Saturday, June 3, 2017

ही पुस्तके हवीत आपल्याजवळ

ही पुस्तके हवीत आपल्याजवळ

आज नागपूरला कामानिमीत्ताने आलो होतो. येथे शासकीय मुद्रणालय आहे, याचप्रमाणे मुंबई, औरंगाबाद, पुणे येथे पण आहेत. महाराष्ट्र शासनाने, भारत सरकारने आपल्या उपक्रमातून खूप चांगली चांगली, साहित्यमूल्य असणारी पुस्तके अतिशय योग्य किंमतीत, किंबहुना सर्वसामान्य वाचक घेवू शकतील अशा किंमतीत प्रसिद्ध केलेली आहेत. कित्येक पुस्तके तर अशी आहेत की त्यांची योग्यता खूप आहे पण वाचक नाही, अशावेळी कोणताही हिशोबी प्रकाशक अशी पुस्तके प्रसिद्ध करावयास कधीही तयार होणे शक्य नसते.
मी आपला कोठेही गेलो की कामातून वेळ मिळाला की अशा ठिकाणी आवर्जून जातो, त्या निमित्ताने मनांत घोळत असलेली पुस्तके एखादेवेळी मिळून जातात, काहीवेळा माहीत नसलेली पण मिळून जातात. या सगळ्या गोंधळांत काहीवेळा मित्रांना भेटणे राहून जाते, काहीवेळा मी येवून गेल्याचे नंतर समजते, काहीवेळा माझ्या हाती काहीही न लागता नुसताच हेलपाटा होतो; पण स्वभावाचे औषध अजून तयार व्हायचे आहे.
आज मी नागपूरला शासकीय मुद्रणालयात गेलो, काही कायद्याची पुस्तके घेतली. सहज बघताबघता डॉ. शरच्चंद्र विष्णु गोखले यांचे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंढळाचे 'लयतालविचार' हे संगीतावरील अप्रतिम पुस्तक दिसले, तात्काळ उचलले व घेतले. याचे निवेदन तर्कतीर्थ लक्षमणशास्त्री जोशी यांचे आहे कारण त्यावेळी ते मंडळाचे अध्यक्ष होते. या ग्रंथाचा अतिशय सुरेख, मोलाचा व तपशीलवार परिचय 'वामन हरि देशपांडे' या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीने करून दिलेला आहे.
या कायद्याच्या किचकट, काही वेळा कंटाळवाण्या व कटकटीच्या वाटणाऱ्या क्षेत्रात काही वेळा माझी शास्त्रीय संगीताची आवड मला विरंगुळा देवून माझे श्रम हलके करते. हे पुस्तक चाळल्यावर आजच्या कामाचे श्रम हलके झाल्यासारखे वाटताहेत !

३० ऑगस्ट २०१६

No comments:

Post a Comment