Friday, June 2, 2017

सातूचे पीठ

सातूचे पीठ

आज सातूचे पीठ खाल्ले. बऱ्यांच दिवसांनी खायला मिळाले. उन्हाळ्यांत आवर्जून होणारे लाह्यांचे पीठ, सातूचे पीठ, कणकेची बेकरीतून आपल्या समक्ष तयार करून व भाजून आणलेली बिस्कीटे इ. या गोष्टी आता दंतकथा वाटतील अशी स्थिती आहे. बऱ्यांच जणांना मी काय सांगतो आहे हे लक्षात तरी येईल का, याची पण शंका आहे.
माझ्या दोन्ही आजींचा मी लाडका ! आजी म्हणजे वडिलांची आई आणि आईची आई ! आईच्या आईला बहुतांशपणे काकी म्हणायचो तर वडिलांच्या आईला आजीच म्हणायचो ! मी हायस्कूलमधे शिकत होतो, सहावीत असेल, आजी गेली तेव्हा ! तिला लाह्या, डाळ्या, सातूचे पीठ, लाह्याचे पीठ, उकडपेंडी वगैरे खायला आवडायचे.
दुपारच्या वेळी गल्लीत दारावर हे लाह्या वगैरे विकायला भोयिणी यायच्या. जोड दिलेल्या भडक रंगाचे पातळ नेसलेल्या, मिश्रीने घासल्याने काळपट झालेले दांत ! कपाळावर, कानावर, हातावर गोंदलेले व हातात दंडावर बहुदा जाडजूड चांदीचे कडे ! कपाळावर कुंकू असायचे काही वेळा दुर्दैवी स्त्री कुंकवाविना असायची. 'लाह्याऽऽऽ डाळ्या ऽऽऽऽ, खारे शेंगदाणे ऽऽऽऽ !' अशा आरोळीने त्यांचा प्रवेश आमच्या गल्लीत व्हायचा. मग मोठ्याने 'काकी, घेणं आहे का काही ?' अशी त्यांची विचारणा झाली की ती आपल्यालाच आहे हे समजून आम्ही घरातील पातेले, घमेले जे हातात मिळेल ते घेवून ओट्यावर धावायचो, तो पर्यंत ती भोयीण ओटा चढून पुढील खोलीत बसलेली असायची.
या भोयिणी लाह्या, मुरमुरे, डाळ्या, फुटाणे, खारे दाणे विकायच्या. लाह्यांचे हे मोठे पोते सोबत असायचे, लाह्या हलके असलेने त्यांना ते मोठ्या पोत्याचे वजन जाणवत नसायचे बहुधा ! शेणाने सारवलेल्या पसरट मोठ्या टोपलीत मग डाळ्या, फुटाणे असायचे ! डाळ्या व फुटाणे हे साधे आणि खारे असे दोन्ही प्रकारचे असायचे. खारे दाणे छोट्या पिशवीत असायचे. शुक्रवारी फुटाणे घ्यायला पाहिजे, जिवतीचा वार असतो ना ! यांतले काही माहिती नसतांना आम्ही नातवंड तारे तोडायचो. 'घे वं माय ! जिवतीची लेकरं म्हणताय तर !' भोयीण म्हणायची. आजीला पण घ्यायचेच असायचे त्यासाठी तर ती माजघरातून उठून पुढच्या खोलीत आलेली असायची. मग भाव सुरू व्हायचा. डाळ्या काय पावशेर व लाह्या काय शेर !
त्यावेळेस का कोण जाणे पण शनिवारी फुटाणे खाल्ले की खाणारा घोडा होतो ही आमची जबरदस्त समजूत ! घोडा होण्याची कोणालाही इच्छा नसायची, कारण मग आपल्याला टांगाला जुंपतील हे चित्र डोळ्यापुढे उभे रहायचे. पण इतक्या वर्षांत मला अजूनही कोणाच्याही घरात रात्री मुलगा होता व सकाळी पहातो तर घोडा, असे काही दिसले नाही. याला सूट असायची ती श्रावणातील शनिवारी ! कारण तो मारूतीचा वार ! काही म्हणा पण मारूतीची ताकद भारीच ! तो कोणालाच आटोपणार नाही याची आम्हा यच्चयावत मुलामुलींना खात्री होती. मग आम्ही फुटाणे खावून संपत शनिवारची कहाणी पण ऐकायचो. एकदम पक्का बंदोबस्त, घोडा होवू नये म्हणून !
मोजमापाची मेट्रीक पद्धत स्विकारून त्यावेळी पण बरीच वर्षे झाली असली तरी भोयिणीजवळ असायचे ते पितळी शेर, अर्धाशेर, पावशेर, अदपाव ही मापेच ! छटाकाचे माप म्हणून त्यावर कसलेही लेबल वा शिका नसलेली एक छोटी, चपटी, उघडी डबी असायची. पैशाच्या भाषेतील वस्तूंच्या भावांचा संवाद बऱ्याच वेळा न समजणारा व न जमणारा म्हणून बाद होवून - 'चौथेभर ज्वारीला काय देशील, बोल !' या आजीच्या वाक्यावर थांबायचा. धान्य घरच्या शेतातील असणारी बरीच घरे असल्याने व्यवहार हे असेच व्हायचे आणि त्यात कोणालाही वावगे वाटायचे नाही, कारण कोणाच्या मनांत काही वावगे नसायचे. 'काकी, तुह्याकडली जवारी आवल हाय, उमलं चांगलं होतं.' भोयीण म्हणायची. 'मग जरा काही बरं सांग, ही पोरं मागं लागलीत. तुम्हाला पण पोरांचीच घरं बरी सापडतात, दुपारी मोठ्यानी बोंबलायला.' आजी म्हणायची. त्यावर आपले काळसर दांत व स्वच्छ मन दाखवत ती भोयीण हसायची अन् म्हणायची, 'काकी, या पोराला तू नाराज करशील का अन् मी तरी नाराज करीन का ? माह्ये बी पोरंसोरं, नातनाती हाय, फिरावं लागतं पोटासाठी. हं घे, काय पाह्यजे रे पोरा.' ती मला उद्देशून म्हणायची, मी आजीकडे पाह्यचो. 'तू काकीकडे पाहू नको, तिनं नाय म्हटलं तर मायाकडून खाय ! भोयिणीचे उद्गार ! मग मी काही तरी मागायचो. ती भोयीण द्यायची आणि मग आजी चौथं, दोन चौथं ज्वारी द्यायची; अन् तो व्यवहार आटपायचा. 'काकी, पानी दे प्यायला.' हे भोयिणीनं म्हटल्यावर मी ताड्कन उठायचो अन् आतून पाणी आणायचो. पाणी पिता पिता मग ती भोयीण म्हणायची, 'काकी, गैरं दिवस झालं, तू काय घरी नाय आली.' त्यांवर मग, 'अगं, मला एकटीला जमते का यायला, कोणाला तरी बरोबर घ्यावं लागतं.' म्हणायची. 'ते बी खरंच !' म्हणत ती मग टोपली उचलायची, अन् ओट्यावरूनच हाक द्यायची. हेऽऽऽ डाळ्याऽऽऽऽ मुरमुरंऽऽऽ !' आणि ओटा उतरून गल्लीत चालू लागायची.
कधीतरी मग आजीला लहर यायची, 'चल रे दादुड्या !' मला म्हणायची. मी विचारायचो, 'कुठं आजी ?' 'अरे, विचारू नाही असे, कुठे निघतांना. काम होत नाही मग.' असे म्हणत ओटा उतरायची, नंतर नंतर तिला काठी लागायला लागली होती. मग ही आमची आजी-नातवाची जोडी चालतचालत पोस्ट आॅफिसजवळ आली की मग दोनच ठिकाणं असायची एक म्हणजे केऱ्हाळकरांकडे किंवा मग भोई वाड्यात !
भोईवाड्यात गेल्यावर मग ती सगळ्यांचीच काकी होती पण तिचे कोपऱ्यावरचे एक घर ठरलेले होते. बाहेर काट्याचा मोठा भारा पडलेला असायचा. मोठ्या चुल्हाणावर एकीकडून तिरपी ठेवलेली कढई असायची, त्यांत कढईचे बुड झाकले जाईल एवढी काळीशार वाळू दिसायची. मुंडासे घातलेला उघडाबंब माणूस भल्यामोठ्या पण अगदी छोटा दांडा असलेल्या झाऱ्याने त्या कढईत मूठमूठ ज्वारी टाकत असायचा अन् क्षणांत लाह्या तडतड् आवाज करत कढईभर व्हायच्या, कढईबाहेर पडायच्या. त्या छोट्या झाऱ्याने घमेल्यात लाह्या काढतांना वाळू खाली रहायची व लाह्या बरोबर निघायच्या. 'काटे का जाळतां लाह्यासाठी ?' माझा प्रश्न ! कारण काटा हा पायात घुसतो, आपण कळवळून खाली बसतो. त्या वेळी न मोडता निघाला तर ठीक नाही तर मग दुसऱ्या दिवशी लंगडत लंगडत चालत कोणाकडून तरी तो सुईने काढून घ्यावा लागे. पायात चपला वगैरे घालायच्या असतात हे आम्हाला बऱ्याच उशीरा समजले. आसपासपण असेच ज्ञान होते. 'काट्याचा विस्तो कडक असतो.' हे त्या मुंडासेवाल्याने दिलेले उत्तर मला बरेच उशीरा समजले होते.
आज सौ. ने खमंग सातूचे पीठ केले होते. गहू भाजून, मुलाला डाळ्या आणायला लावून ! सुंठ, वेलदोडे टाकून तयार केलेले सातूचे पीठ ! उन्हाचे गूळसाखर घालून खायला दिले अन् हे एवढे आठवले.

१५ मे २०१७

No comments:

Post a Comment