Friday, June 2, 2017

सौ. शुभदा पराडकर - एका भेटीची गोष्ट

सौ. शुभदा पराडकर - एका भेटीची गोष्ट

गेल्या साधारण चार-पाच वर्षांपासून मी येथे फेसबुकवर असेन. पूर्वीची नवलाई आता राहिलेली नाही. पूर्वी येथील व्यक्त होणाऱ्या मतांमध्ये आंतरिक कळकळ जास्त व प्रचारकी थाट जरा कमी असायचा ! पोस्टचे व त्यावरील प्रतिक्रीयांचे स्वरूप बहुतांशपणे ओट्यावरल्या वा पारावरल्या गप्पा असे निर्व्याजतेकडे झुकणारे असायचे. आपल्याला त्यातून काही मिळवायचे नसायचे, मिळायचा तो निखळ आनंद ! रिकाम्या गप्पांमधून अजून काय मिळणार आहे. पण ह्या रिकाम्या गप्पाच, आपल्या सर्वांच्या मनाच्या आरोग्यासाठी चांगल्या असतांत. प्रत्येक ठिकाणी मिळणारा लाभ हा पैशांच्या स्वरूपातच मिळतो किंवा मिळायला पाहीजे, असे अपेक्षित करावयास नको.
माझ्याकडून येथे अधूनमधून काही लिहीले जात असते. काही वेळा संगीतावर, काही वेळा राजकीय, सामाजिक घटनांवर आणि काही वेळा लिहीले जातात माझ्या स्वत:च्या आठवणी व अनुभव ! कायद्यांवर मी क्वचितच येथे लिहीतो कारण तिकडील कामातून जरा विश्रांती मिळावी म्हणून येथे असतो. येथे येणाऱ्या प्रतिक्रिया काही उत्साह वाढविणाऱ्या असतात तर काही उत्साहभंग करणाऱ्या पण असतात; पण हेतू वेगळ्या कामातून विश्राम मिळावा हा असल्याने काही बिघडत नाही.
येथे मी काही अनुभव लिहीले तर त्याला काही वेळा चांगल्या, मनापासून आणि प्रामाणिक प्रतिक्रिया येतात असे जाणवते. आपल्याला आपलीच ओढ आंतून असते, हेच खरे. यांतून काही मनाने, विचाराने जवळ येतात. भेटीचा योग येतो. आजपावेतो यांतून भेटीचा योग आला तो सनदी लेखापाल श्री. चेतन किशोर जोशी व विख्यात पत्रकार श्री. प्रवीण बर्दापूरकर यांचा. अतिशय मौल्यवान भेटी व माणसं !
परवा अशीच एक मौल्यवान भेट झाली ती सौ. शुभदाताई पराडकर यांची ! हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील वजनदार नांव ! मी येथील लिहीलेले काही वाचल्यावर 'तुम्ही लिहीलेले वाचून ते मला माझ्या जुन्या काळांत घेवून जाते. एकदा घरी या.' सौ. शुभदाताईंचे मनापासून, साधे व निर्व्याज निमंत्रण पाहून मला निश्चितच आनंद झाला. मी मेसेज पाठवून माझा संपर्क क्रमांक पाठविला. थोड्या वेळाने फोन, 'मी शुभदा पराडकर बोलतेय. -------' भेट ठरली.
त्यांचे घरांत गेल्यावर, कुठे परक्या ठिकाणी आलो असे वाटलेच नाही; ते त्यांनी आम्हास घरांतील सर्व मंडळींचा करून दिलेल्या मनमोकळ्या परिचयाने, का परिचय करून देतांना त्यांच्या असलेल्या आपुलकीच्या, आतिथ्यशील स्वराने, कोणास ठावूक ? त्यांच्या मनांतील भाव हे केवळ त्यांच्या गाण्याचेच वेळी अचूक स्वरलगावाने व्यक्त होत नाहीत तर पाहुण्याचे स्वागत करतांना पण स्वर हे तेवढेच प्रामाणिक, अचूक व स्वच्छ असतात !
त्यांच्याशी बोलताबोलता श्री. पराडकर हे आमच्या भागांत त्यांच्या लहानपणी होते, हे ऐकल्यावर मात्र आमच्या बोलण्यातील उरलासुरला परकेपणा संपुष्टात आला व त्यांना गप्पांचे स्वरूप आले. गांवाकडील माणूस बरीच वर्षे गांवी न भेटलेल्यास परक्या ठिकाणी भेटल्यावर जशी दोघांतील संवादाची देवाणघेवाण होते तशी अवस्था झाली. मग गप्पांत सर्व घरच सहभागी झाले. जुन्या माणसांच्या आठवणी, घरांच्या आठवणी, बरेच वर्षांत भेट नसल्याची जाणीव ! माझ्या आईची संगीतातील गोडी, आमच्या भागातील या संगीत क्षेत्रातील मंडळी. गप्पा कशा रंगल्या हे स्वच्छ दिसत होते. कसा वेळ गेला ते समजलेच नाही. गप्पांत इतका गुंतलो की त्यांनी अगत्याने आणलेला फराळ चांगला झाला, हे सांगण्याचे सौजन्य देखील मी दाखवले नाही, असे मला वाटते. त्याबद्दल सौ. शुभदाताईंमधील आतिथ्यशील गृहीणी मला माफ करेल. अहो, मला त्यांच्या रेकॉर्डस्, कॅसेटस् इ. काहीही बघतां आल्या नाही; तेथे ऐकणं तर फार दूर ! फक्त त्यांच्या नातवाला आमच्या गप्पांची गंमत वाटत असावी.
या सर्व गप्पांमधून सरतेशेवटी माझ्यापुरता हा निष्कर्ष निघाला की आजची भेट अजिबात पुरेशी नाही. ही ओळख आता फेसबुकी ओळख राहिली नसून, जुनी व एका गांवातील पण नव्याने समजलेली ओळख आहे. त्रयस्थपणे वागण्याचे काही कारण नाही. आपणा सर्व कुटुंबीयांना पुन्हा भेटावे लागणार आहे. मला खात्री आहे या निष्कर्षाशी त्या सहमत असतील.
बाकी काही नाही पण त्यांनी गायलेला 'श्री' राग या निमित्ताने ऐकू. प्रभू रामचंद्रांचे व रामपंचायतीचे चित्र उभे करणारी ही चीज !

२१ मे २०१७

No comments:

Post a Comment