Saturday, June 3, 2017

भाजी विक्रेते आणि फेरीवाले

भाजी विक्रेते आणि फेरीवाले

मी शाळेत असतांना तत्कालीन 'युनायटेड वेस्टर्न बॅंक लि.' येथे 'रामा' नांवाचा रात्री वॉचमन म्हणून काम करायचा. तत्कालीन महागाईच्या हिशोबाने संसारास पुरत नसल्याने म्हणा किंवा कोणत्याही कारणाने 'रामा' दिवसा लोटगाडीवर भाजी विकायचा. मध्यंतरी मी बाहेरगांवी शिकायला गेलो, त्यानंतर ७-८ वर्षांनंतर आल्यावर पहातो तो 'रामा' अजूनच थकलेला होता, पण लोटगाडीवर भाजी विकण्याचे काम सुरू होते; फक्त आवाजातील ताकद कमी झालेली होती आणि लोटगाडीची गती कमी झाली होती. मी विचारले, 'काका, आता आराम करा. किती दिवस करणार ?' 'पोरा, आमच्यासारख्यांना एकदमच आराम मिळतो, तो तेथे !' त्यांनी वर बोट केले. यावर माझ्याकडे उत्तर नव्हते.
शाळेची मधली सुट्टी झाली की आम्ही घरून आणलेला डबा शाळेच्या गच्चीवर खायला जायचो. डबा लवकर खावून झाला की थोडा वेळ शाळेच्या बाहेर एक लोटगाडीवर चणे विकणारा उभा असायचा तेथे रेंगाळत ! ५ पैसे, १० पैसे देवून ज्यांनी डबा आणला नसे ते चणे घेत. हाच माणूस उन्हाळ्यात लोटगाडीवर बर्फाचा गोळा छानपैकी रंगीबेरंगी करून विकत असे. शाळा संपली, कॉलेजला गेलो, त्यानंतर काही वर्षांनी आलो. यांची सहज आठवण झाली. गांवात फिरताफिरता पुन्हा लोटगाडी लोटतांनाच दिसले तर आता त्यांच्याजवळ खारे शेंगदाणे, फुटाणे, डाळ्या, मुरमुरे, लाह्या होत्या. 'आता चणे विकत नाही?' मी विचारले. 'दगदग होत नाही ! हरबरे आणायचे, ते नीट भिजवायचे, शिजवायचे ! कांदा, लिंबू, तिखटमीठ हे सगळे प्रमाण राखायचे, हे वयोमानाने जमत नाही.' त्यांच्या उत्तराने मी त्यांच्याकडे पाहिले तर तोंडात दोनचार दात राहिले असतील. 'दगदग जमत नाही तर आराम करा.' मी म्हणालो. 'बेटा, हे शरीर आरामाचे नाही. आराम केला तर कायमचाच आराम करावा लागेल.' त्यांचे उद्गार !
हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे गेल्या सोमवारी मी गांवाला निघालो होतो, गाडी रात्री दहाची होती. मी तेथे नऊ वाजता पोचलो. बसायला असलेल्या ट्रॅव्हल एजन्सीच्या जागेवर मी निवांत बसलो. गाडी येईपर्यंत काही काम नव्हते. लक्ष खालच्या बाजूला शेजारीच गेले. जेथे या गाड्या उभ्या रहात होत्या तिथे दर सोमवारी बाजार भरतो. त्याप्रमाणे रात्री देखील बाजार सुरू होता.
रिमझीम पाऊस सुरू होता. माझे लक्ष सहज एका जवळच बसलेल्या भाजीवाल्याकडे गेले. त्याने पाऊस लागू नये यासाठी डोक्यावर दुमडून तागाचे पोते घेतले होते व समोरच कोथिंबीर, मेथी या भाजीचा छोटा ढीग एकीकडे व १५-२० भोपळे व गिलकी असा छोटा ढीग दुसरीकडे, असे दिसत होते. नऊ साडेनऊपर्यंत तो आशेने बसला होता, ४-५ गिऱ्हाईक आले, त्यांनी जे काही घ्यायचे ते घेतले. आता गिऱ्हाईक जे म्हणेल त्या भावात हा देत असावा.
पावणेदहा वाजले. त्याने कोथिंबीर व मेथीचे गाठोडे बांधले. गिलके, भोपळे ज्या पोत्यावर विक्रीस ठेवले होते, ते पोते खालून खसकन ओढून काढले, त्यावरील भोपळे व गिलकी जमीनीवर विखुरली. ती तशीच पडू दिली. ते रिकामे पोते त्याने त्याचे जवळच्या दुसऱ्या छोट्या बोचक्यात कोंबले. ज्या प्लॅस्टीकच्या तरटावर बसले होते, त्यावरून उठून ते तरट पण छोट्या बोचक्यात भरले. मग त्याने डोक्यावरचे दुमडलेले पोते काढले. बघतो तर ते साधारण ६०-६५ वर्षांचे गृहस्थ होते. डोक्यावर पोत्याची कुंची असल्याने आणि मी त्यांचे मागील बाजूने असल्याने मला चेहरा व्यवस्थित दिसला नाही. गुडघ्यांवर रेटा देवून हा म्हातारा उठला. धोतर नीट कसले. उजव्या हाताने मोठे गाठोडे उचलले. छोटे बोचके डाव्या हातात घेतले आणि जमीनीवर विखुरलेल्या, थोड्या वेळापूर्वी विकत असलेल्या त्याच्या गिलक्या व भोपळ्यांकडे न पहाता, त्या रात्रीच्या दहा वाजेच्या उजेडात हा लडखडत घराकडे चालू लागला.
ट्रॅवल्सच्या अॉफिसमधील टीव्हीवर बातम्या सुरू होत्या - सरकारी कर्मचाऱ्यांची त्यांच्या मागणीसाठी संपाची हाक !

२ सप्टेंबर २०१६

No comments:

Post a Comment