Saturday, June 3, 2017

चित्रपटाचे तिकीट काढणे - स्वतंत्र कला

चित्रपटाचे तिकीट काढणे - स्वतंत्र कला

सध्या मुलांच्या सहामाहीच्या किंवा सत्र परिक्षा सुरु आहेत, यानंतर मग दिवाळीची सुटी लागेल; हाच क्रम उन्हाळ्याच्या परीक्षेच्या वेळी असतो. पहिले वार्षिक परिक्षा आणि मग उन्हाळ्याची सुटी ! आताच्या परीक्षेच्या नंतर दिवाळीची सुटी लागत लागत असल्याने, सुटीचे कार्यक्रम बहुतांश ठरलेले असतात, कारण लगेच दिवाळी असते. मात्र उन्हाळ्याचे वेळी तसे नसते कारण नंतर नुसताच उन्हाळा असतो. सध्या परीक्षेचे प्रकारही बरेचसे बदलल्यामुळे परीक्षेचा जो 'टेम्पो' यायला हवा, तो देखील म्हणावा तास येतांना दिसत नाही, त्यामुळे सुटीनंतर विद्यार्थ्यांना तात्काळ जे चित्रपट पहायला जाणे आवश्यक असायचे, ते देखील आता फारसे दिसत नाही. त्याचे कारण अलीकडे चित्रपटांचा होणार कमालीचा भडीमार का चित्रपटांची एकंदरच घसरलेली प्रतिमा का 'घरोघरी चित्रपट बघावयास मिळती', कोणते आहे काही माहित नाही मात्र कोणतेही कारण असो पण चित्रपट पाहायला चित्रपटगृहावर जाणे हे एकंदरीत कमीच झालेले आहे असे वाटते, किंवा त्यासाठी आता वार्षिक परीक्षा होण्याची कोणी वाट पाहत नसावेत.
मला परिक्षा म्हटले की वार्षिक परीक्षाच डोळ्यापुढे येते आणि मग त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळचा 'शो' बघायचा किंवा कसेबसे थोपविले गेले तर दुसऱ्या दिवशी ! बस, खूप झाले ! मला पण एखादी अशीच मनोरंजक आठवण आठवते ! जळगावची 'अशोक टॉकीज' असावी बहुतेक ! आमची एस. वाय. अथवा टी. वाय. बी. कॉम. ची वार्षीक परीक्षा झाली होती. मग त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे सर्वानाच म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनाच हा 'शो' बघावयाचा असल्याने, चित्रपटगृहावर होणारी कमालीची गर्दी ! सर्व कॉलेजकुमार आणि ते पण परीक्षा संपल्यावर असलेले चित्रपटाला आलेले, मग काही विचारू नका ! 'आजच्या खेळाला गर्दी होणार', हे सिनेमाथिएटरच्या बाहेर शेंगदाणे विकणाऱ्याला, चित्रपटगृहाच्या मॅनेजरला, थिएटरांत तिकिटे विकणाऱ्याला, तेथे सायकली रांगेत लावणाऱ्याला आणि बाहेर सिनेमाची 'तिकिटे विकण्याचा ब्लॅकचा धंदा' करणाऱ्यालाही माहित असायचे ! मग ही गर्दी उसळायची !
तिकिटे काढणाऱ्यांमध्येही दोन प्रकार आहेत, सर्वसाधारण रांगेत उभे राहून तिकिटे काढणारे आणि आयुष्यांत कधीही तिकिटाच्या रांगेत न उभे राहता, रांगेत उभे राहणाऱ्यांपेक्षा लवकर तिकिटे काढणारे 'तिकीट तज्ञ' ! आमच्या वर्गातही परीक्षा संपल्यानंतर सिनेमाची तिकिटे काढणारे 'तज्ञ मित्र' होते, एरवी परीक्षेच्या वेळी ते कोणाच्या लक्षांतही येत नसत, मात्र परीक्षा संपल्यावर त्यांच्या आठवणींशिवाय आणि त्यांच्याशिवाय, 'तिकीट' हालत नसे. कारण सर्व मित्रांची म्हणजे किमान १५ - २० तिकिटे अशा गर्दीच्या वेळी काढणे म्हणजे सोपी बाब नाही, हे अलीकडच्या 'ऑन लाईन तिकिटे' काढणाऱ्या पिढीला माहित नाही. आमच्याकडे अशी २-३ तज्ञ मंडळी होती. त्यांच्याकडे सर्वांनी तिकिटाचे पैसे सोपवायचे आणि बाकीच्यांनी मग 'शेंगदाणे' वगैरे याची हॉलमधील व्यवस्था पहायची अशी कामाची विभागणी असायची.
थिएटरवर आल्यावर तिकिटे काढण्याचे अगोदर ही 'तज्ञ' मंडळी कधीही खिडकीपाशी उभी रहाणार नाही, ते त्यांना अतिशय कमीपणाचे आणि अपमानास्पद वाटत असे. आम्ही मात्र 'न जाणो यांना तिकीट मिळाले नाही तर ?' या विचाराने खिडकीपाशी नंबर लावून उभे असायचे आणि आमच्यासारखे इतरही असायचे. त्यांच्यासारखे मात्र तिकिटे सुरु होण्याअगोदर आमच्याकडे तुच्छतेने पहांतआमची गंमत निवांत बघायचे, कारण एरवी त्यांना तसे शक्य नसे. आजचा दिवस त्यांचा असायचा ! तिकीटाची खिडकी उघडली जाईल अशा आतून होणाऱ्या हालचालींचा माग यांना दुरूनही लागायचा, मग ते त्यांचा शर्ट काढायचे, 'हो, हो' असा आवाज सुरु व्हायचा . मग आमच्या लक्षांत यायचे आता खिडकी उघडणार ! खिडकी उघडायची, कसेबसे एखादे तिकीट कोणाला दिले आहे किंवा नाही तोच मागून कोणीतरी तिकिटे काढणाऱ्यांच्यावर उघड्या अंगाने पोहतपोहत, हो, अगदी हाच शब्द योग्य होईल, यायचे ! आपसूकच कोणालाही काहीही न समजता कोणी आपोआप खाली बसायचे, कोणी बाजूला लोटले जायचे, कोणाचा हातच त्या खिडकीत अडकून बसायचा आणि तिकिटे मिळणे दूर, तो हातच बाहेर कसा काढावा या प्रयत्नांत तो असायचा ! अशात काही वेळा तिकिटे मिळायची, काही वेळा नुसताच दुखावलेला हात बाहेर यायचा आणि काही वेळा पैसे जायचे मात्र तिकीटविना हात जोरांत बाहेर खेचला जायचा ! या गोंधळांत भर म्हणून त्या 'तिकिटांच्या खिडकीजवळ' तिथे एक गटारही आहे. अशावेळी घाईगर्दीत काही सर्वसाधारण तिकिटे काढणारे त्या गटारीचाही आश्रय घ्यायचे ! मात्र याह कसलाही परिणाम न होता आणि याचेमागे यांचेच कर्तृत्व असणारी ही 'तज्ञ मंडळी' त्यांना सांगितलेली तिकिटे बरोबर पहिल्या पांच मिनिटाचे आंत घेऊन यायची ! आम्ही निष्कारणच 'हुश्श' करायचो आणि आंत थिएटरांत प्रवेश करायची लगबग करायचो. 'तज्ञ मंडळींना' असे सिनेमा सुरु होण्याचे अगोदर, कोरा पडदा पहायला, आंत जायला आवडत नसे ! ते सिनेमा सुरु झाल्यावर लोकांच्या पायावर पाय देत येत असत. त्यावेळी 'सीटचे नंबर' हा प्रकार खूप असा प्रचलीत नव्हता, त्यामुळे जागा मिळेल तेथे बसावे लागे.
आम्ही तिकिटे घेऊन आत थिएटरांत शिरलो, मी माझ्या खुर्चीवर बसलो. मात्र एका खुर्चीचा मला संशय आला की ती बरोबर नसावी. मी हाताने चाचपून पाहिली, तो तिचे 'सीट' म्हणजे बसण्याची जागा स्थिर राहत नसे आणि बसणारी व्यक्ती त्या खुर्चीत फसू शकेल असे मला वाटले. आता मला चित्रपट सुरु होईपावेतो एक कामाचं लागले ! त्या खुर्चीच्या सीटवर हात ठेवून 'बसू नका, चांगली नाही' हे सतत सांगण्याचे ! परीक्षा संपल्यानंतरचा हा 'खेळ' असल्याने गर्दी खूप होती आणि त्या गर्दीचा स्वभाव हा कॉलेजवीरांचा होता, यावरून काय ते लक्षांत घ्या ! चित्रपट सुरु झाला आणि माझे लक्ष त्या खुर्चीवर हात ठेवून 'बसू नका, चांगली नाही' , हे सांगण्यावरून उडाले. आणि तेवढ्यांत एक जण घाईघाईत आला आणि त्याला मी 'अरे, अरे' म्हणेपर्यंत बसलाही ! ----- आणि मग त्या खुर्चीने जी काही तात्काळ यांत्रिक करामत दाखविली की वर्णन करून सांगता येणे अवघड ! पहिले 'फट्ट' आणि नंतर 'धप्प' असा आवाज आला आणि पाठोपाठ 'टर्रर्रर्रर्र' असा आवाज आला ! त्याचे हात आणि पाय एकाच दिशेला, वर आकाशाकडे ! आजपर्यंत मी असे कोणतेही योगासन इतक्या तत्परतेने कोणी केलेले पाहिले नव्हते ! मग हे असे झाल्याने, त्याने घाईगर्दीत असे काही तात्काळ चमत्कारिक 'योगासन' विलक्षण कौशल्याने केले की विचारू नका ! तो त्या खुर्चीची सीट आकाशाला लंब झाल्याने, त्या खुर्चीची पाठ तिला समांतर झाल्याने आणि त्याची सीट व पाठ यांच्या गड्ड्यांत अडकला. त्याला उठताही येईना आणि सावरताही येईना, त्या खुर्चीत तो फसला ! मी माझ्या खुर्चीवरून उठलो आणि जमिनीवर मांडी घालून काही करता येते का म्हणून बसलो. मी जमिनीवर बसल्याचे येणाऱ्याच्या लक्षांत न आल्याने तो माझ्या अंगावर आदळला. तेंव्हा शेजारचा 'खऱ्या अर्थाने प्रेक्षक' असलेला उठला आणि या सर्वांच्या अवस्थेची पाहणी करून सूचना देऊ लागला. खुर्चीत अडकणाऱ्याची अवस्था अवर्णनीय झाली. शेवटी लक्षांत आले याला खुर्चीच्या खालून उचकवा, तेंव्हा हा वर उठेल, मग मी तसे केले, त्याला धडपड करायला का होईना पण जरा फावले, तो कसाबसा खुर्चीचा आधार घेत उठला आणि खुर्चीच्या बाहेर एकदाचा आला. इकडेतिकडे पाहिले, अंधारात विशेष काही दिसत नसल्याने त्याला बरे वाटले असावे असा मी निष्कारणच अंदाज केला. त्याला उठता आल्याबरोबर त्याने सर्वांत प्रथम काही केले असेल तर 'कोंडवाड्यातून ढोर जसे बाहेर पडल्यावर शेपटी उधळत पळते', तसा नंतर तो तात्काळ थिएटरच्या बाहेर इकडेतिकडे न पहाता पडला आणि दिसेनासा झाला. ------ आणि हा सिनेमा संपल्यावर मी तिकीट काढून पहायला आलेला सिनेमा पाहू लागलो !

७ ऑक्टोबर २०१६

No comments:

Post a Comment