Saturday, June 24, 2017

खोटी आश्वासने आणि आयुष्याची धूळधाण

खोटी आश्वासने आणि आयुष्याची धूळधाण

काल दुपारनंतर थोडा निवांतपणा मिळाला. दोन लेख वाचायचे होते. मला ई-मेलने पाठविले होते. त्यांची प्रिंट काढली आणि वाचले. लेख काढून वाचल्यावर वाटले, लगेच त्यां लेखकांना फोनवर सांगावे, 'खरंच छान ! आवडले !'. मात्र लगेच फोन करायचे राहून गेले. माझ्या मित्राच्या पत्नीची प्रकृती पहायला येथे औरंगाबादलाच दवाखान्यात गेलो. तेथे माझा मित्र होताच, गांवी असतो तो. शाळेत बरोबर होतो आम्ही. तो व्यवसायाने डॉक्टर आहे. त्याला येथे थांबावे लागल्याने, त्याचा तेथील दवाखाना विस्कळीत झाला होता. बस, मग अशीच एकमेकाची ख्यालीखुशाली विचारून झाली. सौ. वहिनींची तब्येत काळजी करण्यासारखी नव्हती, पण काळजी होतीच. आॅपरेशन मोठे होते.
या लेखांचा विषय त्यावेळी डोक्यात होताच, नुकतेच वाचलेले होते. जगांत दु:ख आहे, संकटे आहेत, अनिश्चितता आहे, सुखेनैव आयुष्य जगतां येईल पण अशा नोकऱ्या आहेत, तशाच आकाशाला गवसणी घालता येईल अशा संधी आहेत; या निमित्ताने मोठमोठ्या लोकांच्या सहवासात रहायला मिळते. त्यातून मिळणारा अनुभव आहे, घेतला जाणारा धडा आहे. आपल्यावर अवलंबून आहे, आपण त्यांना तोंड कसे द्यायचे. आमच्या या रेषेत गप्पा सुरू होत्या, अडीअडचणींच्या व सुखदु:खाच्या ! गतकाळातील अनुभवांच्या !
काल वाचलेल्या लेखांपैकी एक होता, सौ. मंगला बर्दापूरकर यांचा ! श्री. प्रविण बर्दापूरकर यांचा 'स्थित्यंतरं आणि स्थलांतरं' हा दुसरा लेख, त्यांचा हा पूर्वप्रसिद्ध झालेला लेख वाचला. सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे जाण्याची इच्छा असलेल्याला, त्याचेकडील अत्यंत मर्यादित साधनसामुग्रीवर किंबहुना नसलेल्या साधनसामुग्रीवर प्राप्त परिस्थितीत पुढे जायचे असेल तर कायकाय अडचणी येतात, हे स्वानुभव असल्याने जास्त जाणवले. आज लिहावेसे वाटले ते श्री. प्रविण बर्दापूरकर यांच्या लेखामुळे ! वेगवेगळ्या ठिकाणी भेटलेली माणसं अापले अनुभवविश्व समृद्ध करतात, काही तरी शिकवतात.
सौ. बर्दापूरकर यांचा लेख पण सुंदर, त्याचेबद्दल थोडे नंतर ! यांत कोणाला 'पुरूषप्रधान, मनुवादी संस्कृतीचा वास' आला तर समजो बापडे, मात्र माझेकडे वातावरण तसे नाही.
या लहानपणच्या अडचणी तुमचे शिक्षण संपले, तुम्ही उद्योगाला लागले, दोन पैसे कमवायला लागले म्हणून संपणार नसतात. ज्या ठिकाणी तुम्ही काम करत असतात ही सर्व मंडळी तुमच्याकडे पहात असते. तुम्ही लक्षवेधक काम करत असाल व तुमच्या कामाने जर तुमच्या मालकाला जास्त लाभ होणार असेल तर मग ही तेथील सर्व मंडळी तुमच्या प्रत्येक कामाकडेच नव्हे तर तुमच्या प्रत्येक कृतीकडे डोळ्यांत तेल घालून बघत असतात ! तुमच्या कौतुकासाठी नाही तर तुम्हाला कसे अडचणीत आणता येईल यांसाठी ! तुमच्या दुर्दैवाने जर तुमच्या वरिष्ठांस जर तुमच्यापासून, तुमच्या कामसूपणामुळे धोका आहे असे वाटले तर अवस्था जास्त बिकट होत जाते. मग कार्यालयांत कामाच्या ठिकाणी गट पडतात, अडवणूक सुरू होते, मालकाकडे कामाचे चुकीचे व खोटे रिपोर्टिंग सुरू होते. ही अवस्था ज्याच्या लवकर लक्षात येईल आणि जो काही त्याचेसंबंधी भलतेसलते होण्यापूर्वीच योग्य निर्णय घेवून तेथे रामराम ठोकतो, तो हुशार समजावा किंवा मग त्याला तशी संधी मिळते, तो भाग्यवान मानावा !
श्री. प्रविण बर्दापूरकरांनी 'लोकमत'मधील त्यांचा ते दिल्लीला असतांनाचा अनुभव लिहीलेला आहे. 'एखाद दिवशी तुम्ही भारतात नसतांना टर्मिनेशनची आॅर्डर दिली गेली तर मी आहेचा पूर्णपणे नाहीच होऊन जाईन !' हे वाक्य यांतील अस्थैर्य दाखवते. अत्यंत हे वाचल्यावर त्यांच्यातील हुशारीने, स्पष्टतेने त्यांना वाचविले की त्यांचे योग बलवत्तर होते म्हणून ते सुखरूप बाहेर पडून, यशाची नवनवी शिखरे सर करते झाले हे त्यांनाच जास्त माहीत ! या आजच्या स्थानापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांनी घेतलेले कष्टच त्यांचे हे स्थान सहजसाध्य नाही तर कष्टसाध्य आहे हे दर्शवतात; म्हणूनच हे तात्पुरते वा पद असे पर्यंतच नाही तर कायम आहे. लेख सुंदरच ! आपल्याला आपल्या पण गतकालीन घटनांची आठवण देण्याइतका समर्थ आहे.
त्यांचा योगावर, भविष्यावर विश्वास आहे की नाही याची मला कल्पना नाही. मात्र माझा आहे. प्रत्येक वेळी सारख्याच क्षमतेच्या दोन माणसांनी केलेल्या कामाला सारखेच फळ मिळत नाही, तेव्हा याचे कुठेतरी तारतम्याने गणित मांडावे लागते. तुमच्या कर्तृत्वानेच काम पुढे सरकते, पूर्णत्वास जाते पण फळ मिळण्यास बऱ्याच वेळा नशिबाची साथ लागते. त्यांतील त्यांच्या वाट्याला आलेली विविध महत्त्वपूर्ण कामे, जबाबदाऱ्या आणि वेगळ्या विचारांतील पत्रकारितेतील प्रयोग ! यासाठी बुद्धीनिष्ठ प्रयोगशीलता हवी व तशी संधी देखील मिळायला हवी. त्यांच्या आयुष्यातल्या विविध व्यक्ती पाहिल्या की हे जसे त्यांच्या कामाचे फळ आहे तसेच त्यांचा योग पण आहे आणि ही नशिबाची साथ श्री. प्रविण बर्दापूरकर यांना आहे, हे जाणवले !
------ --------- --------
एक सर्वसामान्य घरातील मुलगा आपल्या लिखाणातील कौशल्याने महाविद्यालयीन काळापासून वर्तमानपत्र लेखनाकडे ओढला गेला. दोन पैसे मिळत असतील, घरच्यासाठी ते हवेच असायचे. त्याचे काम पाहून एका बऱ्यापैकी नावाजलेल्या वर्तमानपत्रात त्याने काम करायला सुरूवात केली. तिथं बऱ्यापैकी बस्तान बसले, नांव होवू लागले, पुरस्कार वगैरे मिळाला. दुसऱ्या स्पर्धक वर्तमानपत्राने हे हेरले आणि हा माणूस आपल्याकडे हवा, हे ठरविले. तिकडले व्यवस्थित बसलेले बस्तान सोडून या माणसांच्या आश्वासनावर हा इकडे आला. नविन असलेल्या माणसाला इकडे कोणाच्यातरी हाताखाली सुरूवातीला काम करावेच लागणार होते. त्या प्रमाणे सुरू झाले. काही काळ गेला.
या ठिकाणच्या प्रस्थापितांना याचे काम सहन होईना. मग हा आणि याचा सोबत एखाद दुसरा एका बाजूला आणि यांचे विरूद्ध इतर बहुसंख्य, असे सुरू झाले. याच्या कामांत पदोपदी अडथळ्यांची शर्यत सुरू झाली, जाणीवपूर्वक ! कामांची क्षमता कमी दिसावी यासाठी. मग बदली झाली, ती पण यांच लोकांच्या हाताखाली ! खोटे रिपोर्टिंग नित्याचे ! अपमानास्पद वागणूक ! या प्रत्येक घटना सांगता येत नाही किंवा दाखवता येत नाही. मात्र अनुभवता येतात. वर्तमानपत्रातील मंडळींचा वावर मोठ्या, प्रसिद्ध लोकांत म्हणून ही त्रासदायक मंडळी पण मोठी व प्रसिद्ध ! शेवटी अशी वेळ आली की याला ते वर्तमानपत्र सोडावे लागले ! स्वेच्छेने सोडावे लागले, सोडणे भाग पाडले गेले का तेथून जबरदस्तीने हाकलले गेले, हा प्रश्न होता. तो येथे सांगण्याचा विषय नाही. मात्र हाच विषय पुढे कायद्याचा व न्यायालयीन प्रश्न बनला. त्याला स्वत:ची अशा अपमानास्पद परिस्थितीत नोकरी गेल्यावर हक्करक्षणासाठी न्यायालयात दावा करावा लागला. निरोद्योगी, गरीब माणूस असला की त्याच्या सत्य विधानाकडे पण कोणाचे लक्ष नसते.
खालील न्यायालयात निकाल विरूद्ध लागला. वरिष्ठ न्यायालयात त्या विरूद्ध दाद मागीतली, तिथं पण पदरी त्याच्या अपयश आलं. आता उच्च न्यायालयात जावे लागणार होते. तो माझ्याकडे आला, सर्व घटना तपशीलवार सांगू लागला ! मला त्याच्या बोलण्यातला खरेपणा, कळकळ व त्याचेवर झालेला अन्याय जाणवत होता. न्यायालय हे भावनेवर चालत नाही तर उपलब्ध पुराव्यावर चालतात. निर्णय आपल्या बाजूने हवा असेल तर तशी भावना निर्माण होईल असा पुरावा हवा ! इथं तर खालील दोन न्यायालयांचा निकाल विरूद्ध ! पुरावा दिसत नव्हता, त्याची सांगडही घातली नव्हती. असे असेल तर आपले काम अजूनच कठीण होते.
मी त्याला त्याच्या प्रत्येक म्हणण्याला पुरावा दाखव सांगू लागलो. तो वैतागला, पण शिकलेला व हुशार असल्याने सावरला. माझ्या म्हणण्यातले तथ्य त्याला समजले. 'खालचे दोन्ही न्यायालये तुमची शत्रू आहेत का म्हणून त्यांनी विरूद्ध निकाल दिला ?' असा प्रश्न उच्च न्यायालयाने दिला तर काय उत्तर देणार ? हे मला सांग. यांवर तो शांत झाला व कागदपत्र गोळा करायला लागला. प्रत्येक घटनेची काही तरी कच्ची पक्की, चिठ्ठीचपाटी हवी. बघताबघता सुमारे ३०० च्या आसपास कागद जमले, हे पुराव्यांमध्ये खाली नव्हते. 'का दाखल केले नाही ?' हे विचारले तर 'असं कोणी सांगीतलं नाही' हे उत्तर ! परिस्थिती कठीणच होती.
माझा न्यायसंस्थेवर व माणसांतल्या देवावर पूर्ण विश्वास आहे. मी दोन कारणांवरून दोन वेगवेगळे पिटीशन तयार केले, सोबत नविन पुरावा देण्याची परवानगी मिळावी हा अर्ज तयार केला आणि ना. उच्च न्यायालयांत हा भलामोठा गठ्ठा दाखल केला. सामनेवाल्या बड्या वर्तमानपत्राला व त्याच्या संपादकास नोटीस निघाली. या कामांत माझ्या विरूद्ध प्रतिथयश वकिलच येणे स्वाभाविक होते. अपेक्षेप्रमाणे झाले. पत्रकारांसाठीच्या कायद्यातील तरतुदी व याची वस्तुस्थिती यांवर खल झाला. न्यायालय थोडे अनुकूल झाले. दुसऱ्या पिटीशनची अवस्था यापेक्षा वाईट ! दोन तीन वेळा ते वेगवेगळ्या न्यायालयांत इकडून तिकडे गेले.
Why you have not filed all these documents in lower court ? Whether that is permissible to be considered a fresh in writ jurisdiction ? हे दोन प्रश्न गोळीसारखे न्यायाधीशांकडून माझ्याकडे आहे.
My Lord, There is no any provision and procedure to deprive my client from getting justice ! Kindly see, the chronological events and documents as prepared with list. I am sure, the evidence and answer would be there though there may not be any document about unfair labour practise and the manner in which my client was driven from the industry.
मा. न्यायाधीश शांततेने ती मी तयार केलेली दस्तऐवजांची यादी व थोडक्यात लिहीलेला तपशील वाचत होते. थोड्या वेळाने त्यांनी मान वर केली, त्या मोठ्या वर्तमानपत्राच्या वकिलाकडे पाहिले. 'Yes, Mr. you have to pay the damages and compensation.' आता आश्चर्य करायची पाळी त्याची होती. असे काही होईल, ही कल्पनाच नव्हती त्याला. त्याने काही सांगायचा प्रयत्न केला तर, ' Yes, Mr. Counsel, you know the jurisdiction of writ court ! Make statement about compensation at 2.30 or we will pass order !' शेवटी मीच सांगीतले, 'पक्षकाराला कळवतो व उद्या येथे बोलवतो.' दुसऱ्या दिवशी पहिल्या क्रमांकावर ते काम ठेवले.
मी पक्षकारांस कळवले, सकाळी चर्चा केली. 'आपली खरोखर जेवढी रक्कम घेणे आहे, ती आपण सांगू,' ही मी कल्पना दिली. समोरच्याने पण अंदाज काढला होताच. कोर्टासमोर काम निघाल्यावर मी रक्कम सांगीतली, व्याजासहीत हिशोब करून ! न्यायालयाने मला व्याज सोडायला लावले व वर्तमानपत्र मालकाने मूळ देणे रक्कम द्यावी, हे सांगीतले. नकार येण्याचा प्रश्नच नव्हता. त्याप्रमाणे आदेश झाला व सर्व केसेस काढून घ्यायचे ठरले. बाहेर आल्यावर, त्यांचे वकिल मला म्हणाले, 'ही बातमी पेपरांत देवू नका.वगैरे ' मी कबूल झालो. ही घटना आता जुनी झाली. त्याला आता 'बातमीमूल्य' आहे का नाही, याची मला कल्पना नाही.
माझ्यापुरता एक वकिल म्हणून हा प्रश्न समाधानकारकपणे पक्षकाराच्या हितात सुटला ! --- पण ज्या बुद्धीमान तरूण पत्रकाराने कोणाच्यातरी शब्दाखातर ऐन उमेदीत आपले सुखाचे आयुष्य केवळ समोरचा दिलेले आश्वासन पूर्ण करेल, चांगली संधी मिळेल, आपले भविष्य सुधारेल या विश्वासाने पणाला लावले, त्याच्या आयुष्याचे हे धिंडवडे निघाले त्याचे काय ? ते मोठे संपादक नंतर मानमरातबात निवृत्त झाले, ते वर्तमानपत्र उत्तम सुरू आहे, त्या मालकाला किंवा संबंधीत आश्वासन देणाऱ्याला ही घटना लक्षात तरी आहे की नाही, देव जाणे ! पण मला मात्र ही घटना आठवली, तर आजही वेदना देते.
श्री. प्रविण बर्दापूरकरजी तुमचा लेख वाचला ! अन् हे सर्व आठवले -- तुमच्या या व्यवसायाने मुद्दाम वाताहत केलेल्या किंवा त्याच्या कमी हुशारीने किंवा नशिबाने त्याच्या पत्रकार आयुष्याची वाताहत झालेल्याचा काय दोष होता ?

No comments:

Post a Comment