Friday, June 2, 2017

आपला लज्जारक्षक अर्थात 'टेलर'

आपला लज्जारक्षक अर्थात 'टेलर'

शालेय जीवनातून महाविदयालयीन जीवनाची किंवा अलिकडच्या भाषेत बोलायचे म्हटले तर उच्च माध्यमिक जीवनांत प्रवेश करायचे वेळी आपल्यात जे काही बदल होतात, त्यात एक महत्वाचा बदल होतो तो म्हणजे आपल्याला 'शालेय गणवेश' नसणे किंवा 'हाप चड्डी' ऐवजी 'फूल पॅंट' घालायची परवानगी मिळणे ! मग फक्त 'शालेय गणवेश' जो आम्हाला 'खाकी चड्डी व पांढरा सदरा' असा होता, तोच बदलत नाही तर नंतरही 'फूल पॅंट' नियमीत परिधान करणे सुरू होते. अर्थात अलिकडे तसे काही फार राहिले नाही असे दिसते कारण छोटी पॅंट न सावरता येणारी मुले 'फूल पॅंट' घालून रूबाब दाखवत फिरतात; तर मोठे टोणगे 'आखूड चड्ड्या' घालून फटिंगासारखे रस्त्यावर फिरतात. अगदी निवांतपणे ! त्यांच्याकडे इतर पहात असतात, याकडे त्यांचे लक्ष असते पण लक्ष नाही असे त्यांना दाखवावे लागते. कपड्यांचा उद्देश हा शरीररक्षण व लज्जारक्षण या ऐवजी 'शरीरदर्शन व लज्जा निर्मीती' (पहाणाऱ्यांस) असा बदलला असावा की काय ? पण रोज वय वाढत असल्याने, शरीर वाढते त्यात बदल होत असतात, त्यानुरूप कपडे घालावे लागतात.
मला आता नविन व पहिलीच 'फूल पॅंट' शिवायची असल्याने मग ती सर्वात भारी टेलरकडे शिवायला टाकणे क्रमप्राप्त होते. आता आमचे गांव ते कितीसे मोठे, तालुक्याचे गांव ! तेथे 'रमेश टेलर' या नांवाचे शिंप्याचे दुकान होते. गांवाच्या मानाने एकदम भारी टेलर ! हा म्हणजे, याचा भारीपणा काय सांगावा ? कपडे शिवायला टाकल्यावर त्याची पावती देणारा, कपडे केव्हा मिळणार याची पुढील तारीख पावतीवर आणि त्याला आपल्यासमोर आपल्याच कपड्याच्या कोपऱ्याचा छोटा तुकडा भल्यामोठ्या, चकचकीत कात्रीने 'क्रॅंच क्रॅंच' असा आवाज करून तो तुकडा, लगेच 'स्टेपलरने' पावतीला स्टेपल करणारा ! सर्व बाबी नविनच, आपल्या 'फूल पॅंट' बद्दल आहे म्हटल्यावर तर अप्रूपच !
आमचा पूर्वीचा टेलर म्हणजे शिंपी कसा असायचा ? त्याचेकडे आपले कपडे शिवायला टाकतांना तो आपले माप घेतो आहे का आपल्याला त्याच्या टेपने गुंडाळण्याचा प्रयत्न करतो आहे, हेच समजत नसे. त्याची इच्छा तर 'यांत काय माप घ्यायचे आणि वेळ वाया घालवायचा ?' हे स्पष्ट डोळ्यातून दिसत असे. पण मला माप देण्याचा उत्साह असल्याने, त्याचा होणारा कालापव्यय तो सहन करून माझे कपडे शिवण्यासाठी नाईलाजाने माप घेत असे. कपडे शिवण्यापूर्वी माप यासाठी घ्यायचे असते की ते कपडे शिवल्यानंतर आपल्या अंगावर तरी बसले पाहीजेत. त्यांनी सांगीतल्या दिवशी कपडे नक्कीच मिळणार नसतात, पण त्या दिवशी त्यांना आठवण द्यायला जावे लागायचे की 'मी तुमच्याकडे कपडे टाकलेले आहेत.' मग न पहाता ते सांगायचे, 'पुढच्या आठवड्यात ये.' पुढच्या आठवड्यात गेल्यावर मग 'हे 'काजबटण' राहिले आहेत.' असे सांगणार ! मात्र त्याचवेळी आपल्या कापडाचे कापलेले तुकडे तिथेच बघायला मिळायचे. आता कापडाचे तुकडेदेखील लपवून न ठेवता 'फक्त 'काजबटण' राहीलेत', असे सांगून इतका पारदर्शक व्यवहाराचा आदर्श ठेवणारा शिंपी विरळाच ! अलिकडे निष्कारणच पारदर्शक व्यवहाराचा आग्रह केला जातो. पण मग एखाद्या आगावू मुलाने विचारलेच की 'काका, हे कापड तर माझेच दिसते आहे. आत्ताच कापले वाटतं !' यांवर अजिबात डगमगून न जाता ते जर आपल्या मूळ व्यावसायीक मूडमधे असतील तर 'हे असे कापड काय तू एकटाच घेणारा आहे का ? खूप जण घेतात.' असे राजकीय उत्तर मिळणार ! मात्र खरोखर काकांच्या मूडमधे असेल तर 'कारे, आजच घालायला कपडे नाहीये का ? देतो नंतर. तुझे वडील अलिकडे आले नाही रे, भेटले की बरे वाटते.' असे उलट सांगून हा निरोप द्यायला मला घरी पिटाळायचे !
पण आता त्या जुन्या घरगुती वातावरणांतून मी नविन वातावरणांत येणार होतो. नवीन 'फूल पॅंट' टाकायची म्हणजे झकपकीत कपडे शिवणारा 'रमेश आंबेकर' ! गोरापान, देखणा ! दोन्ही पाय अपघातात दुर्दैवाने गमविलेले, पण तरी जिद्द न हरणारा, जीवनांतील आलेल्या या संकटास न डगमगणारा हिंमतबहाद्दर ! शिवायच्या मशीनला 'इलेक्ट्रीक मोटार' बसवून शिलाई मशीनवर कपडे शिवणारा ! कट्टर हिंदुत्ववादी ! त्याच्याकडे मी माझ्या आयुष्यातील पहिली 'फूल पॅंट' शिवली. आता हा 'रमेश टेलर' आमच्या गांवी रहात नाही, आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात जगरहाटीप्रमाणे त्याच्या मुलाकडे पुण्याला गेला आहे असे ऐकतो.
त्याच्याकडे नेहमीच शिकावू चार-पाच कारागीर असत. त्यानंतर त्यातलाच एक माझा कायमचा शिंपी बनला ! श्री. महाजन ! याचा आमच्या घराशी परिचय त्याच्या आजोबापासून ! मी औरंगाबादहून सुमारे सव्वादोनशे किलोमीटर दूर असलेल्या आमच्या गांवाला शिवण्यासठी कपडे बऱ्याच वेळी पाठवतो. अलिकडे माझे नेहमी जाणे होत नाही, आणि खरं म्हणजे जावे असे वाटणे पण कमी झाले आहे. मग माझे जेव्हा जाणे जमेल त्या एकाच वेळी जास्त ड्रेस टाकायचे. त्याला त्यानंतर येथून औरंगाबादहून फोन करायचे, 'कपडे झाले का ?' तो नेहमीच सांगणार, 'दोन दिवस थांबा.' मग मी तिकडून येणाऱ्या माणसाला निरोप देवून व्यवस्था करून ठेवायची आणि कपडे घेवून येण्याचे सांगायचे. मग याचे कपडेच तयार नसायचे ! तेव्हा तयार कपड्याऐवजी 'तयार नाही' हा निरोप मिळायचा. यांत नवीन काही नाही.
निरोप मिळाल्यानंतर लगेच औरंगाबाद येथे येणाऱ्या पक्षकारांच्या तुलनेत, आपण 'वकिलसाहेबांना' त्यांचा निरोप आल्यावरही वेळेवर कपडे देत नाही याचे त्याला काही वाटत नाही, कदाचित अभिमानही वाटत असावा. हा वेळेवर कपडे देणार नाही हे मला माहीत असल्याने मला देखील त्याचे काही वाटत नाही. मला काही वाटत नसल्याचे त्याला पण माहीत असल्याने तो देखील याचे मनाला काही लावून घेत नाही. असा दोन्ही बाजूंनी विनातक्रार सामंजस्याचा व्यवहार सुरू असतो.
या माझ्या वागण्याचे गणित माझ्या मुलांना समजत नाही. त्यांना वाटते 'बाबा निष्कारण यालात्याला कपडे आणण्याबद्दल सांगून त्रास देतात. दुसऱ्याला किती त्रास द्यायचा ?' मग त्याला सांगीतले 'यांत माझी खूप गैरसोय होते का ? तर नाही. मला घालायला कपडे आहेत. त्याने वर्षभर दिले नाही तरी काही फरक पडणार नसतो. मग त्यांना प्रश्न पडतो, इतरांना अजिबात सहन न करणारा मी व त्यांच्या बाबतीत 'फारच कडक' असलेला मी या बाबतीत बोटचेपेपणाचे धोरण का घेतो. मी सांगायला सुरूवात करतो -
तुझे आजोबा बॅंकेतून रिटायर झाले होते. जेमतेम पैसे मिळाले होते. माझी वकिली नुकतीच सुरू झाली असल्याने तिकडून पैशांची तशी अपेक्षा नव्हती. तुझ्या आत्याचे लग्न ठरलेले होते. जेथून पैसे मिळण्याचा विश्वास होता व त्यांवर इतके दिवस निर्धास्तपणे आजोबांचे वर्तन राहिले होते, त्यांनी पैसे देण्यास ऐनवेळेस नकार दिला. आजोबा आजीपुढे समस्या उभी राहिली, काय करायचे ? आहे त्याच्यातच करावे लागणार ! तर मग पैसे वाचवायचे कसे ? लग्नाचा कपडा घ्यायचा कसा ? तो केवढ्याला पडेल ? इतरही खर्च असतोच. त्यावेळी आजीकडे एक गुजराथी विद्यार्थी शिकायला यायचा. त्याला विचारल्यावर त्याने सुरतला जाण्याचा सल्ला दिला. सुरतचे साडी मार्केट प्रसिद्ध आहे. त्याचे नातेवाईक तेथे होते. विशेष म्हणजे तो कपड्याच्या मीलमधे कामाला होता. त्याचा पत्ता त्याने दिला. तिथेच आम्हाला उतरण्यास सांगीतले. मग तरी काळजी होती, जवळ असलेल्या तुटपुंज्या पैशातली बरीच रक्कम सोबत घेवून जावी लागणार होती. कपड्यात फसवणूक झाली तर 'तेल गेले, तूप गेले' अशी अवस्था होईल. मग या 'टेलरला' विचारले. त्यावेळी लग्नाचा सीझन होता. त्याच्याकडे गर्दी होती. त्याने विचार केला, दोन दिवस दुकान बंद ठेवावे लागणार होते, पण होकार दिला.
संध्याकाळी आम्ही भुसावळहून सुरत पॅसेंजरने निघालो. सकाळी आम्ही दोघे टेलर व मी असे सुरतला पोहोचलो. आजीच्या विद्यार्थ्याच्या नातेवाईकाकडे उतरलो. 'सर्व आटोपून दुकानांत या.' असे त्यांनी सांगितले. समुद्रासारख्या भव्य, विराट दिसणाऱ्या तापीनदीवरील सुंदर मंदीरातील देवीचे दर्शन घेतले आणि मग दुकानात गेलो. टेलरला मी एकच सांगीतले 'कपड्यात आपण फसायला नको कारण हे कापड बहिणीच्या लग्नात द्यायचे आहे. त्यांना काहीतरीच कापड दिले असे वाटायला नको. तसेच कपड्यात आपण फसायला नको कारण 'भाऊंजवळ' (मी वडिलांना भाऊ म्हणायचो) एवढेच पैसे आहेत. दुसऱ्या पैशाची व्यवस्था होणार नाही तर याच पैशात हे सर्व कापड बसले पाहीजे. सर्व शालू व साड्यांची खरेदी झाली. बजेटमधे झाली. नंतर संध्याकाळी तेथून निघून भुसावळला आलो.
घरी कापडाबद्दल आणि लग्नानंतरही समाधानाचेच उद्गार आले. आपले दुकान सीझनमधे आपल्यासाठी दीड-दोन दिवस बंद ठेवणारा हा माणूस आहे. आपल्यासाठी त्यावेळी त्याने काय केले हे त्याने लक्षात ठेवले नसेल हा त्याचा चांगुलपणा ! पण त्याने आपल्यासाठी केलेली त्यावेळची मोठी गोष्ट आज इतक्या वर्षांनंतर छोटी होत नाही. त्याचे महत्व तसेच रहाते. आपण ते जर विसरून गेलो तर मग आपण त्याच्याकडून काय शिकलो.
अडीअडचणी सोसता सोसताच अडीअडचणीतल्यांस आपण मदत करायची असते, तेव्हाच आपल्या अडीअडचणीच्यावेळी कोणीतरी परमेश्वराच्या रूपात आपल्या मदतीला धावून येतो. फक्त आपल्या सोयीचे काय, हेच जर आपण पाहीले तर मग आपल्या वेळी पण समोरचा फक्त त्याच्याच सोयीचे पहातो, आपल्या सोयीचे नाही. तुकोबांनी सांगूनच ठेवले आहे - पेरले ते उगवते, बोलल्यासारखे उत्तर येते ।
आज त्याच्याकडून गावच्या माणसाने कपडे आणून दिले आणि हे सर्व आठवले.

१९ फेब्रुवारी २०१७

No comments:

Post a Comment