Saturday, June 3, 2017

दिल्लीचे प्रदूषण आणि रिक्षावाला

दिल्लीचे प्रदूषण आणि रिक्षावाला

आज कामानिमीत्ताने दिल्लीला आलो. लॉजमधून निघालो आणि रिक्षात बसून कोर्टात निघालो.
अंतर जरा जास्त असले आणि रिक्षावाला जरा बोलण्यासारखा असेल तर मी त्याच्याशी बोलतो. त्यालाही बरे वाटते आणि आपलाही वेळ जावून काहीतरी मिळते. हा रिक्षावाला साधारणत: ५०-५५ वर्षांचा असावा. मी त्याच्याशी बोलत असतांना त्यालाही बरे वाटत असावे कारण संभाषण चालू रहावे असे त्याला वाटत होते.
काहीतरी बोलायचे म्हणून म्हटले, 'अरे भाई, ये दिल्लीमें धुवाँ अभी दिखता नहि । पहलें तो रिक्षामें तो जाना मुश्किल था और शाम की तो बातही छोडो ।' तो तात्काळ उत्तरला, 'साब, बराबर हैं । पहले दिनभर रिक्षा चलाना याने बहोत मुष्कील काम था, अभी इतना लगता नहिं ।' मला आश्चर्य वाटले, मी विचारले, 'ऐसी कोनसी नयी बात हो गयी ?' त्यावर त्याचे उत्तर केवळ विचार करायला लावणारेच नव्हते तर भीषण सत्य व पुढील वास्तव सांगणारे होते.
'भाईसाब, जैसे ये ४-५ साल पहिले गॅसकी रिक्षा आयी तो धीरेधीरे मेरी तबीयत सुधरते गयी । पहिले ना तो केवल शरीर को तकलीफ और थकावट होती थी बल्की दवापानीमें पैसे जाते थे, फिरभी उत्साह नहि लगता था । दिनभर थकान ही थकान । रिक्षा तो चलाना हैं, ना तो खायेंगे क्या ? पहिले मुझे लगता था, मैं पाँच साल रिक्षा चला सकूंगा । ये बात पॉंच साल पहिले की हैं, लेकिन मैं अब बोल सकता हूॅं की मैं खुशीसें दस साल रिक्षा चला सकता हूॅं ।'
त्याचा स्वर भरून आला होता. मित्रांनो, गरिबी मोठी वाईट, बारा वाजेच्या वेळेला पोटासाठी भाकरी ज्याची त्यालाच कमवावी लागते. ज्यांचा उदरनिर्वाह कष्टावर चालतो त्यांच्यासाठी त्यांचे शरीर म्हणजे त्यांची संपत्तीच असते. शरीर चांगले राहिले तर ते पुढे कष्ट करून स्वत:चे व मुलाबाळांचे पोट भरू शकतात नाहीतर त्यांना स्वत:चेच पोट भरण्याची पंचाईत होते व मरता येत नाही म्हणून परिस्थिती नसली तरी औषधोपचार करावा लागतो किंवा ते जे काही मरू नये म्हणून प्रयत्न करतात त्याला त्यांच्यादृष्टीने औषधोपचार म्हणतात !
डिझेल, पेट्रोल वाहने सक्तीने बंद करून सर्वोच्च न्यायालयाने जो गॅसवर बाहने चालतील हा निर्णय दिला होता त्याचा हा जिवंत, दिसणारा व दिलासा देणारा परिणाम मी पहात होतो. न्यायालयाच्या निर्णयाने हा रिक्षावाला वाचला पण अजून या रिक्षावाल्यासारखे किती जण असतील की अजून कोणत्या तरी निर्णयाची वाट वेगळ्या विषयांसाठी पहात असतील ?
पर्यावरण हानीचे अजून कसे आणि किती बळी ठरत असतील आपल्या समाजात ?

१९ ऑगस्ट २०१६

No comments:

Post a Comment