Friday, June 2, 2017

कौटुंबिक गप्पा - होतात का आपल्या ?

कौटुंबिक गप्पा - होतात का आपल्या ?

आपली मुले आता शाळेत, महाविद्यालयांत जातात, त्यांना तेथील प्रवेश इतका सहज, विनासायास व स्वस्त नसतो. प्रवेश घेतल्यानंतरही वर्षभर तेथे जो शिक्षणाचा विविध प्रकारे व अफाट खर्च येतो, ते पाहून आपण शिक्षणक्षेत्रात नेमकी कोणत्या प्रकारची प्रगती केली आहे ? संख्येत, गुणवत्तेत का खर्चात ? आपले उत्पन्न खरोखर वाढले आहे, का कमविणारे वाढले आहेत, का उत्पन्नातील खाणारी तोंडे कमी झाली, म्हणून हा खर्च करता येतो ? माझ्या संपूर्ण शिक्षणाला जेवढा खर्च माझ्या वडिलांना आला नसेल, त्यापेक्षा जास्त खर्च माझ्या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी एकदोन वर्षांतच आला.
पूर्वी एकत्र कुटुंबपद्धतीत असलेल्या कुटुंब सदस्यांची संख्या आणि कमविणाऱ्यांची संख्या हे कमालीचे व्यस्त प्रमाण असे. त्यामुळे कायम सर्वांचीच ओढग्रस्तीची परिस्थिती असे. जिचा नवरा किंवा ज्यांचे वडिल हे घरातील कर्त्याची भूमिका निभावत त्यांना तर अवघडच ! सर्वांना समान वागणूक दिली जाते आहे, कर्तापुरूष नि:पक्ष आहे व वागतो आहे; हे सर्वांना पटेल असे स्वत: वागणे म्हणजे अग्निदिव्यच असे. त्याच्या या वागण्याने त्याच्या पत्नी व मुलांच्या मनांत 'आपल्यावर अन्याय होत आहे' ही किंचीत भावना निर्माण होई, ते स्वाभाविकच असे; प्रत्येकाची स्वप्न असतात ! असं असले तरी ज्यांच्यासाठी केल्याने, आपल्याबद्दल आपल्यांच पत्नीमुलांत अशी भावना निर्माण होते, त्यांच्या मनांत आपल्याबद्दलही 'हा त्यांच्याच मुलांना जास्त करतो' ही भावना असे, बालपण असते, त्यांत त्यांना समज तो काय असणार ?
महत्वाची भूमिका असते ती घरांतील इतर सदस्य महिलांची, की घरात द्वेष, मत्सर निर्माण होवू देवू नये. एकदा का द्वेष, मत्सर महिलांच्या मनांत निर्माण झाला की ते घर बसायला, घराचे वासे फिरायला काही वेळ लागत नाही.
मग प्रत्येक जण, सदस्य वेगवेगळा, फक्त आपल्यापुरताच पहातो व केवळ एकत्राचा फायदा उपटतो. आपले एकत्र कुटुंबातील सदस्य म्हणून कर्तव्यच विसरतो; काही वेळा तर कुटुंबाशी व त्यातील सदस्याशी अप्रामाणिक होतो व त्यालाच तो व्यावहारिकता, हुशारी समजतो. घरातील कर्त्याचे वागणे इतरांना बावळटपणाचे, अव्यवहार्य वाटू लागते. अशा सदस्यांचा विचार केला तर ते तसे असतेही ! तरी आपल्या कुटुंबाबद्दलच्या, घराबद्दलच्या दिव्य व उदात्त कल्पना त्याच्यावर स्वार झालेल्या असल्याने त्याची आशा सुटत नाही. 'एक ना एक दिवस देव सर्वांना चांगली बुद्धी देईल आणि आपण यातून बाहेर पडू', असेच त्याला वाटू लागते. शेवटी तर त्याला कर्तेपणाचे व्यसनच जडते ! आता त्याच्यातून त्याची अपवादानेच सुटका होते.
घरातही धूर्त, मुत्सद्दी, पाताळयंत्री, लबाड, घातक तसेच कामसू, सत्शील, सरळ व्यक्ती असतात. मात्र 'कार्य करणे कठीण व विनाश सोपा' हे तत्व सर्वसमान अनुभवास यायला लागते; परिणामी एकत्र कुटुंब सावरायला, जी एकी व एकीचे बळ लागत असते यालाच खालून मुळापासून चूड लागलेली असते. अशावेळी ती एकत्र कुटुंबाची भलीमोठी इमारत भस्मसात व्हायला काय वेळ लागणार ? नंतर बघायला मिळतात ते एकी जळाल्याने झालेले कोळसे !
परवा मुलांशी व पत्नीशी असाच बोलत बसलो होतो.

१२ फेब्रुवारी २०१७

No comments:

Post a Comment