Monday, June 12, 2017

शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा ।

शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते ॥
दिव्या दिव्या दिपोत्कार कानीं कुंडलें मोतीहार |
दिव्यला देखून नमस्कार || १ ||
तिळाचे तेल कापसाची वात | दिवा जळो सारीरात ।
दिवा लावला देवांपाशी | उजेड पडला तुळशीपाशीं |
माझा नमस्कार सर्व देवांपाशी || २ ||
असे आणि यांसारखे श्लोक मी बालपणांत सायंकाळी देवासमोर म्हणायचो. मला म्हणायला सांगीतले जाई. मग त्यानंतर बऱ्याचवेळा परवचा म्हणावा लागे, कारण तो गुरूजींनी सांगीतलेला असे, रोज म्हणायला. गुरूजी बऱ्याच वेळी हे विचारत पण नसत; पण न जाणो, विचारले तर 'परवचा म्हटला नाही' हे सांगण्याचे दु:ख नको असायचे.
हे श्लोक, परवचा म्हणण्याचा फायदा काय ? आपण हे म्हणतो आहे, देवापाशी मागणे मागतो आहे पण खरोखर देव आहे का ? दिव्याला नमस्कार करून शत्रुची बुद्धी का शत्रुत्वाची बुद्धी खरोखरच नष्ट होते का ? नष्ट नाही झाली तर काय करायचे ? मग त्याची तक्रार कोणाकडे करायची ? रात्रभर दिवा का लावायचा व त्याचा उजेड तुळशीपाशी का पडला पाहिजे ? त्यामुळे काय होईल ? असे प्रश्न मला पडत, नाही असे नाही. काही वेळा मी विचारत पण असे. वेगवेगळी उत्तरे असत. त्यामधे -- 'देवबाप्पा सर्व पहातो. असे म्हटले की त्याला बरं वाटते, मग तो तुला छान तुला हवं ते देईन. तुला खूप मोठे व्हायचे ना ? मग हे म्हटलं पाहीजे.' वगैरे उत्तरं असत. त्यातल्या त्यात मला 'खूप मोठे होण्यासाठी हे सर्व म्हणणे आवश्यक आहे.' हे स्पष्टीकरण बरं वाटे.
त्यातला खरा अर्थ काही त्यावेळी समजत नसे पण लहानपणीच्या अडचणी व समस्या पाहून त्या दूर करण्याचा एक सोपा उपाय आपल्याजवळ अाहे याचे मला नेहमी समाधान वाटत असे. 'अधिकस्य अधिकं फलं' या नात्याने मी त्यांत विविध श्लोकांची, भगवद्गीता, तीस पर्यंतच्या पाढ्यांची, पावकी-निमकी वगैरेंची पण भर टाकली होती.
सर्वांच्या उन्नतीची, सुखाची मागणी केल्यावर मी कसा सुखी होणार ? मी कसा मोठा होणार ? फक्त हे म्हटल्याने खरंच मी मोठा होतो का ? मोठा म्हणजे नेमके काय ? हे मला सर्वार्थाने नीट समजले आहे असे वाटत नाही. यापैकी काहीही न म्हणणारे देखील मोठे झालेत, तेवढेच किंवा त्याच इयत्तेत राहिले नाही. त्यांचीही यथावकाश शिक्षणं झालीत, ते पण पोटापाण्याला लागलीत, त्यांची पण लग्न झालीत, ते पण संसाराला लागले ! मग हे सर्व लहानपणी म्हटल्याने मला काय मिळाले आणि त्यांना काय मिळाले नाही ?
बऱ्याच गोष्टी मनांत येतात ! कधीतरी यांतील काहीही न म्हणणाऱ्यांपैकी, एखादा भेटतो. मस्तपैकी गाडीघोडी, मोठा बंगला बाळगून असलेला आणि लक्ष्मीचे सौख्य अंगावर दिसत असलेले जाणवते. मात्र आश्चर्यकारकपणे म्हणतो, 'तुझं बरं होतं, त्यावेळेस तू सर्व ऐकलं आणि म्हणून इथपर्यंत आलास. आम्ही पहा.' ते दु:खात असतील अशी माझी अजिबात कल्पना नसते. त्यांच्याकडे पाहिल्यावर मीच एकंदरीत दु:खात असावयास हवा, असे मला वाटते.
मला पण बरीच दु:ख आहेत, नाही असे नाही. माझी पण काही दु:खे असावीत असे त्यांना अजिबात वाटत नाही. माणसं दुसऱ्याच्या हक्काचे आपल्याला मिळावं म्हणून का आटापिटा करतात व त्यांचे हक्क, मिळकत हिरावून घेतात ? आपली कर्तव्ये सोयीस्करपणे विसरून व स्वत:च्या वेळी कर्तव्यापालन टाळून, दुसऱ्याने कर्तव्यपालन कसे करावयास हवे हे निर्लज्जपणे कसे सांगू शकतात ? सर्व कबूली झाल्यावर, असे काही ठरलेच नव्हते असे का बदलून जातात ? पण त्यांना या माझ्या समस्या या समस्यांच वाटत नाही; 'हे असे होतंच रहाते, जगाची रीतच आहे.' असं सांगतात.
मग लक्षात येते माझ्याजवळ काय आहे आणि त्यांच्याजवळ काय नाही.

११ जून २०१७

No comments:

Post a Comment