Friday, June 2, 2017

सर्वात्मका सर्वेश्वरा

सर्वात्मका सर्वेश्वरा

आज सकाळी औरंगाबाद आकाशवाणी केंद्रावर नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात पं. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेले व गायलेले कै. कुसुमाग्रजांचे 'ययाति आणि देवयानी' या नाटकातील 'सर्वात्मका सर्वेश्वरा' हे पद लागले होते.
काय पद आहे ! मला तर ही वेदातील ऋचाच आहे असे वाटते, एवढे पावित्र्य व सात्विक भक्तीभाव या नाट्यगीतात दिसतो. पंडीतजींचे हे पद गाणे म्हणजे प्रत्यक्ष भगवंताजवळ त्याचा लाडका भक्त बसलेला आहे, तो त्याच्या महत्तेचे गुणवर्णन करतो आणि अशा स्वरांत की आपले लघुत्व स्वरातून दिसले पाहीजे. परमेश्वर ऐकत नाही हे पाहून आपल्या हट्टी पण किंचीत रडवेल्या झालेल्या स्वरात त्याची आळवणी सुरू असते.
त्यासाठी योजलेला 'सिंध भैरवी' हा राग ! भैरवी ही मैफिलीच्या शेवटी म्हटली जाते, भैरवी म्हटली की बैठक संपली. आता सर्व उपाय, मार्ग संपल्यावर आपल्याला परमेश्वराशिवाय कोण वाचविणार ? जाणार तरी कोणाकडे ? परमेश्वरानेच जर आपल्याला टाकले तर मग आपल्या जीवनाची मैफिल संपलेलीच असते.
कै. कुसुमाग्रजांच्या काव्यप्रतिभेबद्दल काय सांगावे ? परमेश्वराची, त्या जगन्नियंत्याची आळवणी करतांना या महान कविंची प्रतिभा जास्तच तळपते; मग ते 'गीतरामायणकार ग. दि. माडगूळकर' असो का 'ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे कुसुमाग्रज' असो. जगाचा संहारक भगवान शंकर ! याचे वर्णन करतांना सृजनकर्त्याचेच वर्णन आपण ऐकतो आहे असे वाटते. त्याला उपमा देतांना या विश्वातील कोणत्या सर्वोत्तम उपमा देण्याचे कुसुमाग्रजांनी बाकी ठेवले आहे ? सरते शेवटी भगवंताचे गायन करावे तर कै. कुसुमाग्रजांना कशाची आठवण झाली, तर जगांतील आद्य साहित्य मानले गेलेला ऋग्वेद आणि तो देखील कुठून निघाला आहे तर आपल्या शरीराला जिवंत ठेवणाऱ्या ह्रदयातून ! ह्रदय बंद पडले तर जीव हा शिवात विलीन होतो, आपले अस्तित्व संपते. त्यामुळे 'अरे, मी शेवटी तर तुझ्याजवळच येणार आहे, मग मला का हा असा एवढा त्रास देतो ?' हे सर्व भाव या दैवी शब्दातून आणि स्वरातून व्यक्त होतात; अशा दृष्टीस पडतात.
निसर्गदत्त व दैवी प्रतिभावंताची रचना व गायन हे असे असते.

१९ फेब्रुवारी २०१७

No comments:

Post a Comment