Friday, June 2, 2017

अशीच एक इच्छा - महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल

अशीच एक इच्छा - महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल

आता आपली नितीमूल्ये इतपत खाली, हीन पातळीवर येवून पोहोचली आहेत की लोकांनी निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्यांचा अपघातातून जीव बचावला तर आपणांस हळहळ वाटते, दु:ख वाटते, आपण त्यांच्या मृत्यूची अपेक्षा करतो ?
राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा मृत्यू व्हावा ही इच्छिणारी व स्वत:ला शेतकऱ्यांचे तारणहार म्हणवून घेणारी ही मंडळी कोण आहे ? यांना आजपावेतो शेतकऱ्यांची इतकी काळजी होती तर शेतकरी या अवस्थेला पोहोचलाच कसा ? आजही एका एकरांत काही लाख, कोटीचे उत्पन्न काढणारी मंडळी, यांचे नेते आहे यांतीलच !
अडचणी फक्त शेतकऱ्यालाच असतात, इतर कोणालाच नाही ?
दिवसभर उन्हातान्हात फिरून दारोदार रद्दी मागत फिरणाऱ्याला नसतात ?
बाजारात सडका भाजीपाला काळजीने उचलून घरी घेवून जाणाऱ्यांना, धान्याबाजारातील धान्य सांडलेली माती वेगळी करून त्यातील धान्य सायंकाळपर्यंत सुपलीने साफ करून लेकरांसाठी घरी घेऊन जाणाऱ्या माता खूप सुखात आहेत ?
कामगार चौकात हातात आपल्या अवजारांची पिशवी घेवून दुपारपर्यंत उन्हात उभे रहात नाईलाजाने घरी जेवायच्या नांवाने व रिकाम्या हाताने परत जाणाऱ्या कामगाराची मजा असते ?
दिवसभर उन्हात रूपया दोन रूपया मिळेल या आशेने भाजी विकणाऱ्यांची संध्याकाळी अवस्था बघवली जात नाही, त्यांना अडचणी नसतात ?
महिना आठ हजार कुटुंबाला पुरत नाही म्हणून स्वत:च्या मुलाला लोकांच्या शिव्या ऐकायला त्याचा बाप 'कॉल सेंटर'वर नोकरीला लावतो, त्याला अडचण नसते ?
शिक्षणासाठी व सर्व सोयी सवलतीसाठी सरकार दरबारात उच्चवर्णीय समजला गेलेला पण समाजात प्रत्यक्षात हीनतम स्थान असलेला व क्षणोक्षणी त्याची लायकी जातीवरून काढली जाते तो, आपल्या मुख्यमंत्र्यांच्याच जातीचा दरिद्रीनारायण ब्राह्मण पिता त्याच्या मुलामुलींसाठीही शिक्षणाची फी भरू शकत नाही, त्यांचे शिक्षण बंद पडते, त्यांना अडचणी नसतात ?
ही सर्व मंडळी या अपघातात मुख्यमंत्री बचावले म्हणून दु:ख करणाऱ्यांची कोणीच नाही ? या शेतकऱ्यांचे तारणहार म्हणून गळा काढणाऱ्यांनी काय दिले आहे हो शेतकऱ्यांना ? यांची शेती दरवर्षी कशी भरभराटीस येते आहे, वाढते आहे ?
खरे ओळखणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. सोन्यालाच कस लागतो कोळशाला नाही, त्याला फक्त घोटाळा लागतो.
राजा, राज्यकर्ता आपण जगन्नाथाचा, विष्णूचा, देवाचा अवतार मानतो. देवाच्या मरणाची इच्छा करणारे फक्त राक्षसच असतात हीच आमची संस्कृती सांगते.
मा. देवेंद्र फडणवीस परमेश्वर आपल्या पाठीशी राहो आणि आपणाकडून या समाजावरील, जनतेवरील संकट कायमचे दूर करण्याची शक्ती आपणांस देवो हीच प्रार्थना !

२५ मे, २०१७

No comments:

Post a Comment