Saturday, June 3, 2017

कै. डॉ. नरहर पुरुषोत्तम जोशी ! - रावेरचे संघाचे कायम कार्यालय


कै. डॉ. नरहर पुरुषोत्तम जोशी ! - रावेरचे संघाचे कायम कार्यालय 

नाशिक जिल्यातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग 'त्रिंबकेश्वर' येथील 'ज्योतिष्यातील गाढा व्यासंग' असलेले 'शासकीय वैद्यकीय अधिकारी' डॉ. नरहर पुरुषोत्तम जोशी हे रावेर, जि. जळगांव येथे नोकरीनिमित्ताने आले आणि त्यांनी आपली नोकरी सोडून रावेरलाच आपली कर्मभूमी मानली, तेथेच आपली वैद्यकीय सेवा रावेरच्या जनतेला द्यावयास सुरुवात केली. त्यांचे प्रशस्त घर आणि दवाखाना म्हणजे आमच्या सारख्यांना आमच्या घरापेक्षा वेगळे वाटतच नसे. मी शाळेत असल्यापासून त्यांच्याकडे घरगुती संबंध असल्याने जात असे. अगदी माझी मुलगी लहान असतांना नेहमी माझे सोबत येत असे, त्यावेळी 'तिच्या त्या आजीला' तिच्यासाठी खाऊ सापडत नसेल तर त्यांचे घरातील ना सापडणारे डबे या 'आजी-आजोबांना' ही तीन वर्षांची चिमुरडी सांगत असे ! ही गोष्ट झाली १९९६-९७ काळातील !
अगदी पूर्वीपासून म्हणजे त्यांच्या नूतन घराचे व दवाखान्याचे बांधकाम झाल्यावर 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' यांच्या येणाऱ्या प्रचारकांचे राहण्याचे ठिकाण म्हणजे त्यांच्या घराचे वरच्या मजल्यावरील स्वतंत्र खोल्या ! एवढेच नाही तर सर्व घरात त्यांना नेहमीच मुक्त संचार असे ! काहीवेळा ऐनवेळी परिवारातील कार्यकर्त्यांच्या मुक्कामाची अगदी कोणाचीही अडचण असली तरी ती रावेर येथे आम्हाला कधीही जाणवली नाही ती - कै. डॉ. जोशींमुळे ! अगदी संघाच्या कार्यक्रम घेण्यासाठी जागेची कधीही कोणतीही अडचण त्यांनी आम्हा रावेरवासीयांना कधीही जाणवू दिली नाही !
माझ्या तेथे नेहमी येण्याजाण्यामुळे परिवारातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पडणाऱ्यांच्या भेटीगाठी-ओळखी तेथे त्यांचेच घरांत विविध बैठकांच्या निमित्ताने, गप्पागोष्टींच्या निमित्ताने झाल्यात ! रावेर येथील अत्यंत विपरीत परिस्थितीत ज्यांनी भारतीय जनता पक्षाची धुरा सांभाळली ते आमदार आणि खासदार राहिलेले डॉ. गुणवंतराव सरोदे, सध्या केशव प्रतिष्ठानची जबाबदारी पाहत असलेले श्री. भरत अमळकर, रावेर येथील प्रसिद्ध डॉ. अनंत अकोले, शोभराजशेट चंदनानी, माजी आमदार अरुणदादा पाटील ! जुनेजाणते कार्यकर्ते काका शिंदे, नाना लष्करे, एकनाथराव अकोले, तसेच तरुण वर्ग म्हणजे जयंत कुलकर्णी, अशोक शिंदे, मधुकर बारी किती नावे सांगावीत ? एवढेच नाही तर सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्वाची जबाबदारी सांभाळत असलेले श्री. भैय्याजी जोशी, पुणे (शिरूर) येथील प्रसिद्ध वक्ते प्रा. सु. ह. जोशी, भारतीय जनता पक्षाचे शरदराव कुलकर्णी, जळगावचे जिल्हा प्रचारक राहिलेले शरदराव ढोले व सौमित्र गोखले, जळगांव जिल्ह्याची 'रा. स्व. संघाची' जबाबदारी असलेले श्री. बापूराव मांडे ! रावेरचे प्रचारक राहिलेले लालचंद टाटीया, अप्पा कुलकर्णी, नाना उपाख्य वि. वि. नवरे, अनिल वळसंगकर या सर्वांच्या भेटीगाठी तेथे होत असत ! यांतील काही नावे आता पडद्याआड गेलीत !
निसर्ग हा प्रत्येकावर परिणाम करत असतो ! वयोमानाने त्यांच्याकडून होईना, त्यांची दोन्ही मुले नाशिकलाच असतात, डॉ. उत्तमकुमार जोशी आणि श्री. विवेक जोशी ! हे त्यांना तेथे नेहमीच कायमसाठी बोलावीत असत, पण रावेरमय झालेल्या डॉ. नरहर पुरुषोत्तम जोशी यांना रावेर सोडून जाण्याची कल्पनाच सहन होत नसे, हे खूप वेळा माझ्याशी बोलत ! 'तिथे नाशिकला काय करणार ? येथे तुम्ही सर्व येतात, बैठक होतात, चर्चा होते मग त्यांत माझा सहभाग असला आणि नसला तरी काय फरक पडतो ? ज्योतिष्याची चर्चा होते, मुलांना संस्कृत शिकविण्यात वेळ जातो ! आनंद वाटतो ! तेथे गेले की माझे समाजातील अस्तीत्व एकदम कमी होऊन जाईल, सगळे आयुष्य येथे गेले' ------ पण निसर्ग आणि त्यांची नाती पक्की ठरली, साधारणतः १७ एप्रिल २००१ ला त्यांनी रावेर कायमचे सोडले आणि नाशिकला गेले, ते पुन्हा आपल्या गावी गेले, नाशिककर झाले ! आमच्या नेहमीच्या भेटीगाठी साहजिकच कमी झाल्या, मात्र नाशिकला गेलो की त्यांचेकडे एक चक्कर असायचीच ! गेली पंधरा वर्षे हा नेम सुरू होता ! अगदी माझी मुलगी नुकतीच दोन महिन्यांपूर्वी तेथे गेली तर त्या 'आजी-आजोबांना' झालेला आनंद तिला सांगतासुद्धा येईना ! त्यांच्या तेथे असलेल्या नातसुनेला एवढेच समजले की 'यांच्या हे खूपच जवळचे आहेत', त्यांच्या वागण्याने नवीन पिढीतील संबंध दृढ होण्याची शक्यता वाढली !
नुकताच आता त्यांच्या सुनेचा फोन आला, 'काल डॉ. नरहर पुरुषोत्तम जोशी गेल्याचे त्यांनी सांगितले' माझ्याशी काकू फक्त एवढेच बोलू शकल्या - 'तुमचे काका गेले' !
हा फोन आला आणि एवढ्या आठवणी झरझर आल्या ! आता डॉ. नरहर पुरुषोत्तम जोशी हे आपल्यात नाहीत, आठवणी काढत बसण्याव्यतिरिक्त आपण काय करणार ?

२५ जून २०१६

No comments:

Post a Comment