Saturday, June 3, 2017

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आठवणी

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आठवणी

आज ३१ अॉक्टोबर ! आपल्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा स्मृतीदिन ! ३१ अॉक्टोबर १९८४ रोजी आपले पंतप्रधान पदाचे कर्तव्य बजावत असतांना त्यांनी देशासाठी आपले प्राण दिले. माजी पंतप्रधान कै. इंदिरा गांधी यांच्यासंबंधूच्या दोन आठवणी माझ्या मनांत खूप खोलवर रूतून बसलेल्या आहेत. एक मी कॉलेजजीवन अनुभवत असतांना तर एक बालपणातील शालेय जीवनाचा आनंद लुटत असतांना की ज्या वेळी चांगले-वाईट काही समजत नसे. आपल्या आसपासच्या वातावरणावर अवलंबून त्यात मिसळून जात असे.
सन १९८४ ला मी विधीमहाविद्यालयांत शिकत होतो, तिसऱ्या वर्षाला ! दि. ३१ अॉक्टोबर, १९८४ रोजी सकाळपासूनच रेडिओवर जे संगीत लागले होते ते दुखवट्याचे होते. अंगरक्षकांनी गोळ्या झाडल्या या पलिकडे काही समजत नव्हते. त्यानंतर होणाऱ्या राजकीय घडामोडी आणि त्यांचे पुत्र म्हणजे नंतर आपले पंतप्रधान झालेले स्व. राजीव गांधी यांचे त्या वातावरणांत आगमन झाले आणि मग जाहीर झाले की पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर अंगरक्षकांनी गोळ्या झाडल्या आणि त्यात त्यांचा अंत झाला. ही बातमी जाहीर होणार याची कल्पना यायलाच लागलीच होती, मात्र असे होवू नये असेही वाटत होते. कर्तबगार व्यक्तींचा अंत या पद्धतीने व्हावा हे मनाला पटत नव्हते. बातमी ऐकल्यावर माझ्या पोटात पडलेला खड्डा मला आजही आठवतो, जाणवतो आणि आजही जाणवला; रितेपण जाणवायला लागते.
दुसरी आठवण म्हणजे सन १९७१ सालातील, मी पाचवीलाच असेन ! आमच्या गांवात आमच्या आडनांवाचीच गल्ली आहे, 'भोकरीकर गल्ली' ! तेथे कै. दत्तोपंत काळे हे गल्लीच्या टोकाला रहायचे, त्यांच्या शेजारीच माझ्या मित्राचे म्हणजे धर्मवीर गिनोत्रा यांचे घर ! गिनोत्रा यांनी भारताच्या फाळणीचे, जे काही आज आपला ऐकून विश्वास बसणार नाहीत, अनुभव भोगले होते. माझी आईच्या डोळ्यात आजही धर्मवीरच्या आईने त्यावेळचे सांगीतलेले अनुभव आठवल्यावर पाणी येते. त्याच्या शेजारी कै. धोंडोपंत दलाल यांचा वाडा ! त्यांचा आमच्या गल्लीतील दरारा वेगळाच आणि आमच्या घरासमोर कै. भावे सर ! असो.
घरी रेडिओ असणे हे त्या काळात नंतरच्या काळाइतके सर्रास झाले नव्हते, रेडिओ निवडक घरांत असे ! आमच्या घरी रेडिओ नव्हता, मग बातम्या वगैरे ऐकायला माझे वडिल दत्तोपंत काळे यांच्याकडे जात. काही वेळा महत्वाची बातमी असली की ही बातमी सर्वांना ऐकू जावी, एवढ्या मोठ्या आवाजातही कै. दत्तोपंत रेडिओ लावत. बातम्यांनंतर त्यांच्या सर्वांच्या होणाऱ्या चर्चा या मला बातम्यांपेक्षा चांगल्या समजत असत; आणि मग मी त्या बातम्या, माझ्या भाषेत आणि मित्रांना समजतील अशा बेताने, माझ्या मित्रांना सांगत असे. कै. दत्तोपंत काळे हे कै. इंदिरा गांधीचे अनन्यसाधारण भक्त ! त्यांच्याकडे कै. इंदिरा गांधींसोबत त्यांचा असलेला फोटोपण आहे.
थंडीचे डिसेंबरचे दिवस, शेवटचा आठवडा ! माझे वडील त्यांच्याकडे रात्रीच्या बातम्या ऐकण्यासाठी गेले. बऱ्यांच वेळा ते संध्याकाळी सात वाजेच्या मुंबई आकाशवाणीच्या बातम्या ऐकायला जातो हे घरी सांगून जात ते रात्री नऊ वाजेनंतर येत. त्यांच्या बातम्यांसंबंधी ज्या चर्चा होत त्याची खातरजमा ही लगेच पुढच्या बातम्यांमधे तपासून घेतली जात असावी. काही वेळा चर्चा इतक्या रंगत, की त्या दरम्यान आकाशवाणीचा वृत्तनिवेदक बातम्या सांगून, आपले काम बजावून जाई. एका दिवशी बराच उशीर झाला म्हणून आईने मला 'वडिलांना बोलावून आण' म्हणून पिटाळले. तो काय - कै. दत्तोपंत काळे अत्यंत खुशीने आवाज न करता हसत होते. 'याला म्हणतात काम' अशा अर्थाचे काही बोलत होते. कधी नव्हे ते माझा मित्र धर्मवीर याचे वडील आणि दुसरा मित्र शिरीष नाईक याचे आजोबा कै. धोंडोपंत दलाल हे देखील अत्यंत आनंदाने चर्चेत सामील झाले होते. 'पाकिस्तानचे भारताने चांगलेच कंबरडे मोडले, भारत जिंकला ! इंदिरा गांधीने चांगला धडा शिकवला, पुन्हा पाकिस्तान नांव काढणार नाही आता. बांग्लादेश झाला, बरे झाले.' अशा स्वरूपाच्या चर्चा सुरू होत्या. माझ्या वडिलांनी मला 'भारत जिंकला. इंदिरा गांधीने जबरदस्त काम केले. पुन्हा पाकिस्तान तोंड वर काढणार नाही.' हे सांगीतले.
'इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे कंबरडे मोडले आणि तो पुन्हा मान वर करून पहाणार नाही.' हे माझ्या वडिलांनी मला माझ्या बालवयात सांगीतलेले वाक्य मी कधीतरी विसरणे शक्य आहे का ?

३१ ऑक्टोबर २०१६

No comments:

Post a Comment