Friday, June 2, 2017

अभिव्यक्ती स्वातंत्र्य

अभिव्यक्ती स्वातंत्र्य 

काल राजस्थान मधील चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी तेथील काही लोकांनी महाराणी पद्मीनी आणि तत्कालीन दिल्ली शासक अल्लाउद्दीन खिलजी यांच्यात असलेल्या प्रेमप्रकरणाची स्वप्नकथा मांडण्यावर आक्षेप घेवून तोडफोड केली. ही घटना !
तोडफोड करणे हे बरोबर आहे का आणि त्याने संजय लीला भंसाळी यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली का हे दोन प्रश्न निर्माण होतात. मात्र अजून संजय लीला भंसाळी यांचे त्यांच्या स्वातंत्र्याबद्दल मत ऐकायला मिळालेले नाही, त्यामुळे यांवर थोडे सवडीने बोलतां येईल.
ज्याला जे जमू शकते ते तो करतो, हे स्वाभाविक आहे. तोडफोड करणे हे तुलनेने सोपे आहे तर निर्मीती करणे ही कठीण प्रक्रिया आहे. एखाद्यास निर्मीती करता येत नसली तरी तोडफोड मात्र नक्कीच करता येईल. निर्मीती करतांना निर्मिती करणाऱ्याने ठरविले पाहिजे की ही निर्मिती स्वांतसुखाय आहे का समाजासाठी आहे. स्वांतसुखाय असेल, समाजाला काही कळणार नसेल व समाजावर त्याचा काही परिणाम होणार नसेल तर ठीक आहे. मग तुमची ही विकृती जरी असली तरी ती निर्मीती त्याच्यापुरतीच मर्यादित रहाते, पण ही विकृती जर सर्व समाजाच्या संपर्कात येणार असेल तर मात्र मग त्याचे भलेबुरे परिणाम तपासावे लागतात ! समाज म्हणजे समाजरक्षणाचा वसा घेतला आहे हे समजत असलेले लोक ! त्यांच्या प्रतिक्रिया या त्यांना विषय समजल्यावर लगेच येतात. अपेक्षा ही असते की त्यांचे वर्तन संपूर्ण समाजाचा विचार करून व्हावे. त्यांची समज ही शब्दच्छलाच्या तत्वज्ञानावर नसते तर समाजमानस लक्षात घेवून आलेल्या अनुभवावर असते.
समाजाने मान्य केलेल्या तत्वाच्याविरूद्ध जर कोणी निर्मिती करत असेल तर ते समाज सहसा सहन करत नाही. येथे हेच झाले भारतीय संस्कृतीत मानाचे स्थान असलेली राणी पद्मावतीबाबत असे काही सहन करण्याची तेथील जनतेची मानसिकता दिसत नाही व इतरत्रही तशीच प्रतिक्रिया उमटली.
ज्या व्यक्ती आता हयात नाहीत त्यांच्या साहित्यनिर्मितीबद्दलही आपण किती दक्ष असतो हे गत पिढीचे साहित्यिक राम गणेश गडकरींबाबत आपण दाखवून दिले. येथे तर निर्मिती करणारा तुमच्यासमोर आहे. हे बरोबर की त्याच्या यापूर्वीच्या बाजीराव पेशव्यांच्या चित्रपटाबद्दल आपण महाराष्ट्राने ही भूमिका घेतली नाही. महाराष्ट्राने घेतली नाही म्हणून राजस्थान घेणार नाही हा अंदाज चुकला असावा.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नांवाखाली विकृत निर्मिती करून तिचे समाजसादरीकरण करून आपल्याला धंदा करायचा असतो. संरक्षण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे घ्यायचे आणि समाजहिताच्या विरूद्ध काम करायचे हे बरोबर नाही. आपल्याला मिळणारे हक्क व स्वातंत्र्य हे निरंकुश, अनिर्बंध व इतरांच्या हक्क आणि अधिकारांचा संकोच करणारे नसावेत तसेच समाजहिताला व शांतता, सुव्यवस्थेला धोका पोहोचविणारे नसावेत हे त्या मागील मूळ तत्व आहे.

२९ जानेवारी २०१७

No comments:

Post a Comment