोटी पहाण्याचा काळ ! परिक्षेच्या काळांत पेपरांत 'नक्की कोणते प्रश्न येणार' हे आदल्या दिवशी समजण्याची पद्धत त्यावेळी पण होती. काही जण याच्या मागावरच असायचे. प्रश्नपत्रिका कोणी काढली, ती त्यांनीच का काढली ? त्यांचे विद्यापीठात कसे वजन आहे, उत्तरे कशी अपेक्षित आहेत ? पेपर कोठे, कोणत्या गांवाला, कोणाकडे तपासायला जाणार आहे ? याची अगदी तपशीलवार माहिती त्यांच्याकडे असायची. ही माहिती कोठून मिळते हे सांगायची परवानगी नसल्याने ते सांगत नसत. यापैकी कितीजण 'सी. आय्. डी.' मधे आहेत किंवा तत्सम काम करतात याची कल्पना नाही. काही जण परिक्षा जवळ आली की 'कॉप्यांची' तयारी करायचे. कोणते प्रश्न येतील, त्यांची बारीक अक्षरांत उत्तरे, मग ती कोणालाही समजणार नाही अशा ठिकाणी लपवायची, ऐनवेळेस काढायची वगैरे मोठे दिव्य असे. पुन्हा परिक्षेचा नंबर कुठे येईल, त्याचा 'कडकपणाबद्दलचा' इतिहास आहे का ? हे पण विचारांत घेवून तसे धोरण आखावे लागे. परिक्षेची एवढी तयारी अभ्यास करून केलेली सोपे हे त्यांची कॉप्यांची तयारी वाटत असे.
शाळेतील एक विद्यार्थी आठवला. तो फारच आगावू होता. आपल्या वाटेला कोणी जावू नये, आपली कॉपी पकडू नये म्हणून त्याने भलताच विचित्र उपाय योजला होता. परिक्षेच्या वेळी तो खिशात कॉप्या कधीच ठेवायचा नाही, तर कपड्यातील, अंगावरील विविध भागांत ठेवायचा. पॅंटचे खिसे आठवणीने खालून फाडून ठेवायचा. परिक्षा सुरू असतांना परिक्षा हॉलमधे कोणी कॉपी पहाण्यासाठी आला आणि त्याने भसकन त्याच्या खिशात हात घातला तर त्याच्या हाताला कॉपीऐवजी भलतेच लागायचे. चटका बसल्यासारखा त्याचा हात बाहेर यायचा. इकडेतिकडे चोरून पहात, तो कॉपी तपासणारा शिक्षक, एक्झामिनर तातडीने पुढील विद्यार्थ्याकडे जायचा. खरं म्हणजे, त्याच्यातील कॉप्या गोळा करायची हिंमतच खचली असायची. परिक्षेच्या पूर्ण काळांत हा निवांत असायचा. त्याला पण एक गुरू भेटला हा भाग अलाहिदा !
असे परीक्षेच्या आदल्या दिवशी ते प्रश्न समजल्यावर तो भाग आपण वाचला असेल तर उत्तम नाहीतर मग 'न भूतो न भविष्यति' असा गोंधळ ! आपल्याला येते ते पण विसरण्याची परिस्थिती किंवा आपण काही अभ्यास तरी केला आहे की नाही असे जाणवू लागायचे. दुसऱ्या दिवशी पेपर पाहिल्यावर समजायचे की 'नक्की येणार' किंवा 'आलेच आहे' असे प्रश्न फारसे दिसायचे नाहीत. मात्र हे काहीही असले, तरी प्रत्येकाने हे मनोमन मान्य केले होते की ज्याला कोणाला हे असे प्रश्न समजतील त्यांने सर्वांना ते सर्व प्रश्न समजतील ही काळजी घ्यायला हवी. त्यांत कामचुकारपणा अजिबात चालणार नाही. हे सांगायला अभिमान व आनंद वाटतो की असे तेव्हा आमच्यापैकी कोणीही केले नाही.
परिक्षेच्या काळांत या अशा गोष्टींवर विश्वास ठेवून वेळ वाया घालवावा का ? यांच्या नादी लागणे योग्य आहे का ? येथे आता प्रश्न तो नाही तर आपण एकदा कोणालाही मित्र मानल्यानंतर त्याच्या सुखदु:खात आपण किती सहभागी होतो ? आपल्याही मित्राला हे प्रश्न समजले तर तो पण चांगला पेपर सोडवून चांगले मार्क्स मिळवेल, कदाचित आपल्यापेक्षा जास्त पण मार्क्स मिळवेल. आपण कदाचित मागे पडू शकू, हे सर्व शक्य असते. पण याचा विचार आमच्या मनांत कधी शिवायचा पण नाही. जे जे आपल्याला ठावूक आहे ते सर्वांना आपल्या मित्रांना समजले पाहिजे; आपल्या एकट्याजवळच ते रहायला नको. आपण सर्वच उत्तम मार्क्स मिळवू ! ही भावना.
माझा मित्र सुनील आगीवाल ! माहेश्वरी बोर्डिंगला रहात होता. याला आदल्या दिवशी असेच कोणाकडून तरी असे 'परिक्षेत नक्की येणारे' प्रश्न समजले. आमचा मित्रमंडळींचा नियम त्याला माहिती होता. त्यामुळे सर्वांना सांगणे भाग होते. त्याने समजल्याचे कोणालाही सांगीतले नसते तर काहीही समजले नसते. कदाचित परिक्षेस ते प्रश्न आले असते तर त्याचाच फायदा झाला असता, इतर तुलनेने मागे पडले असते. पण ही भावना निर्माण होणे शक्य नव्हते. बरं, त्यावेळी फोन, फेसबुक, व्हाटस् अॅप वगैरे काही नव्हते. ही माहिती पोहोचवायची तर दळणवळणाचे साधन म्हणजे फक्त सायकल ! परिक्षेचे दिवस ! कोणाचे घर किती लांब हा प्रश्नच नाही ! सकाळी साडेसहाला हा माझे घराजवळील मैदानात, तिथूनच मला त्याच्या हाका ! मी लगेच गेलो. सकाळीच काय झाले, हा प्रश्न ! त्याने सांगीतले, 'महत्त्वाचे प्रश्न समजले आहे. हे घे.' त्याने तातडीने प्रश्न सांगीतले. माझा पुढचा प्रश्न - 'अजून कोणाला सांगायचे का ?' 'नाही.' त्याचे उत्तर. आणि गेला पण ! नेहमीप्रमाणे जे व्हायचे तेच होते, तसे काही नव्हते. काही प्रश्न आले ते येणारच होते, त्याप्रमाणे आलेत. आम्ही सर्वांनी पेपर उत्तम लिहीला. सुनीलच्या धावपळीचा विशेष उपयोग झाला नव्हता. त्याचेबद्दल त्याला पण विशेष खंत नव्हती; कारण हे नेहमीचेच होते.
काल माझ्या मुलीशी मी फोनवर बोलत होतो. तिच्या विद्यापीठात भारतातील विविध राज्यांतील मुलं-मुली शिकायला असतात. माझ्या मुलीला एका दिवशी बरं नव्हते, त्या दिवशी म्हणून ती वर्गास गेली नाही. त्या दिवशी वर्गात काय झाले हे तिला कळणे शक्य नव्हते. त्या दिवशी वर्गातील शिक्षकांनी एका प्रोजेक्टसंबंधी काही सूचना दिल्या व त्या दिवशी जे गैरहजर असतील त्या सर्वांना सांगायला सी. आर.ला सांगीतले. ती सी. आर. तिची मैत्रीण आहे. तिने कोणालाही काही सांगितले नाही किंवा इतरही कोणी मुलीला काही नेमके सांगीतले नाही. इतर मुलींची लगबग माझी मुलगी दोन-तीन दिवस पहात होती. यावरून तिला अंदाज आला. तिने तिचा प्रोजेक्ट तयार करून ठेवला. ज्या दिवशी प्रेझेंटेशन होते, त्या दिवशी तिने उत्तम केले. तिच्या त्या सी. आर. मैत्रिणीसहीत इतरांना व्यवस्थित करता आले नाही. शिक्षकांना हे सी. आर. ने कोणालाही न सांगीतल्याचे समजले. त्या नंतर यांवर हिताचे म्हणून बऱ्याच बोलल्या. त्यांचा काय उपयोग किंवा परिणाम होईल का हे नंतर समजेल, पण आजचा विद्यार्थ्यांचा स्वभाव, दृष्टी समजत आहे.
प्रत्यक्ष वार्षिक परिक्षेच्या दिवशी कसलीही जबाबदारी नसतांना केवळ ऐकलेले 'महत्वाचे प्रश्न' मित्रांना सांगायला पहाटे सायकल दामटत येणारा सुनील आगीवाल आणि शिक्षकांनी प्रोजेक्टबद्दल गैरहजर विद्यार्थ्यांना सांगण्याची जबाबदारी दिल्यावरही न सांगणारी आजची सी. आर. मैत्रिण ! दिवस बदलत आहे, पिढी बदलत आहे आणि मानसिकता पण बदलत आहे.

२३ एप्रिल २०१७


No comments:

Post a Comment