Saturday, June 3, 2017

उठी श्रीरामा पहाट झाली

उठी श्रीरामा पहाट झाली

पहाटे पहाटे एखाद्या रागातील गीत आणि सकाळ असल्याने 'भक्तीगीत' ऐकणे इतके सुंदर वाटते. आताच औरंगाबाद आकाशवाणीवर 'आशा भोसले' यांनी गायलेले 'सुरेश भट' यांचे 'उठी श्रीरामा, पहाट झाली' हे इतके सुंदर 'भक्तीगीत लागले होते की माझे काम थोडे बाजूला ठेवून येथे लिहिण्याचा मोह आवरेना ! 'भूप' आणि 'देशकार' या रागातील छटा असलेले हे सुंदर गीत ! अत्यंत सोपे, निरागस, आईच्या भाषेतील ! आपल्या तान्हुल्याला उठविण्यासाठी समजावीत असलेली माता कोणत्या शब्दात बोलेल, हे काव्यात लिहिण्याचे 'सुरेश भट' यांचे सामर्थ्य आणि 'सुधीर फडके' यांच्या सारख्या जाणत्या, समर्थ संगीतकाराने स्वरांत गुंफलेले ते स्वरांचे वस्त्र ! या पेक्षा जास्त काय बोलावे !
उठि श्रीरामा, पहाट झाली, पूर्व दिशा उमलली
उभी घेउनी कलश दुधाचा कौसल्या माऊली
होमगृही या ऋषीमुनींचे सामवेद रंगले
गोशाळेतुन कालवडींचे दुग्धपान संपले
मंदिरातले भाट चालले गाऊन भूपाळी
काल दर्पणी चंद्र दावुनी सुमंत गेले गृहा
त्याच दर्पणी आज राघवा सूर्योदय हा पहा
वसिष्ठ मुनिवर घेउन गेले पुजापात्र राउळी
राजमंदिरी दासी आल्या रत्‍नदीप विझविण्या
ऊठ राजसा, पूर्वदिशेचा स्वर्ण-यज्ञ पाहण्या
चराचराला जिंकुन घेण्या अरुणप्रभा उजळली

१५ सप्टेंबर २०१६


No comments:

Post a Comment