Saturday, June 3, 2017

राजकारण

राजकारण

राणे - भाजप गुंडांचा पक्ष. भ्रष्ट, गुंडांचा मंत्रीमंडळातही समावेश.
मुख्यामंत्र्यांचे उत्तर - एक जरी गुन्हेगार मंत्री सापडला तर एक मिनिट त्याला ठेवणार नाही. पण साप - साप म्हणून भुई धोपटाल तर एकही मंत्री राजीनामा देणार नाही.
(पावसाळी अधिवेशनातील महाराष्ट्राचे मुख्यामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचे आरोपांना उत्तर - संदर्भ : 'दैनिक दिव्य मराठी, दिनांक २१.७. २०१६)
मा. देवेंद्र फडणवीस धन्यवाद ! त्रिवार धन्यवाद !!! महाराष्ट्राच्या जनतेचीच नाही तर मी म्हणेल की देशाच्या जनतेचीही हीच अपेक्षा आहे ! ही जनता तुम्हा-आम्हाला दिसत नाही कारण आपण तिला पाहायला जात नाही आणि तशी आपल्याला उत्सुकताही नसते. ही जनता कोणाचीही जातपात पाहत नाही कारण तिला स्वतःची कोणतीही जात नसते. जात असते ती मुख्यमंत्र्यांना, जात असते ती विरोधी पक्षनेत्यांना, जात असते ती पक्षश्रेष्ठींना, जात असते ती आमच्या पुरोगामी म्हणविल्या जाणाऱ्या पुढाऱ्यांना ! जनतेला कशाची आली आहे हो जात ? ती फक्त काम करणारा माणूस ओळखते, त्याला ठेवते आणि इतरांना नाकारते !
हीच ती जनता आहे की तिने आणीबाणीनंतर 'कै. इंदिरा गांधी' यांना अस्मान दाखविले आणि तीच जनता आहे की तिने नवीन सरकारचा निवडून आले नंतरचा किळसवाणा प्रकार पाहिल्यावर पुन्हा 'कै. इंदिरा गांधी' यांना निवडून दिले !
हीच जनता आहे की तिने माजी पंतप्रधान 'मा. अटलबिहारी वाजपेयी' यांच्या काळात आणि 'डॉ. अब्दुल कलाम' यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या अणुपरीक्षण चाचणीनंतर भारतावर बड्याबड्या देशांनी घातलेल्या बहिष्काराला दाद दिली नाही आणि देशाला समर्थपणे तारून नेले !
हीच जनता आहे की मा. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असतांना त्यांचेवर बेफाम आरोप होत होते, समर्थ समजल्या जाणाऱ्या देशाने त्यांच्या देशात येण्याची परवानगी त्यांना नाकारली तरी देखील तिने 'त्यांच्यातील देशभक्त व फक्त देशहिताला प्राधान्य देणारा कर्तव्यकठोर प्रशासक' पाहिल्यावर मोकळेपणाने , कसलाही आडपडदा न ठेवता अत्यंत भरभरून मते देऊन त्यांना निवडून दिले.
मा. देवेंद्र फडणवीस, तुम्ही पण हेच धोरण मनात आणि आपल्या वर्तनात सतत ठेवावे हीच जनतेची अपेक्षा आहे ! तुमच्या सत्तास्थानाला विरोधी पक्ष काय पण प्रत्यक्ष परमेश्वरही हात लावणार नाही ! तुमचे आणि प्रत्येक राज्यकर्त्याचे कर्तव्य हे 'परमेश्वरी अवतारापेक्षा' कमी नसते -
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥

२१ जुलै २०१६

No comments:

Post a Comment