Saturday, June 3, 2017

महाविद्यालयीन आठवण - नूतन मराठा कॉलेज जळगांव

महाविद्यालयीन आठवण - नूतन मराठा कॉलेज जळगांव

अलिकडील काही दिवसांच्या घटना पाहिल्यावर मला माझ्या महाविद्यालयीन काळातील आठवण आली. मी जळगांवच्या नूतन मराठा कॉलेजचा विद्यार्थी ! माझा सन १९७८ ते १९८२ हा काळ तेथे गेला, पण ते दिवस अजूनही आठवतात. मला त्या कॉलेजने खूप दिले ! समाजात फिरायची सवय लावली, समाजाच्या अडीअडचणी जाणून घेण्याची दृष्टी दिली, माणसांमध्ये डोकावून पहाण्याची सवय लावली ! विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी दिली आणि आपले विचार निर्भयपणे व्यक्त करण्याची संधी दिली. त्यावेळचे प्राचार्य डॉ. के. आर. सोनवणे तसेच सर्वच प्राध्यापक यांचा मी आवडता असावा.
एकदा एका स्पर्धेला जायचे होते, आमचे प्राचार्य नव्हते, प्रवासासाठी पैसे हवे होते, प्राचार्यांच्या परवानगीशिवाय पैसे देता येणार नव्हते. त्यावेळेस मला आठवते - तेथील कॅशिअर श्री. महाडीक होते, त्यांनी, 'अरे, पैशाशिवाय पोरं कशी जातील, पैसे काढा.' असे म्हणत सर्व 'नॉन टिचींग स्टाफकडून' पैसे गोळा केले आणि मला दिले. हे त्यांचे काम महाविद्यालयाच्या नियमांत होते की नाही, कायदेशीर होते की नाही मला माहीत नाही; पण ही आठवण माझ्या ह्रदयात, काळजात कायम कोरलेली आहे आणि राहील.
आज हे सकाळपासूनच आठवण्याचे कारण म्हणजे सध्या चलनातून काळापैसा बाद करण्यासाठी सध्याच्या सरकारने जो १००० व ५०० या रकमेच्या नोटा बाद करण्याचा निर्णय घेतला, त्या पार्श्वभूमीवर ! मला १२ वी मधे अर्थशास्त्र शिकवायला प्रा. डी. एन्. पाटील सर होते. ते विषय छान शिकवायचे, गमतीदारपणे शिकवायचे आणि विशेष म्हणजे आमच्या त्यावेळच्या वयाचे होवून शिकवायचे. एकदा 'भारतीय अर्थव्यवस्थेतील काळापैसा व त्याचे परिणाम' अशास्वरूपाचा विषय होता. त्याचे चांगले परिणाम त्यांनी सांगीतले - बाजारात पुरेसा पैसा निर्बंधविरहीत, नियंत्रणविरहीत येतो त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होते, उत्पन्नात वृद्धी होते व बाजार सुधारतो. त्याचे वाईट परिणाम सांगतांना त्यांचा आवाज तापला, त्यांनी अभ्यासक्रमाच्या दृष्टीने, परिक्षेत गुण मिळण्याच्या दृष्टीने बरेच सांगीतले. मात्र त्यांचे शेवटचे भावनाविवश होवून त्यांनी म्हटलेले सर्वसमावेशक वाक्य मला आजही आठवते - 'मुलांनो, काळापैसा म्हणजे समाजाचे आपण सर्व घेतो, त्याला ओरबाडतो, आपला विकास करतो, आपल्या संबंधीतांचा विकास करतो पण हे सर्व वैयक्तिक ! समाजाला आपण काहीच देत नाही, उगीच थोडे काही दिल्यासारखे दिसते, त्याची सावली पडते. समाजाची अर्थव्यवस्था वेगळी व आपली वेगळी अशी स्थिती असते. मग एखादी अशी काहीतरी घटना येते की आपल्यासहीत सर्वांचीच समाजातील अस्तित्वाची लढाई सुरू होते, मग त्यांत सर्वांनाच फरफटावे लागते. काही वाचतात, काही संपतात; पुढे मात्र क्वचितच जातात कारण समाजच, अर्थव्यवस्स्थाच मागे असतो.'
छोट्याछोट्या शेतकऱ्यांच्या, दुकानदारांच्या, व्यावसायीकांच्या येथील अडचणी वाचल्या, त्याबद्दल निश्चितच सहानुभूती ! या व्यतिरिक्त आता काही करता येण्यासारखे फार काही नाही. पूर्वी रॉकेलचे कंदील असायचे. कंदील लावल्यावर त्याची काच खूप तापते. लहानपणी त्या काचेला कंदील लावलेला असतांना हात लावण्याची खूप इच्छा व्हायची. मी सारखा हात लावावयास जायचो, आई 'नाही' म्हणायची. माझी आजी सांगायची - 'एकदा लावू दे, पुन्हा आयुष्यांत लावणार नाही.' तसेच झाले, हात लावल्यावर बसलेला चटका आणि आजीचे बोल अजूनही आठवतात जरी आजी आता नाही ! आता थांबतो !

२० नोव्हेंबर २०१६

No comments:

Post a Comment