Saturday, June 3, 2017

अय्यानार मेस

अय्यानार मेस

आज इकडे चेन्नईला आहे. ज्या भागांत काम आहे, तिकडे उतरलो. गेल्या काही वेळेचा अनुभव लक्षात घेता सोबत खाण्याचे पदार्थ आणले होते, ते सकाळच्या खाण्यातच संपले. नेहमीची जेवणाची वेळ झाली. आज पुन्हा वेगळ्या ठिकाणी जावे, म्हणजे ते तरी मनाजोगते मिळते का पहाता येईल, या हेतूने पायी चालतचालत थोडा दूर गेलो.
देवाच्या नांवाची जरा बऱ्यापैकी हॉटेल्स एकाच इमारतीत दिसली, एकाच मॅनेजमेंटची किंवा मालकीची दिसली. देवांचें नांव असले की काय पण त्यांच्या 'दैवी गुणांचा' माझ्यावर प्रभाव पडतोच ! आपल्या धर्मनिरपेक्ष, सर्वधर्मसमभाव अपेक्षीत असलेल्या या देशांत हे कितपत चालते किंवा चालेल हा विचार अजिबात मनांत येत नाही. ही माझ्या मनाची उत्स्फूर्त प्रतिक्रिया असल्याने मला त्यातून पुरेशी सूट असावी हा मी माझ्यापुरता समज करून घेतलेला आहे.
तर त्यातील जरा झकपकीत हॉटेल मुख्य रस्त्याला लागून असलेले स्वाभाविकच प्रथम दिसले. दुकानाच्या नांवाच्या बोर्डवर, दुकानाच्या आंतील कपाटात वेगवेगळ्या आकाराच्या रंगीत द्रव भरलेल्या बाटल्या दिसल्या. या सर्व बाटल्यांचे प्रतिबिंब त्या गल्ल्यावर बसलेल्या माणसाच्या चेहऱ्यातही मला दिसले. निष्कर्ष काढला असे प्रतिबिंब आपल्या चेहऱ्यावर आजपावेतो उमटलेली नाहीत, मी तात्काळ तेथून बाहेर पडलो व त्यांच इमारतीतील शेजारच्याच पण पाठीमागच्या हॉटेलमध्ये शिरलो.
हे पाहून मी जरा प्रसन्न झालो. सर्व खाद्यपदार्थाची नांवे तामिळीत लिहीली होती व आकडे तामिळ आणि इंग्रजीत लिहीले होते. त्यावरून काहीतरी अंदाज बांधण्याचा प्रयत्न सुरू होता. तेथील वेटर माझेजवळ आला, त्याने त्याच्यापरिने तेथे काय मिळते ते सांगीतले. त्यावरून मला काही फारसा बोध झाला नाही पण त्याला मी 'लंच' हे सांगीतले. थोड्याच वेळात त्याने एका मोठ्या थाळीत पाच-सहा लहान वाट्या त्यात तो सांगत असल्याप्रमाणे रसम्, सारम्, सांबार, ताक, भाज्या, पापड आणि एका मोठ्या वाडग्यात मला निदान आठवडाभर पुरेल इतका भात आणून ठेवले, तो निघून गेला.
त्याला मी पुन्हा बोलावले व अजून कोणते पदार्थ जेवणांत आहे ते विचारले. त्याने 'फिनिश' सांगीतल्यावर तर तो भल्यामोठ्या वाडग्यातील भात मला दहा दिवस पुरेल असे वाटू लागले. एरवीपण मला भात, खिचडी हे पदार्थ फारसे आवडत नाही किंबहुना हे जेवणातले एक पदार्थ आहे. यांनीच जेवण करायचे नसते, ही माझी समजूत ! माझी आणि त्या वेटरची होत असलेली संवादाची भिन्न दिशेने चाललेली जुगलबंदी पाहून त्याच्या मदतीला तेथील एक बऱ्यापैकी चटपटीत महिला आणि पुन्हा दोन वेगळे वेटर आले. सगळ्यांनी माझ्याशी संवाद साधल्यावर त्यांना हे समजले की हे गिऱ्हाईक काही झाले तरी एवढा भात खाणार नाही, त्याला दुसरे काही तरी द्यावे लागेल. मग चपाती, रोटी, तंदुर-रोटी, तवा रोटी हे परिचित शब्द कानी पडल्यावर माझ्या चेहऱ्यावरची ओळखीची तृप्ती त्यांना समजली. 'ओन्ली तंदूर-रोटी' त्यांनी सांगीतले, मी होकार भरला. त्यांनी भात सोडून इतर पदार्थ कसे चांगले आहे याची भलावण केली. त्यांचे माझे काहीच वाकडे नसल्याने, मी 'ओके' म्हणून विषय संपवला ! तो वेटर ते भलेमोठे ताट, त्यातल्या वाट्या व मला निदान दहा दिवस पुरला असता एवढा भात असलेले वाडगे घेवून गेला. मी सुटकेचा निःश्वास सोडला. तेवढ्यात शेजाऱ्याने त्या दरम्यान त्याची मागविलेली 'लंच' खाणे सुरू केले. त्याने तो वाडग्यातून ओतून घेतलेल्या भाताचा ढीग पाहिल्यावर मी अतिशय योग्य निर्णय भुकेलेपोटीसुद्धा घेतला याचे मला समाधान झाले.
माझ्यासाठी शेजारच्याच त्यांच्या हॉटेलमधून आणलेल्या तंदुरी-रोटी मला दाखवल्या. माझा होकार पाहिल्यावर पुढेची कामे पटपट झाली. केळीचे पान आणले गेले, त्यांवर पाणी शिंपडून व पुसून ते स्वच्छ केले गेले. त्यांवर पूर्वीच्या मोठ्या ताटातील सर्व वाट्या आणि बाजूला तंदुरी रोटींची छोटी परडी ! माझे जेवण सुरू झाले, पदार्थांबद्दल काही तक्रार नव्हती-ती बहुतांश नसते ! त्याच्या इच्छेखातर मी लिंबाएवढा भात व रसम् घेतले. जेवण झाले. बील द्यायला गेलो, त्याने बील केले. ते इंग्रजीत होते. बीलाचे पाहिल्यावर मी विचारले, त्याने त्याच्या भाषेत सांगण्याचा मतितार्थ ! 'भाजीचे पैसे मी लावले नाही, रोटीचेच लावले.' मी पैसे देवू लागल्यावर त्याने घेतले नाही, त्याचे संभाषण पूर्ण समजले नाही पण अर्थ व त्यामागील भाव समजला.
------'साहेब, तुम्ही कोण, कुठचे ? इतक्या लांबून तुम्ही भुकेले आमचेकडे जेवावयास आलात. तुम्ही मागीतले ते आमचेजवळ नव्हते, आम्ही दुसरीकडून विकत आणले, त्याचेच पैसे द्या. सोबत आम्ही दिलेल्या भाज्यांचे काय पैसे घ्यायचे ?'
भिन्नभिन्न भाषांमध्ये एकाच संस्कृतीच्या वहात असलेल्या झऱ्याचे दर्शन अजून ते कोणते वेगळे दर्शन हवे ? देवांचे नांव असलेल्या हॉटेलमध्ये दैवी गुण असलेली माणसे असतात म्हणूनच ते नांव शोभून दिसते. ----- अय्यनार मेस !

१८ ऑक्टोबर २०१६

No comments:

Post a Comment