Saturday, June 3, 2017

समर्थाचिया सेवक वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे ?

समर्थाचिया सेवक वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे ?

आपल्या सरकारने अतिरेक्यांना घालविण्यासाठी भरभक्कम पाठींबा दिल्यावर सैनिकांची कामगिरी कशी होते हे पाहिले. तसेच मनाने संपूर्ण भारतीय जनता त्या सैनिकांसोबतच आहे आणि आपल्या सरकारच्याच पाठीशी आहे, मग ते कोणत्याही पक्षाचे असो हे देखील आपण अनुभवले. हा आपल्या भारतीय स्वभावाचा स्वाभाविक अविष्कार आहे, यांत काहीही नवल नाही. आपले भारतीय सैन्य निरंतर अभिनंदनांस पात्र असते, बऱ्याच वेळा अडचण असते ती राजकीय निर्णय घेणाऱ्या शासनाची ! काल या निर्णयाच्या, सैनिकी कारवाईच्या विरुद्ध सूर आळविलेला ऐकू आला नाही किंवा हा सूर इतका खोल होता की तो जाणवला नाही, पण तो होता; तो होता आणि आहे हेच महत्वाचे आणि काळजीचे कारण आहे. ज्या तडफेने, निष्ठेने आणि भावनेने आपल्या सैनिकांनी ही त्यांच्या कर्तव्यास साजेशी अशी आपण सर्वांना अभिमानास्पद कारवाई शासनाने, नागरी सरकारने दिलेल्या आदेशाप्रमाणे केली हे बरोबर आहे.
मात्र पुढचा यापेक्षा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो तो हा, की आज हा जो देशविरोधी, या कारवाईसंबंधी खोल स्वर ऐकू आला किंवा जरी काहींना तो ऐकू आला नाही तरी तो निश्चितच होता बरे; तसेच काहींनी तो काढला नाही पण त्यांना तो काढावासा वाटला, मात्र हे आसपासचे वातावरण पाहून त्यांनी योग्य वेळ नसल्याने काढला नाही, तरी त्यांच्या मनांत होतांच, या अशा लोकांचे करायचे काय ? सैनिकांचे, शासनाचे, सर्वसामान्य जनतेचे मनोधर्य खचते ते अशा लोकांना, त्यांच्या विचारांना ज्यावेळी पुष्टी मिळते, पाठींबा मिळतो त्यावेळी ! धोक्याची बाब आहे ती ही ! हीच आपल्या देशांत ज्या वेळी कधीही कोणत्याही कारणाने उद्भवणार नाही त्यावेळी आपण देशहिताच्यादृष्टीने योग्य दिशेवर आहे हे निश्चित समजावे, असे प्रसंग निर्माण होऊ नये याची जबाबदारी ही नेहमीच नागरीकांचीच आहे, ती जर आपण निर्भयपणे, कोणत्याही वैयक्तिक स्वार्थास वा हितसंबंधांस ठार न देता पार पाडणार असू तरच हि 'देशहिताच्या विरुद्ध असलेल्यांच्या नाशाची' दोन्ही बाजूने आघाडी उघडली जाईल. आजच्या काळांत तेच आणि फक्त तेच आवश्यक आहे. हे आपले भारतीय नागरिक म्हणून कर्तव्य आहे. हक्कांच्या बाबीसाठी आपण किती जागरूक असतो हे आपल्याला माहित आहे मात्र कर्तव्यकठोर राहून कर्तव्यांचे पालन केले नाही तर आपला हक्क केंव्हाही हिरावला, तो देखील कायमचा, जाऊ शकतो याची जाण ठेवावी. याचा अनुभव आपल्याला आहेच !
समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे
जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
दुसरी बाब तितकीच महत्वाची पण ती पाकिस्तानच्या नागरिकांसाठी अथवा 'पाकिस्तानी नागरिकांच्या विचारांच्या समर्थकांसाठी' -----
स्वातंत्र्यापूर्वीचा इतिहास पहा, हा देश एकच होता, त्यातील माणसे एकच होती आणि एकमेकांची शत्रू नव्हती. त्या देशातील जनतेने हा इतिहास जाणून घेणे, त्याचे आकलन करून घेणे हे त्यांचे कर्तव्य आहे आणि जर ते जाणून घेत नसतील तर तो जाणून घ्या, हे सांगणे त्यांच्या शासनाचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य जर पार पडले जाणार नसेल तर कर्तव्यच्युत होण्याचे जे परिणाम होतील ते त्यांना भोगावे लागणारच, त्यातून सुटका नाही !
एका घटनेने या एका देशाचे दोन भाग झाले, त्यानंतर त्या दुसऱ्या देशाच्या 'कार्यकर्तृत्वाने' पुन्हा दोन भाग झाले, अजूनही त्यांचे 'कार्यकर्तृत्वांत' काही फरक पडला आहे असे दिसत नाही ! हे जर द्वेषाचे, लुटमारीचे, अतिरेकी वागण्याचे, विनाशकारी कृतीचे वातावरण असेच राहिले तर समोरचे राज्यकर्ते आणि त्यानंतर जनता सहन करीत नाही हेच दिसून येईल. 'समोरच्याचा विनाश हीच आमची प्रगती' हेच ज्यांचे सूर असते त्यांची प्रगती कधीही होत नाही, व त्यांना कधीही निरंतर यश मिळत नाही, हे चिरंतन तत्व आहे हे लक्षांत ठेवावे. असे असतांना जर तेथील जनता आणि येथील, या भारतातील काही लोक की जे त्या पाकिस्तानी जनतेच्या आणि त्यांच्या विचारांच्या पाठीशी असणारे आहेत त्यांचे समर्थक असतील, त्यांना यापुढे असेच आणि हेच अनुभव घ्यावे लागतील. काही काळानंतर पाकिस्तानातील जनतादेखील त्यांना हेच अनुभव देतील याची जाणीव ठेवावी.

३० सप्टेंबर २०१६

No comments:

Post a Comment