Friday, June 2, 2017

भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो !

भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो !

आज २६ जानेवारी, २०१७ ! भारतीय प्रजासत्ताकास आज ६७ वर्षे झालीत. पहिला स्वातंत्र्यदिन, पहिला प्रजासत्ताक दिन पहाणारी मंडळी आता अभावानेच आपल्यात आहेत. काही असतील, पण ती त्यावेळी होती एवढेच सांगण्यापुरता असतील कारण त्यावेळचे त्यांना कितपत नीट आठवत असेल कोणास ठावूक ? काही वयोवृध्द भाग्यवान असतीलही पण तो अपवाद ! तेव्हा त्या आठवणींऐवजी आता आपल्या आठवणीतला प्रजासत्ताक दिन सांगायची वेळ आहे.
मला माझ्या रावेर येथील, 'मराठी मुलांची शाळा, नं. २' या शाळेतले तसे कमी आठवते; कारण मोठा शासकीय कार्यक्रम व्हायचा तो मी नंतर ज्या शाळेचा विद्यार्थी झालो, त्या 'सरदार जी. जी. हायस्कूल' या शाळेच्या भव्य पटांगणावर ! आमच्या मराठी शाळेतील ध्वजवंदन झाले की आम्ही सर्व विद्यार्थी अगदी न चुकता, पळतपळत 'सरदार जी. जी. हायस्कूलच्या' दिशेने जायचो. तशी ती शाळा गांवापासून बऱ्यापैकी लांब आहे, पण त्या उत्साहाच्या भरात आम्हाला ते अंतर लांब वाटत नसे.
शाळेच्या त्या भल्यामोठ्या पटांगणावर पांढऱ्या खडूच्या भुकटीने बऱ्याच मोठा भाग हा आम्हाला बसण्यास वर्ज्य केलेला असे. मधला संपूर्ण भाग मोकळा आणि आमच्यासारखी बालमंडळी चहुबाजूने गर्दी करताहेत, याचे कारण आमच्या त्या वेळच्या बालबुद्धीला समजत नसे; मग कोणीतरी मुलगा आपले शौर्य दाखवून त्या रेघेच्या आंत मांडी घालून बसला की लगेच कोणीतरी जोरात शिटी वाजवी. ही वाजलेली शिटी आपल्या शौर्यासाठीच आहे हे त्या शूरवीरास लगेच लक्षात येई, मग झाले तेवढे शौर्य पुरे, या भावनेने तो लगेच मागे, रेषेच्या पलिकडे जाई. त्यावेळी तेथे अगोदरच असलेली मुलं त्याला मागे सरकू देण्यास विरोध करत. पण हा विरोधही जास्त काळ चालत नसे, कारण तो पावेतो शाळेचे कोणते तरी शिक्षक हातात लवलवती हिरवीगार कडूलिंबाची काडी घेवून तोंडाने शिटी वाजवत आमच्याकडे वेगात येतांना दिसत. त्याबरोबर आमच्यातीलच जरा मोठी मुलं आम्हाला गप्प करीत. शिक्षकांच्या मदतीला न सांगता धावून येणारी ही मुलं हे काम फक्त त्याच वेळी करत. कारण एरवी त्यांचे वर्गातील वर्तन सर्वस्वी याच्या भिन्न व विरूद्ध असे. त्याचे ऐकून ते शिक्षक आमच्यापर्यंत येण्याचे आंत जर शांतता झाली तर त्यांची चाल मंदावे आणि ते मग डुलतडुलत आमच्यापाशी येवून उभे रहात. पण त्यांचे हे निवांत उभे रहाणे दुसऱ्या कोपऱ्यातील शूरवीरास सहन होत नसे आणि विशेष म्हणजे तिकडे एखादाच शूरवीर नसे तर शूरवीरांचा मोठा घोळकाच असे. त्या सर्वांनीच ती पांढऱ्या भुकटीची सीमा ओलांडलेली असे. त्यावेळी आम्हाला सोडून मग एकदा तोंडाने ओरडत, मग शिटी वाजवत, पुन्हा ओरडत, मग शिटी वाजवत त्याचवेळी हातातील हिरवीगार कडूलिंबाच्या काडीचा - झूंझूंझूं असा आवाज काढत ते त्या दिशेकडे चाल करून जात तेव्हा आता काय होते याची आम्हाला भयंकर उत्सुकता ! अगदी वाकूवाकून तिकडे पहात ! मग हे तिथे पोचल्यावर तोंडातील शिटी आणि हातातील छडी यांची जुगलबंदी मुलांवर सुरू होई, ती त्या सर्व घोळक्याला थेट सर्व मुलांच्या मागे हाकलल्यावरच थांबे. मग आम्हाला अवेळी शौर्य दाखविल्याचा काय परिणाम होतो आणि आपल्या येथील नेत्याने आपले कोणाचेही स्थान जावू न देण्याची किती मोठी कामगिरी बजावली आहे, हे लक्षात येई. अशा घटना मैदानात वेगवेगळ्या दिशेला ए्काच वेळी सुरू असत आणि मग शिट्ट्या व हिरवीगार कडुलिंबाच्या काडीची जुगलबंदी वेगवेगळे शिक्षक करत असत. त्यावेळी त्यांची जागा गेल्याने इतरांना पुढची जागा मिळे आणि ते मोठमोठयाने हंसत ! हे हसणे त्यांच्या फजितीला का यांना जागा मिळाली या आनंदासाठी का दोन्हीसाठी हे समजत नसे. पण याचाही गलका जास्त झाला की ते शिक्षक मग आमच्याकडे पाहून, 'काय, माकडं जमा झाली आहेत नुसती ! एका ठिकाणी काही स्वस्थ उभी राहू देत नाही आपल्याला ! कारे, तुम्हाला पण जायचे आहे का त्यांच्याकडे, मैदानापलिकडे ?' हा नुकताच भीषण परिणाम पाहून अनुभवी झालेल्या आम्हास विचारून गप्प करत ! मात्र एकंदरीत हे दृष्य मोठे गमतीदार दिसे.
मग अचानक एकदम शांतता होई. शूऽऽ शूऽऽऽ आवाज येई. पहातो तर काय ? शाळेची गणवेश घातलेली मुलं व मुली रांगेत येत असत, शिस्तीत आपापल्या जागेवर बसत. पुन्हा दुसरा जथ्था येई त्यांच्या हाती लेझीम, काठ्या, डंबेल्स, निळे-पांढरे झेंडे असत. ते पण व्यवस्थित बसत ! मग ही मोठी पलटण येई पोलीसांची, होमगार्डची ! ती उभी राही. तेवढ्यात दुसऱ्या दिशेने शाळेचे बॅंडपथक आलेले असे ! आता कोणाकडे पहावे आणि काय पहावे अशी परिस्थिती झालेली असे. तेवढ्यात एकदम कडक ड्रेसमध्ये, चकचकीत बूट घालून फौजदार आलेले असत, मग मात्र खरोखरीच शांतता होई. ती त्यांच्या हातातील चमचमणाऱ्या तलवारीमुळे का फौजदार या शब्दामुळे कोणास ठावूक ! जरा वेळ जातो न जातो तोच - 'आले, आले' हा गलका ऐकू येई. तालुक्याचे तहशीलदार आलेले असत. मग मात्र आम्ही मुलं एकमेकांना परस्पर गप्प करत असू !
तालुक्याचे राजे असलेले तहशीलदार बॅंडच्या तालावर मैदानाची, कवायतीसाठी जमलेल्या सर्वांची पहाणी करायचे ! आमचा तिरंगा आकाशात फडकावयाचे ! आम्ही त्यांच्याकडे पहायचो व राष्ट्रगीत वाजायचे ! डोळ्यात पाणी यायचे, इतके सुंदर वाजवीत !
नंतर थोड्या वेळाने मग पुन्हा शाळेचा बॅंड सुरू होई, आमच्यावर चाल करून येणाऱ्या शिक्षकांची शिटी मग तालात ऐकू येई आणि मग त्या पटांगणावरील विविध विद्यार्थ्यांचे गट आपली कवायत सुरू करीत ! 'एक दो तीन चार -- पाच छे सात आठ । आठ सात छे पाच -- चार तीन हात बदल ।।' वा ! ते दृष्य मला आजही वर्णन करता येत नाही !
काही वेळा लेझीमचे हात, तर काही जण डंबेल्स ! काही काठ्यांचे हात करत तर काही झेंड्यांचे हात करत ! काही नुसतीच कवायत करत ! एकाच वेळी, वेगवेगळे गट ही वेगवेगळ्या कवायतीचे इतके सुंदर प्रकार करत की कोणता प्रकार पहावा हा आमच्या सारख्यांना प्रश्न पडे ! सर्व विद्यार्थी कवायत करतांना इतके काही सुंदर दिसत की आमचा ताबडतोब निष्कर्ष निघायचा की 'आपल्या मराठी शाळेत काही मजा नाही. हायस्कूलात आले पाहीजे.' आमची खूप इच्छा असायची पण पाचवी आणि त्यानंतरच्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश घेता येई हीच काय ती अडचण असे, त्यामुळे इच्छा असूनही आम्हाला आमच्या त्यावेळच्या इयत्तेप्रमाणे नाईलाजाने दोन-तीन वर्षे थांबावे लागे.
मग बॅंडवरील धून बदललेली असे. शाळेच्या विद्यार्थ्यांची, बालविरांची, छात्रसेनेची, होमगार्ड व पोलीसांची परेड सुरू होई ! एका लयीत, बॅंडच्या तालावर टपटपटप करत चालणारे ते पोलीस आणि पुढे चमचमणारी ती फौजदाराच्या हातातील तलवार ! डोळ्याचे पारणं फिटे ! संपूर्ण मैदानाला फेरी मारतांना, ती सर्व मंडळी आपल्याजवळून जात ! का कुणास ठावूक, मला उगीचच वाटे की हे सर्व आपल्याजवळून जातांना आपल्याकडे पहात आहे.
भाषणांचा कार्यक्रम होई. मोठमोठी माणसं भाषण करीत, काहीच्या गळ्यांत हार घातला जाई - फुलाचा गुच्छ दिला जाई ! ही सर्व मंडळी दिसायला म्हातारीच असत, धोतरबितर नेसून येत. त्यांच्या सोबत नऊवारीतील आजी असत. आजी जरा थकलेल्याच वाटत पण त्यांना त्या आजोबासोबत चालतांना बरे वाटत असावे असे मला विनाकारणच वाटे. सर्व जण ज्याच्यासमोर वाकून बोलत आहे, ज्याला घाबरत आहे तो तहशीलदार हा या 'आजी-आजोबांपुढे' का एवढा वाकतो आहे, याचे कारण आमच्या बालबुद्धीला काय समजणार ? पण हे आजी-आजोबा तहशीलदारांपेक्षा पण बऱ्यापैकी मोठे असावेत असा अंदाज येई. मग शाळेचे मुख्यशिक्षक बोलत त्यातून एवढाच बोध होई की या आजी-आजोबांमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, हे खरे आपल्या स्वातंत्र्याचे सैनिक ! कोणी फटके खाल्ले, कोणी काठ्या खाल्या, कोणाचे हात-पाय मोडले, कोणी बरेच दिवस तुरूंगात होते. त्यांचे आपण कायमचे ऋणी आहोत.
कार्यक्रम संपत आलेला असे. मग आम्हा मुलांना काय मिळणार हीच उत्सुकता असे. गोळ्या, चॉकलेट, केळी का अजून काही ! बहुतेकांना काही ना काही वाटले जाई. कार्यक्रम संपे आणि मग निवांतपणे रमतगमत आम्ही घरी परतत असू !
मात्र आजही प्रजासत्ताक दिन म्हटला की माझ्यासमोर माझी तिसरी-चौथीतली मूर्ती उभी रहाते. मराठी शाळेतून कार्यक्रम आटोपल्यावर पळतपळत हायस्कूलला गेल्याचे आठवते. हे संपूर्ण चित्र डोळ्यासमोर उभे रहाते आणि परक्यांच्या तावडीतून आपल्याला सोडविणाऱ्या, मात्र आजही त्यांचे नांव-गांव माहित नसलेल्या, त्यावेळी पाहिलेल्या, त्यावेळेस सत्कारमूर्ती असलेल्या, त्या म्हाताऱ्या, थकलेल्या पण डोळ्यात तेज असलेल्या आजी-आजोबांची मूर्ती माझ्या डोळ्यासमोरून आजही जात नाही.
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो !

No comments:

Post a Comment