Saturday, June 3, 2017

कै. सुरेंद्र तळोकार यांस

कै. सुरेंद्र तळोकार यांस

आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देण्यासाठीची यादी, फेसबुक उघडल्यावर माझ्यासमोर आली !
माझ्या कॉलेज जीवनातील नूतन मराठा कॉलेजमधील मित्र 'सुरेंद्र तळोकार' याचे नांव दिसले, कॉलेजचे दिवस आठवले, नाटकात त्याच्यासोबत काम केलेल्या आठवणी जाग्या झाल्यांत ! दोन-तीन वर्षांपूर्वी त्याचेशी फोनवर बोलल्याची आठवण जागी झाली ! कदाचित दहा-बारा वर्षांपूर्वी अथवा अगोदरही असेल, योगायोगाने दादरला 'शिवाजी मंदिर' येथे त्याची झालेली भेट आठवली. मागील काळातील आमच्या सोबत असलेल्या नाटकात काम करणाऱ्या मित्रांच्या आठवणी निघाल्यात आणि अर्धा-पाऊण तास कसा गेला ते समजलेच नाही ! दरम्यान तेथे त्याच वेळी तेथे 'गिरीराज' आणि 'उषा नाडकर्णी' यांची त्याच्याशी बोलल्याने माझेशी त्यांची झालेली दृष्टभेट आठवली !
आज त्याचा वाढदिवस आहे हे पहिले, या आठवणी आल्या आणि मनाला अतिशय वेदना झाल्यात ! सुरेंद्र तळोकार आज आमच्यांत नाही ! मागे असेच काहीतरी फेसबुकवर वाचनांत आले आणि 'भूषण भाकरे' यांचेशी बोलणे झाले. त्यानंतर त्याच्या मुलाशीही बोलणे झाले ! त्यांचेकडे मला कोणी ओळखण्याचा प्रश्नच नव्हता, कॉलेजमधील आमची ओळख आणि त्यानंतर योगायोगाने झालेली भेट ! वेगवेगळी झालेली आमची क्षेत्रे आणि त्यांत रमलेले आम्ही ! माझे कायद्याचे क्षेत्र, तर मी जवळपास सोडून दिलेले मात्र त्याने अट्टाहासाने कायम ठेवलेले अभिनयाचेच संबंधीत, चित्रपटाचे क्षेत्र ! स्वाभाविकच आमच्या भेटी कमीकमी होत गेल्या, चुकूनमाकून कोणी भेटले तरच एकमेकांच्या आणि त्यावेळच्या मित्रांच्या आठवण निघणार, अन्यथा नाही !
गेलेल्या व्यक्ती या जगातून निघून जातात आणि मागे आमच्यांसाठी किती अबोल आठवणी आणि आठवणीमय वेदना ठेवून जातात ?

७ सप्टेंबर २०१६

No comments:

Post a Comment