Saturday, June 3, 2017

अशाच आठवणी

अशाच आठवणी

माझ्या सुदैवाने लहानपणापासून, अगदी संगीत म्हणजे काय याची अजिबात जाण नसल्यापासून, आमच्या घरी म्हणजे माझ्या शहरवजा खेड्यात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत माझ्या कानावर पडत आलेले आहे. ती माझ्या आईची कृपा ! मी शास्त्रीय गायन शिकलेलो नाही पण मला जे काही थोडेबहुत रागज्ञान, स्वरज्ञान आहे ही मला मिळालेली माझ्या आईची देणगी !
माझी आई ही नेहमी अभिमानाने सांगते की 'ती आजची नाही, १९५४ सालातील संगीत विशारद आहे' आणि तिची ही परिक्षा डॉ. वसंतराव राजोपाध्ये यांनी घेतली ! त्यावेळी तिला मिळालेली शाबासकी तिला जशी सुखवून गेली तशी तिचे गुरु, जळगांव येथील कै. गोविंदराव कुलकर्णी यांना पण आनंदीत करून गेल्याची आठवण ती आजही सांगते आणि आपल्याला त्या काळात घेवून जाते. तिचे गुरू कै. गोविंदराव कुलकर्णी यांनी ग्वाल्हेर येथे शंकर संगीत विद्यालयात पं कृष्णराव पंडीतांकडे शिकलेले. प्रख्यात गायक पं. एल्. के. उपाख्य लक्ष्मणराव पंडीत हे त्यांचे गुरूबंधू ! पंडीतजी हे यांना वडिलबंधू मानत एवढा त्यांचा स्नेह ! माझी आई आकाशवाणीची शास्त्रीय संगीताची मान्यताप्राप्त कलाकार होण्याची प्राथमिक परिक्षा दोन वेळी उत्तीर्ण होवूनही, घरगुती कारणांमुळे तिला अंतीम चाचणी परिक्षेला जाता आले नाही, ही तिच्या मनातील वेदना अजून कमी झाली नाही. अलिकडे जळगांव आकाशवाणी केंद्राने तिच्या घेतलेल्या मुलाखतीत देखील इतक्या वर्षांनंतर तो सल जाणवला, इतका तो खोलवर होता किंबहुना आहे.
मी घरातील मोठा, स्वाभाविकच मी गाणे शिकावी ही तिची इच्छा ! पण माझ्या गाणे शिकण्यातील उदासीनता, का मला मिळालेली 'आवाजाची देणगी' कोणास ठावूक पण मी गाणे भरपूर ऐकले, मात्र शिकू शकलो नाही. मग शोध लागला असावा, की माझी तालाची समजही बऱ्यापैकी आहे ! बोलून चालून जन्मजात मिळालेली देणगी असावी. मग मला आमच्या गांवातील श्री. नंदकुमार बालाजीवाले यांच्याकडे तबला शिकायला पाठविले, तिथे काही काळ शिकत होतो. त्यानंतर शिक्षणानिमीत्तीने जळगांव येथे आलो. मग जळगांव येथील बबनराव भावसार यांच्याकडे मी तबला शिकू लागलो. त्यांनी मला भरपूर दिले, हातचे राखून न ठेवता दिले, मनापासून दिले.
माझी यांतील प्रगती बऱ्यापैकी असावी कारण पहिल्या वर्षीच मी शिकत असतांना 'मध्यमा प्रथम' ही परिक्षा दिली, उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालो. तसाच १९८२ला विशारदही झालो. त्या काळात दोन वेळा आकाशवाणी जळगांव येथे नवोदीत कलाकार म्हणून 'युवावाणी' यांत कार्यक्रम झालेत. त्या काळातील तेथील कलाकार मंडळींचा, श्री. विनायक फाटक, श्री. जयंत नाईक या तेथील तबलावादक यांच्याशी परिचयही झाला. श्री. रविंद्र खासनीस हे त्याच काळातील ! माझे या क्षेत्रांत नांव चांगले होवू शकते, असा देखील सल्ला मिळाला.
देवाच्या मनांत वेगळेच होते असे म्हणा किंवा दैव वेगळांच विचार करत होते असे म्हणा ! तंतकाराच्या साथीला मी बसावे अशी अपेक्षा माझ्या गुरूला करायला लावणारा मी; मुंबई, पुणे आणि जळगांव येथे असंख्य शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमास जाणारा मी, गेल्या निदान वीस वर्षे हातात सहज म्हणूनही तबला घेवू शकलेला नाही.
हाती कला असावी हे ठीक पण सदासर्वकाळ आपल्या मनाप्रमाणेच होईल असे नसते. आपण ठरवितो काही आणि त्या परमेश्वराने वेगळेच ठरविलेले असते. विजय आपला नाही तर देवाचाच होतो ! फक्त देवाचे आणि आपले ठरविलेले हे जर एकच असेल तर तो आपला विजय आहे असे आपण मानतो व विजयोत्सव साजरा करतो.

१३ ऑक्टोबर २०१६

No comments:

Post a Comment