Saturday, June 3, 2017

शिक्षण आणि आयुष्य

शिक्षण आणि आयुष्य

मध्यंतरी एक लेख वर्तमानपत्रात वाचण्यात आला होता आणि यासंबंधाने बहुतेक येथे 'फेसबुकवर' तशी पोस्टही होती. विषय होता - मुलींची लग्ने 'करिअरच्या' नादी लागल्याने उशीरा होतात, त्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी ! त्यात काही अडचणी मांडलेल्या होत्या. त्यांनी व्यक्त केलेल्या मताबद्दल पूर्ण आदर आहेच !
आपल्या जीवनाचा तो सांगीतलेला जसा एक भाग आहे, जो सुखवस्तू समाजात अनुभवायास येणारा आहे; असा समाज आपल्या एकंदरीत समाजात किती प्रमाणांत आहे ? फारसा नाही. मात्र याचा तसा दुसरा पण एक भाग आहे. तो जास्त वास्तव, कटू, जीवनाची भीषणता दाखविणारा व न टाळता येणारा आणि आपल्या आयुष्यासोबतच संपणारा असू शकतो म्हणूनच जास्त गंभीर आहे.
मला माझ्या व्यवसायाच्या निमीत्ताने मोटार अपघातात किंवा कोणत्याही कारणावरून घरातील कमावता माणूस अकाली गेल्याने, त्याची नोकरी गेल्याने, उद्योगधंदा बंद पडल्याने जी परिस्थिती त्याच्यावर, पत्नी व मुलाबाळांबर निर्माण होते याची कल्पना आहे, इतर त्रयस्थ ती क्वचितच करू शकतात. पती कामानिमीत्ताने बाहेरगांवी असेत तर 'संतोषीमातेची कहाणी' हे त्या पत्नीची अवस्था दाखवणारे बोलके उदाहरण आहे. अर्थांत या घटना सर्वांना माहीत असतात, पण व्यावसायीक अनुभवातून शिकावे अशी मला इच्छा असल्याने असंख्य अनुभव आलेले आहेत. तूर्त दोनच अनुभव सांगतो --
---------------------------------
१. मुलगी खात्यापित्या घरची होती, नुकतीच कॉलेजला जावू लागली होती. कॉलेजच्या वातावरणाचा आणि तरूणपणातील गुणावगुण आपणा सर्वांना माहीत आहे. एका मुलाची भेट झाली, तो काही तरी गॅरेजवर कामाला होता. काम करून काय जे रोज हातात पैसे खुळखुळ करत असतील त्याचा उपयोग या अशा 'स्वर्गात विहार करणाऱ्या मुलींना' नादी लावण्यासाठी होत होता. मुलीला घरातीलच नाही तर समाजातील लोक पण - 'पहिले नीट शिक्षण घे, मग लग्नाचे पाहू. दुसऱ्या धर्माचा असला तरी तो वेगळा प्रश्न आहे. सर्वांनाच जेवावयास लागते, तुला पण आयुष्यभर लागणार आहे. उद्या काही झाले तर तुला तुझे पोट नीट सन्मानाने भरतां आले पाहीजे.' डोळ्यावर धुंदी असते, समाजातील असे सांगणाऱ्यांचे विचार पटत नाही. जे काय 'लग्न-निकाह' म्हणतात ते झाले. तिला ३-४ मुले झाली, नंतर ती घरातून हाकलवून लावली गेली. तिचे शिक्षणही नव्हते. पुढचे मी लिहीत नाही, आपण कल्पना करू शकतात.
---------------------------------------
२. एका मोठ्या कंपनीत उच्चशिक्षण घेतलेला कर्तबगार माणूस आणि त्याची द्विपदवीधर शिक्षीत पण घरीच असलेली पत्नी ! दुर्दैवाने प्रकृतीचे दुखणे निघाले. साधे नीट उभेही रहाता येईना, व्यवस्थित चालणे तर दूरच ! होता नव्हता तो पैसा बराचसा औषधपाण्यात गेला. प्रकृतीमुळे नोकरी करणेच शक्य नसल्याने नोकरी गेली.
उमेदीने शिकत असलेल्या घरातील मुलांसाठी आणि प्रकृतीमुळे दुर्दैवाने अचानक घरी बसाव्या लागलेल्या पतीच्या समस्येने निर्माण झालेल्या परिस्थितीने न डगमगता संकटाला तोंड देण्यासाठी त्याची पत्नी कंबर कसून उभी राहिली. तिचे शिक्षण होतेच, मिळेल ती नोकरी स्विकारायचे तिने ठरविले. खाजगी शाळेत तात्पुरती नोकरी मिळाली, मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाचा प्रश्न मिटला. मुले त्यांच शाळेत जाणार होती, शाळा त्यांचा खर्च करणार होती म्हणजे ही समस्या तिचे शिक्षण असल्याने कमी झाली.
मग तिने मोर्चा वळविला यांच्याकडे, ज्या महिलांना घरी पदार्थ करण्याचा कंटाळा आहे, ज्यांना वेळ नाही, ज्यांना घरी करणे जमत नाही किंवा ज्यांना येतच नाही यांच्यासाठी विविध पदार्थ करून देण्याचा ! इथेही तिच्या हातच्या कौशल्यासोबत, तिच्या सुगरणपणाबरोबर तिचे शिक्षण कामास आले. कोणाशी काय बोलावे, किती बोलावे, कसे बोलावे, समोरच्या माणसाच्या मनांत काय आहे ? आत्मविश्वासाने कसे बोलावे, ही सर्व शिक्षणाची देणगी होती.
यातून मिळणाऱ्या पैशाने, तुटपुंज्या का असेना, तिच्या नवऱ्याने उभारी धरली ! तिने धरलेल्या हिंमतीकडे पाहून का नियमीत औषधांमुळे तो पण कसाबसा चालू शकेल या अवस्थेत आला. त्याची चालता येण्यासारखी स्थिती पाहून एका सर्वसाधारण कंपनीने त्याला काम दिले. त्याच्या हुशारीबद्दल शंका नव्हतीच ! काम बऱ्यापैकी करू लागला. त्या घराने आता सर्वार्थाने हिंमत धरली आहे.
------------------------------
दोन घटना सांगीतल्या ! सांगता येतील असे अनुभव खूप आहे; आपण त्यातून शिकतां काय येईल ते पाहिले पाहीजे.

३ डिसेंबर २०१६

No comments:

Post a Comment