Saturday, June 3, 2017

मुलीच्या बापाची व्यथा

मुलीच्या बापाची व्यथा

मुलीचे लग्न ठरविणे व ते सुखरूप पार पाडणे हे एवढे सोपे नसते. तुम्ही कितीही नियोजन केले की ऐनवेळेस काही अडचण निर्माण होवू नये, तरी त्या दरम्यान कोणती, तुम्हाला कल्पना देखील नाही, अशी समस्या निर्माण होईल ते सांगता येत नाही. त्यातून जे काही भलेबुरे परिणाम व निष्कर्ष निघतील ते भोगावे लागतात; काही वेळा ते तात्कालिक असतात, तर काही वेळा कायमस्वरूपी ! म्हणूनच म्हटले जाते की 'लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून' !
अशीच एका मुलीच्या बापाची व्यथा ! घटना साधारण ३५-४० वर्षांपूर्वीची ! मुलगी खेड्यातली, तिचे लग्न ठरले ! बैठकीत मुलाकडच्यांनी आग्रह धरला की लग्न तालुकाच्या ठिकाणी करा, मुलाकडचे तालुक्याला रहात होते. मुलीच्या गांवात, त्या खेड्यांत लग्नासाठी कार्यालय असण्याचा प्रश्न नाही. मात्र तालुक्याला नुकतेच नगरपालिकेने लग्न होऊ शकेल असे कार्यालय बांधले होते. मुलाचे वडिलांची नगरपालिकेच्या राजकारणी नेतेमंडळींमधे उठबस होती; हे कारण मुलीकडच्यांना लग्न तालुक्याला करा हे सांगायला पुरेसे होते. तरी मुलीकडच्या अनुभवी म्हाताऱ्यांनी सल्ला दिला - 'पोरा, मुलीच्या लग्नाचा मांडव आपल्या दारी हवा, काही अडीअडचण आली तर आपले माणसं असतात. ते मदत करतात, लग्न पार पडते.' मुलीचे वडील चिंताक्रांत झाले, त्यांचा चिंताक्रांत चेहरा पाहून मुलाकडच्यांनी सांगीतले - 'सोय जाणतो, तो सोयरा', तुम्ही काळजी करू नका ! तालुक्याच्या ठिकाणी अडचण आली तर आम्ही आहोत. काही तक्रारीची वेळ येणार नाही.' झाले, मुलांकडच्या आग्रहाला मुलींकडच्यांनी मान तुकवायची असते आणि त्यातील गृहीत संकटांना तोंड द्यायचे, या समाज शिरस्त्याप्रमाणे लग्न तालुक्याला ठरले. हजार माणसांचे जेवण राहील, हे सांगीतले. मुहूर्त वगैरे नंतर ठरणार होता, बैठक आटोपली. नंतर मुलीकडच्यांनी दोन-चार तिथ्या कळविल्या आणि मुलाकडच्यांनी मुहूर्त म्हणून कळविला, लग्नतिथी शुक्रवारी ठरली, मुलांकडच्यांना सोयीची होती.
आदल्या दिवशी संध्याकाळी ही मुलीकडची मंडळी तयारीनिशी तालुक्याच्या गांवी पोहोचली. नगरपालिकेचे मुख्याधिकारी जवळच होते, मुलाकडच्यांनी ओळख करून दिली. 'काही अडचण आली तर हे आहेत.' म्हणून त्यांनाही मोठेपणा दिला. त्यांनी पण पाणी, साफसफाई बघायला माणसाला सांगीतले. सर्व व्यवस्था झाली. दुसरा दिवस, लग्नाचा दिवस उजाडला ! तेथे आसपास सकाळपासूनच वर्दळ जाणवू लागली. लग्नाच्या धामधुमीत काही समजले नाही. मुहूर्त दुपारचा होता. भरपूर मंडळी होती. लग्न लागले.
जेवणाची पंगत वाढली, मंडळी जेवायला बसली. मुलीकडचा तो म्हातारा म्हणालाच - 'पोरा, हे लग्न जड जाईल, आज शुक्रवार आहे.' त्या म्हणण्याकडे आता कोण लक्ष देणार होते. पहिली पंगत झाली. दुसरी पंगत झाली. तिसरी पंगत झाली. चौथ्या पंगतीची तयारी दिसल्यावर मुलीकडच्यांनी विचारले, 'अजून किती मंडळी राहिली आहे ?' त्यांवर उत्तर आले - '३०० च्या आसपास !' हजार पान तर जेवून केव्हाच उठले होते. पुन्हा ३०० म्हणजे जवळपास १५०० पान होतेय ! मुलीकडचे तसे डगमगणारे नव्हते. स्वयंपाक्याने पुन्हा कंबर कसली, पुन्हा स्वयंपाक सुरू केला. स्वयंपाक तयार झाला, मंडळींना वाढले. स्वयंपाक नवीन करावा लागल्याने, थोडा उशीर झाला. जेवण झाले. बोलताबोलता मुलाकडचे म्हणाले - 'जेवण चांगले, पण उशीर झाला.' 'हं, आता हजारांच्या ठिकाणी पंधराशे आले तर असेच होणार, सांभाळून घ्या.' मुलीकडचे म्हणाले.
शब्दानेशब्द वाढत गेला, शेवटी 'आम्हाला खायला मिळत नव्हते म्हणून तुमच्याकडे जेवायला आलो.' हे मुलाकडच्यांनी बोलल्यावर मुलीच्या बापाच्या डोळ्यात पाणी आले. दुपारचे साडेतीन वाजले होते, उन्हं कलली होती. त्यांच्या सर्वांच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. आणि तो मुलीकडचा म्हातारा खवळला - 'पोरा, बाजूला हो.' म्हणत त्याने मुलीच्या वडिलांना बाजूला केले - 'सोय जाणेल तो सोयरा. तुम्हीच म्हणाले होते ना ? आज शुक्रवार, येथे शेजारी आठवड्याचा बाजार भरतो. तुम्ही गावाचे पुढारी, ही सर्व बाजारला येणारी मंडळी ! लग्न पहाते, जेवण करते मग बाजार करून घरी जाते. तुम्हाला सगळे ओळखतात, आम्हाला कोण ओळखतं आणि आम्ही कोणाला ओळखतो ? जेवायला येणारी सगळी तुमचीच मंडळी आहे, हे आम्ही समजतो आहे. तुम्ही दोन हजार पान होईल हे सांगीतले असते तर आम्ही डगमगले नसतो. तुम्ही तुमच्या माणसांना आवरले नाही आणि आम्हाला बोलताय ? मोठेपणा तुम्हाला मिळतो आणि जीव आमचा चालला आहे. अहो, आम्ही तुमच्या गांवचे पाहुणे, पाहुण्याला जेवूखावू घालायची आपली रीत ! अजून आमच्या कोणाच्या पोटात सकाळपासून अन्न नाही आणि तुम्ही म्हणता की 'खायला मिळत नाही, म्हणून आलो.' म्हाताऱ्याचे डोळे भरून आले होते. त्याला बाजूला नेवू लागले. त्याने हात झिडकारला. 'याच्या बापाच्या लग्नाच्या बैठकीला मी होतो, हे याला काय सांगणार ? बाजाराच्या दिवशी, यात्रेच्या दिवशी कोणी लग्नकार्य ठेवते ? बाहेरचेच घुसून गोंधळ करतात ! यांचीच माणसं जेवली आणि हे आपल्याला बोलतां आहे. रहावले नाही, ते तो त्या बिचाऱ्या पोरीच्या बापाला बोलला म्हणून ! त्याचा काय दोष ? निरपराधाचा तळतळाट वाईट असतो. आता आपली पोरगी त्यांच्याकडे चालली, तो पण आपलाच झाला. त्याला आता या वेळी सांगायचे नाही तर केव्हा सांगायचे ? उद्या याला गरज पडली तर हे खाऊभगत मदतीला येणार आहे का हा आज उपाशी असलेला पोरीचा बाप याच्या मदतीला येणार आहे ?' --- म्हाताऱ्याचा अनुभव बोलत होता, लग्नमंडपातील सर्व सुन्न झाले होते.

१७ डिसेंबर २०१६

No comments:

Post a Comment