Friday, June 2, 2017

रामनवमी उत्सव असाच एका गावातील

रामनवमी उत्सव असाच एका गावातील

चैत्र शुद्ध प्रतिपदा आली, नविन वर्ष लागले ! काहींकडे चैत्राचे नवरात्र असते, रामाचे; तर काहींकडे वैशाखातील नरसिंहाचे नवरात्र असते ! चैत्र आणि वैशाख हे माझे आवडीचे महिने ! यासाठी की या काळांत आम्हा मुलांची वार्षिक परिक्षा अगदी जवळ आलेली असायची किंवा होण्यातच असायची. जुन्या इयत्तेतील 'पेपर' एकदा का दिले की आम्ही परिक्षा संपवून हुंदडायला मोकळे ! सुदैवाने परिक्षेनंतर त्याच्या येणाऱ्या 'रिझल्टची' काळजी मला नसायची, माझा बहुतेक पहिला क्रमांक हा ठरलेला असायचा.
माझा गोंधळ व्हायचा तो वार्षिक परिक्षा झाल्यानंतर आणि त्याचा निर्णय लागण्यापूर्वी जर कोणी विचारले की, 'काय रे कोणत्या वर्गात आहे ?' तर याचे अचूक उत्तर काय द्यावे यांत ! कारण त्यावेळी जर नुकतेच परिक्षा दिल्याचे वर्ष सांगीतले तर मग 'लगेच 'रिझल्ट' लागल्यावर पुन्हा हे खोटे पडणार; आणि 'रिझल्ट' न लागताच पुढील वर्ष सांगीतले तर अजून तर आपण त्या वर्गात गेलो नाही, मग खोटे कसे सांगायचे ? लहान मुलांच्या या त्रांगड्याची कल्पना मोठ्यांना, ते चांगले मोठे झाल्यावरही येत नाही.
यावेळचे अजून एक सांगायचे म्हणजे चैत्र महिना आणि हा 'रामनवमी उत्सव' ही एक मोठी पर्वणी असायची. आमच्या गांवात रामाची तीन मंदीरे - मोठे राम मंदीर, चिमणा राम मंदीर आणि बालकराम मंदीर ! मोठे राम मंदीर हे खरोखरच प्रशस्त ! तेथील रामलक्ष्मण व सीतामाईच्या मूर्त्या या देखण्या व मोठ्या ! या मंदीरात माझ्या स्मरणांत राहिलेला उत्सव म्हणजे - श्रीरामबुवा साठे यांचा आणि त्यानंतर त्यांचे बंधू श्रीकृष्णबुवा साठे यांचा ! आता दोन्ही नाहीत ! कै. श्रीकृष्णबुवांचे चिरंजीव नारायणशास्री हे रावेरला येवून उत्सव साजरा करतात.
कै. श्रीरामबुवा साठे यांचे वडिल प्रकांड पंडीत, उत्तम प्रवचनकार ! संस्कृतमधे प्रवचन करत थेट भारतभर फिरलेले, अगदी अलिकडे गेलेल्या पाकिस्तानातील प्रदेशांत देखील ! त्यांची या प्रवचनाबद्दल हत्तीवरून मिरवणूक काढल्याचे देखील सांगीतले जाई.
कै. श्रीरामबुवाच्या काळात 'रामनवमीच्या उत्सवांत' गांवातील प्रत्येक समाजाने द्वितीयेपासून ते अष्टमीपर्यंत स्वत:हूनच भंडाऱ्याचे वार परस्पर ठरवलेले असायचे ! कोणता समाज कोणत्या दिवशी याचा कधी गोंधळ व्हायचा नाही. आमचे घर आणि रोज किर्तनाला येणारे भजनी मंडळ त्याला अपवाद ! कै. श्रीरामबुवा साठे व आमच्या घराचे संबंध खूप जुने, 'तुमच्या जीवावर रामाचा उत्सव करतो आहे दरवर्षी !' हे त्यांचे ऐकल्यावर प्रत्येकाला तो उत्सव घरचा वाटायचा. मग रोज भंडाऱ्यात प्रसादाला जातो असे म्हणायचे; जेवायला जातो, असे नाही म्हणायचे !
श्रीरामबुवा हे रामदासी सांप्रदायाचे ! उत्सवाच्या काळात 'रामदास कल्याऽण जयजय, रामदास कल्याऽऽण' ही मोठ्या भाकरीएवढ्या झांज्यांच्या आवाजातील चिपळ्यांची साथ असलेली साद ऐकली की घरातील महिला मंडळी लगबगीने बाहेर येवून यथाशक्ती भिक्षा देत. पायली-दोन पायली गहू, डाळ; जसं असेल तसं ! खरोखर उत्सव हा त्यांचा नसायचा कारण तो गांवाने आपला मानलेला असायचा, त्यांच्या हातून प्रभू रामचंद्र करवून घ्यायचा.
'भल्यामोठ्या परातीत मोठ्यामोठ्या पोळ्यांच्या थप्पीचे माणसाच्या जवळपास उंचीएवढ्या सराट्याने चतकोर तुकडे करायचे' हा प्रकार मला बघायला खूप आवडायचा. भल्यामोठ्या तपेल्यातील वरण आणि ते पंगतीत ओगराळ्याने वाढले जायचे. भरपूर कुस्करा करायचा व त्याच्यावर हे पातळ वरण, जोडीला कैऱ्यांचा तक्कू किंवा लोणचे ! एखादी वांग्यासारखी झणझणीत भाजी ! आऽऽहा ! या पंगतीची मजा, त्या पंगतीत जे जेवले आहेत त्यांनाच आठवेल व जाणवेल, इतरांना नाही. पंगतीतील श्लोक हा तर स्वतंत्र विषय आहे. पंगतीमुळे श्लोक म्हटले जातात का श्लोकांमुळे पंगत रेंगाळते हा वादाचा विषय आहे. तिथे पण स्पर्धा सुरू व्हायची, श्लोकांची व खणखणीत आवाजाची ! मात्र जेवणाच्या शेवटी श्रीरामबुवा - 'अयोध्येसी जाता --' अशी सुरूवात असलेला श्लोक म्हणायचे; मग ओळखायचे की पंगत आटोपली.
रोज आपल्या शेजारी कोण बसलेले आहे मी काय ओळखणार ? काही वेळा बैठकीवरचे असायचे, काही वेळा माळीवाड्यातील, काही वेळा बाहीरपुऱ्यातील तर काही वेळा अफू गल्लीतील ! कै. श्रीरामबुवा मग यायचे ते पंगतीत फेरी मारत, मंडळींना 'स्वस्थ होवू द्या' म्हणून सांगायला. त्यावेळी मला गमतीने निष्कारणच 'छोटे जहागीरदार स्वस्थ होवू द्या' म्हणायचे. अर्धी चड्डी घालून आलेला हा चौथी पाचवीतला बारकासा पोरगा कोण, निष्कारणच शेजारच्याला प्रश्न पडायचा आणि मग मला गोंधळल्यासारखे होई. यावर शेजारी जेवायला बसलेला त्यांना विचारी, 'कोणाचा ?' कै. श्रीरामबुवा सांगत 'मोरूअण्णांचा' ! मग हे 'छोटे जहागीरदार' गांवांत सर्वत्र 'मोरूअण्णा' या नांवाने प्रसिद्ध असलेल्यांचे चिरंजीव आहे, हे त्यांना माहीत होई. त्या भंडाऱ्याच्या पंगतीतल्या साध्या जेवणातील आपुलकी, प्रेम, जिव्हाळा व अगत्य हे आज चाळीस-पंचेचाळीस वर्षांनंतर 'बफे सिस्टीमच्या जेवणांत' चमचमीत जेवल्यावर तर फारच जाणवते.
उत्सवात रोज रात्री किर्तनाच्या अगोदर रामासमोर 'ब्रह्मोमहाराज' व्हायचे ! म्हणजे 'ब्रह्मोमहाराज' या संबोधनाने सुरूवात करून मग एखादे सुंदर वचन म्हणायचे आणि सांगता 'ब्रह्मोमहाराज' या नांवाने करायची ! ब्रह्मोमहाराज म्हणण्यात गांवातील मंडळीची निरनिराळी सुवचने, दोहे, चौपाया म्हणण्यात अहमहमिका असायची. काही वात्रटही असायचे, मग ते असे काही ब्रह्मोमहाराज म्हणायचे -
वाकडीतिकडी बाभूळ, त्यावर बसला कोल्हा ।
इकडून मारला टोला, तो गंगेपार गेला ।। ब्रह्मोमहाराज ।
मग हास्यकल्लोळ व्हायचा; यावर दुसरा याच्यापेक्षा वाह्यातपणे म्हणायचा. शेवटी कोणी वयस्कर, जबाबदार ब्रह्मोमहाराज म्हणायचा आणि याला आवर घालायचा.
मग श्रीरामबुवा फेटा बांधून तयार होऊन किर्तनाला उभे रहायचे. रामाकडे आपले तोंड येईल अशा पद्धतीने उभे रहायचे. हातात झांजा वा चिपळ्या ! खाली पाठीमागे भजनीमंडळ ! मग त्यांत लक्ष्मण महाजन, रामा पहिलवान, भागवत महाजन वगैरे मंडळी असायची. त्यांचे तालात वाजणारे टाळ, श्रीरामबुवांच्या वाजणाऱ्या चिपळ्या आणि तबल्यावर लालचंद महाजन ! काय विचारता ! या लोकांना शास्त्रीय संगीतातील राग समजत नसतील पण भजनातील रागाची मांडणी खरोखर शुद्ध असायची. लालचंद महाजन तबला वाजवता वाजवता, भजन व गवळणी खूप छान म्हणायचे.
किर्तन संपल्यावर, मग ही भली मोठी गर्दी ज्यासाठी आलेली असायची ती 'सोंगं' निघायची. ढंऽट्यंऽऽढड्यांऽढ्यंऽटड्यांऽऽढ्यंऽऽ असे तबल्यावर वाजले की सगळे खडबडून जागे व्हायचे. काही झोपलेले असायचे ते उठायचे, ज्यांना झोप आवरत नसे त्यांना इतर जण चापट्याबुक्के मारून उठवायचे. थोडक्यात, 'सोंगं' पाह्यला सर्व तयार ! मग त्यातील श्रावणबाळ बैठकवरचा असायचा तर दशरथ राजा थड्यावरचा ! श्रृंगऋषी अफूगल्लीतले असायचे तर वशिष्ठ ऋषी बाहीरपुऱ्यातले ! सगळ्यांच्या घरातील मंडळी ही 'सोगं' पहायला यायची. त्यांच्या तोंडचे संवाद हे रामायणातीलच असायचे, पण संवादापेक्षा 'अभिनयावरच' प्रेक्षकांचे जास्त लक्ष असायचे. रात्री १२-१ पर्यंत हा कार्यक्रम रंगायचा.
आता रामनवमी उत्सव संपत आलेला आहे, उद्या रामनवमी ! गांवाला उत्सवासाठी मी बरेच वर्षांत गेलो नाही, जावेसे पण वाटत नाही ! पण असे असले तरी आठवणी येण्याच्या थोडीच रहातात ? त्या येतात आणि सुखदु:खाचे काही क्षण काढून आपली हळवी जखम भळभळती करून जातात.

३ एप्रिल २०१७

No comments:

Post a Comment