Friday, June 2, 2017

लोभी वृत्ती

लोभी वृत्ती

या संबंधाने लिहायचे नव्हते पण गेले चार-पाच दिवस हा विषय मनांत अधूनमधून डोके काढतो आणि थोडी मनस्थिती बिघडते, मी अस्वस्थ होतो. माणसाची पैशाबद्दलची भावना कशी असते, तो कसा वागू शकतो, कुठपर्यंत जावू शकतो, समोरच्याचे दु:ख वगैरे काही जाणत नाही. हे फक्त गरिबांचे बाबतीत असते असे नाही तर श्रीमंतांचे बाबतीतही असते. आपले प्रत्येकाचे स्वत:चेही अनुभव असतातच ना ?
एकदा का माणूस पैशासाठी भुकेला झाला की मग 'बुभुक्षित: किं न करोति पापम् ?' यानुसार भलाबुऱ्या, सत्यासत्य या मार्गांकडे न पहाता कृती केली जाते. आजपावेतोच्या बऱ्याच झालेल्या प्रगतीने माणसांची, नात्यागोत्यांची ओळख ठेवणे, आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवणे हे मागासलेपण समजले जाते की काय ? ओळख ही पैशाचीच आणि दुसऱ्यांच्या कर्तव्याचीच, आपल्या नाही ! याव्यतिरिक्त केले तर आजच्या कालौघात तो मागे पडतो की काय ? पडत असावा ! असे वाटू लागले आहे.
एका स्त्रीचा पती दुर्दैवी अपघातात वारला. कुटुंब सैरभैर झाले. त्याच्या वारसांनी म्हणजे त्याची विधवा पत्नी, मुले आणि आई यांनी नुकसानभरपाईसाठी न्यायालयात दावा केला. दावा मंजूर केला. मात्र विमाकंपनी उच्च न्यायालयात त्या निर्णयाविरूद्ध काही कायदेशीर मुद्यांवर आली. तिने खालच्या निर्णयावर स्थगिती मागीतली. उच्च न्यायालयाने खालील न्यायालयाचे आदेशाप्रमाणे सर्वप्रथम सर्व रक्कम तेथे न्यायालयात भरण्यास सांगीतले आणि या अटीवर स्थगिती दिली. विमाकंपनीने सर्व रक्कम भरली, खालील न्यायालयाचा आदेश स्थगित झाला.
अपघातात मृत्यु पावलेल्यांचे वारस उच्च न्यायालयात हजर झाले. त्यांनी सर्व भरलेली रक्कम त्यांना मिळावी हा अर्ज दिला, कारण मूळ अपील चालण्यास बराच वेळ लागेल तो पावेतो यांना काहीही न मिळणे हा अन्याय होईल वगैरे या मुद्याचा विचार करून न्यायालयाने काही रक्कम ही अर्जदारांना देण्याचा आदेश दिला व बाकी रक्कम राष्ट्रीयकृत बॅंकेत ठेवली की पक्षकारांचे नुकसान व्हायला नको. त्यांना नंतर व्याजासहीत रक्कम मिळेल. हे सर्व कायद्याला धरून झाले.
नंतर मी सर्वांना आदेशानुसार पैसे न्यायालयातून काढून घेण्यासाठी बोलावले. कार्यालयीन कागदपत्रांची पूर्तता करण्यास माझ्या कारकुनास सांगीतले. ओळख म्हणून माझ्या स्वाक्षरीच्या वेळी मी येईन, असे सांगून मी माझ्या इतर महत्त्वाच्या कामांसाठी निघून गेलो. मात्र यापूर्वीच त्या वारसांपैकी, म्हणजे जो अपघातात मृत झाला होता त्याची आई वृद्धापकाळाने वारली. याची मला कल्पना नव्हती, ती त्यांनी आल्यावर नंतर फोनवर दिली.
त्या पक्षकारांची आणि माझी त्या दिवशी सुरूवातीला प्रत्यक्ष भेट झाली नाही पण बोलणे झाले. त्यांनी हे सांगीतल्यावर म्हटले - 'काही हरकत नाही. बाकीच्यांना रक्कम मिळेल. मयत आईच्या हिश्श्याची रक्कम कोणालाही आज मिळणार नाही. आपण त्यांवर नंतर आदेश घेवू. मात्र तुम्ही परत जावू नका. त्याची गरज नाही. निष्कारणच फेऱ्या मारू नका. आज जेवढे काम होईल ते करू.'
दुपारनंतर जेवणाची सुटी झाली. मला त्या बाईचा दीर भेटला. मी विचारले - 'बाकीची मंडळी कुठे आहे, त्यांचे चेक आज मिळतील, ते घेवून जा.'
हे सांगीतल्यावर तो म्हणाला, 'ती सर्व रक्कम एकत्रितच द्या. मी मृत्युचा दाखला व वारस दाखला आणला आहे.'
'ते ठीक आहे, पण ही रक्कम त्यांना तर आज मिळेल, यासाठी कदाचित थोडा वेळ लागेल.' या माझ्या वाक्यावर, 'ते परत गेले. काही उपयोग होणार नाही, असे समजले. मग काय करतील थांबून ?' त्याचे त्याचे उत्तर !
मी संतापलो - 'तुम्हाला उपयोग होणार नाही, परत जा. हे कोणी सांगीतले ? हा हायकोर्टाच्याही वरचा आदेश देणारा हा कोण शहाणा आहे ?'
हे पाहिल्यावर - 'काय माहीत, त्यांच्या सोबत कोणी माणूस होता त्याने सांगीतले की मी रोजच येतो. तुमचे काम होत नाही. ते मग परत गेले.' तो गोरामोरा झाला.
मी - 'हा कोण माणूस होता, हे तुम्हाला माहिती नाही का ?' विचारले.
'नाही, ते तिकडून आले मी इकडून आलो.' हे त्याचे उत्तर !
माझ्या लक्षात जे यायचे ते आले. 'तुम्ही त्यांना फोन लावा. बोलावून घ्या.' मी सांगीतले. बराच वेळ तो मोबाईलवरून फोन लावत होता. शेवटी 'उचलत नाही.' असे सांगीतले. 'मला नंबर द्या. मी लावतो.' हे सांगीतल्यावर त्याने पुन्हा लावला. सुदैवाने, त्याच्या का माझ्या कोणास ठावूक, पण लागला. तो बोलला आणि मला सांगीतले ते पन्नास किलोमीटर पुढे निघून गेले आहे. मी बोलतो असे सांगीतले. तोपर्यंत फोन बंद झाल्याचे सांगून त्याने मोबाईल माझ्या हातात दिला. आता बोलण्यात किंवा संतापण्यात काही अर्थ नव्हता. मी त्याने आणलेला मृत्युचा दाखला व वारस दाखला घेतला. 'यापुढे परस्पर डोके चालवत जावू नका. एखादे वेळी भलत्याच भावात जाल हे सांगीतले. हे मी तयार करतो. त्यासाठी ॲफिडेव्हीट करावे लागेल.' आणि पुढच्या आठवड्यात फोन करा म्हणून सांगीतले. 'तुम्ही सांगा, मी येईन.' त्याने उत्साहाने सांगीतले. 'तुम्हाला इतर वारसांना रक्कम हवी असेल तर मी नांवे लावतो नाहीतर फक्त मृत झाल्याचे कळवतो व रक्कमेचा हिस्सा यांनाच मिळावा म्हणून न्यायालयात सांगतो. 'नाही साहेब, तुम्ही केव्हाही बोलवा, मी येईन.' तो म्हणाला आणि नंतर गेला.
पतीच्या मृत्युमुळे त्याच्या विधवा पत्नीस व मुलांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेची ही अवस्था काय दाखवते ?

२३ जानेवारी २०१७

No comments:

Post a Comment