Friday, June 2, 2017

एका मौंजीची कथा

एका मौंजीची कथा

दोन दिवसांपूर्वी एका ठिकाणी मौंजीच्या कार्यक्रमाला गेलो होतो, तेथे जवळपास दोन दिवस मुक्काम होता. छान गप्पाटप्पा सुरू होत्या, पाहुणे फारसे नव्हते. मौंजीबंधनाचे सर्व विधी झाले.
जेवणाची पंगत बसायची होती. मला गांवी परत निघायचे असल्याने घाई होती, हे मी सांगीतल्यावर - 'दोन पाने शिल्लक आहेत, बसता येईल' हे उत्तर मिळाले. मला इतकी घाई नव्हती पण मी पंगतीकडे निघालो. पहातो तर काय, सर्वस्वी अपरिचित म्हातारे चेहरे जेवायला बसले होते. माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून त्या बटूंच्या वडिलांनी स्पष्टीकरण दिले. आता सुन्न व थक्क होण्याची पाळी माझी होती !
ती पहिल्या पंगतीला जेवायला बसलेली सर्व मंडळी ही जवळच असलेल्या वृद्धाश्रमातील होती. घरच्यांनी 'जागा नसल्याने' वृद्धाश्रमात ठेवलेल्या या मंडळींना आपल्या घरच्या मौंजीबंधनाचे कार्यक्रमात सहभागी करून त्यांना घरच्या कार्यक्रमाचा आनंद देण्याची कल्पना खरेच वेगळी, जगावेगळी !
नातेवाईकांच्या, मित्रमंडळींच्या आग्रहास बळी न पडता, या घरावेगळ्या वडिलधाऱ्यांना आपल्या नातवंडांच्या मौंजीचे सोहळ्यात सामील करून, त्यांना दूर गेलेल्या घरपणाची भावना पुन्हा अनुभवायला देवून या माणसाने त्या वृद्धाश्रमातील लोकांना किती आनंदीत केले होते हे त्यांच्या जेवणांत असलेल्या लक्षापेक्षा चाललेल्या गप्पांमधून दिसत होते.
घरातील जागेत जागा नसणाऱ्या वृद्धाश्रमातील या मंडळींना हा आपल्या घरगुती कार्यक्रमात जागा देणारा गृहस्थाश्रमी मला आवडला.

२९ एप्रिल २०१६

No comments:

Post a Comment