Saturday, June 3, 2017

लुटारू वृत्ती

लुटारू वृत्ती

काल जशी ही भारतीय सैन्याच्या कार्याची अभिमानास्पद बातमी ऐकली, मनाला आनंद वाटला ! सरकारचा अभिमान वाटला ! हो, आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत म्हणून त्यांचा अभिमान वाटला आणि दुसरे कोणी असते तर त्यांचाही वाटला असता; कारण ते भारताचे पंतप्रधान असतात ! त्यांचे कार्य हे भारतमातेला मान ताठ ठेवणारे झालेले असते ! या पूर्वीही अशा अतिरेक्यांच्या आपल्यावरील हल्ल्याच्या घटना घडल्यात, त्यावेळी असे काही अभिमान वाटावा असे पाऊल उचलले असते तर त्या पंतप्रधानांचा अभिमानच वाटलं असता !
ही घटना ऐकली आणि त्यावेळेपासून मनांत पुन्हा एकवार विचार सुरु झाले की पाकिस्तानवर किंबहुना अशा विचारसरणीवर पोसलेल्या व्यक्तीवर वा देशावर ही दिवसेंदिवस अशा स्वरुपाची वेळ का येत असावी ? त्याला विविध कारणे आहेत, ती गरिबी, बेरोजगारी, अशिक्षितपणा ही आहेतच आणि त्याचे विरुद्ध लढायचे आहेतच ! पण ही कारणे काय फक्त पाकिस्तानलाच लागू आहेत व त्याच्यासारख्या विचारसरणीच्या देशांनाच लागू आहेत ? नक्कीच नाहीत ! ही कारणे तर भारतामध्येही आहेत ! याच्या जोडीला अजून लोकसंख्यावाढ आणि हक्कांचे माजलेले महत्व ही देखील कारणे आहेत ! पण आपल्याकडे ही भीषणता इतकी का जाणवत नाही, त्याचे महत्वाचे कारण म्हणजे आपली संस्कृती आणि त्यावर वाढलेले आपण !
दुसऱ्याचे लुटणे हे वाईट असते हे आमच्या अत्यंत गरिबीने गांजलेल्या अशिक्षित माणसालादेखील ठाऊक आहे. सर्वाना दाणापाणी मिळू दे, सर्वांना सुखी ठेव आणि त्यासोबत मलाही सुखी ठेव ही आमच्या संस्कृतीची ठेव आमच्या संतांनी पिढयानपिढया आमच्या हवाली केलेली आहे. ती आम्ही जतन केली आहे आणि यथाशक्ती अमलांत आणली आहे. आमची संस्कृती कोणत्याही धर्माकडे बोट दाखवत नाही, तिचा स्वतःचा धर्म आहे - तो म्हणजे येथील भूमी, ही भारतभूमी ! येथील निर्माण झालेली संस्कृती पाळणारे आम्ही याच धर्माचे - मग त्याला कोणी हिंदू म्हणोत, कोणी वैदिक म्हणोत आणि अलीकडे कोणी भारतीय म्हणोत ! पण संस्कृती हीच ! मग त्याच्या विपरीत जर कोणी वागले तर आपण चुकीचे वागतो याची लाज आमच्या मनाला वाटते, ही आमची समाजधारणा आहे. खूप पैसेवाला पण क्रूरकर्मा, खुनशी आणि दुष्ट अशा व्यक्तीलाच काय पण राजालासुद्धा या समाजाने मान दिलेला नाही व त्याचे समर्थक ते बनले नाहीत.
दुसऱ्याची संपत्ती लुटायची, तेथील जनतेला पिडायचे, आयाबहिणींची अब्रू लुटायची, त्याच्यावर अत्याचार करायचे आणि या अशा व्यक्ती जर परक्या धर्माच्या असल्या तर हि सर्व कृत्ये पुण्यकर्मच ! हीच जर विचारसरणी असेल आणि अशाच विचारसरणीची सातत्याने समाजांत पेरणी होत असेल तर त्यातून होणारी उगवण ही यापेक्षा काही वेगळी होणार नाही. तीच होणार, हा निसर्गनियम आहे ! ही विचारसरणी मग देशातीत आणि कालातीत आहे ! शेवटी हाच अनुभव सर्वत्र येत आहे आणि येणार आहे ! अजूनही वेळ गेलेली नाही, आपण या संस्कृतीच्या विचाराशी समरस होऊ शकतो, एकरूप होऊ शकतो आणि देशाला, समाजाला निश्चितच पुढे नेऊ शकतो, त्यातून आपला विकास आपोआपच होणार आहे !

३० सप्टेंबर २०१६

No comments:

Post a Comment