Saturday, June 3, 2017

तिलककामोद

तिलककामोद 

आज सकाळी औरंगाबाद आकाशवाणी केंद्रावर 'उंबरठा' या चित्रपटातील 'कवी वसंत बापट' यांचे 'पं. हृदयनाथ मंगेशकर' यांनी संगीतबध्द केलेले आणि 'लता मंगेशकर' यांनी गायलेले 'गगन सदन तेजोमय' हे अप्रतिम गीत लागलेले होते. हे गीत बऱ्याच वेळा 'भक्तीगीत' म्हणूनही लावतात. परमेश्वराचे इतक्या आर्ततेने हृदयापासून केलेलं ध्यान खरच मनाला समाधान देवून जाते आणि शांतता देते, मनाला एक आधार मिळतो. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची महती मी काय सांगणार ? मनाला उभारी देणारे हे दिव्य संगीत आम्ही पिढ्यानपिढ्या सांभाळत आलेलो आहोत.
हे गीत 'तिलक कामोद' रागातील आहे. 'षाडव-संपूर्ण' असलेला हा राग 'खमाज' थाटातील आहे. लहानपणी घरी माझी आई विद्यार्थ्यांना शिकवत असतांना, त्या रागाची ही जी अप्रतिम 'पकड' आहे - 'प नी सा रे ग सा रे ग सा' ही म्हटली की उस्फुर्तपणे 'अब सुनो हे नाथ' ही 'चीज' गळ्यातून बाहेर पडे. आजही हे स्वर ऐकले की ती शिकवणी आठवते आणि 'अब सुनो हे नाथ' कानांत घुमते !
आपल्या मराठी भाषेतील 'सं. स्वयंवर' या नाटकातील 'नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर' यांचे 'पं. भास्करबुवा बखले' यांनी संगीतसाज चढविलेले नाट्यगीत 'मम सुखाची ठेव' हे याच रागातील ! वि. सी. गुर्जर यांचे बालगंधर्व यांनी गायलेले 'नंदकुमार' या नाटकातील 'दहन खर हृदया' हे मा. कृष्णराव यांनी संगीत दिलेले पदही सुंदर आहे ! तसेच 'तुरले मानस उदास' हे पं. राम मराठे यांनी गायलेले 'संत कान्होपात्रा' या नाटकातील मा. कृष्णराव यांनी संगीत दिलेले पदही सुंदर आहे. 'रवि मी चंद्र कसा मग' हे नाट्याचार्य कृ. प्र. खाडीलकर' यांचे सं. मानापमान या नाटकातील 'गोविंदराव टेंबे यांनी स्वरात सुंदर बांधलेले आणि अत्यंत गाजलेले नाट्यपद आपण कसे विसरणार ?
हिंदी चित्रपट संगीतातील 'गोदान' या चित्रपटातील 'पं. रविशंकर' यांनी संगीत दिलेले आणि 'हिया जरत रहत दिन रैन' हे 'दीपचंदी' तालातील 'तिलक कामोद' रागातील सुंदर गीत आवर्जून ऐकावेसे वाटते.
मात्र हा विषय मला ज्या गाण्यावरून आठवला ते हे 'उंबरठा' चित्रपटातील गीत -
गगन, सदन तेजोमय
तिमिर हरून करुणाकर
दे प्रकाश, देई अभय
छाया तव, माया तव
हेच परम पुण्यधाम
वार्‍यातून, तार्‍यांतुन
वाचले तुझेच नाम
जगजीवन, जनन-मरण
हे तुझेच रूप सदय
वासंतिक कुसुमांतून
तूच मधुर हासतोस
मेघांच्या धारांतुन
प्रेमरूप भासतोस
कधि येशील चपलचरण
वाहिले तुलाच हृदय
भवमोचन हे लोचन
तुजसाठी दोन दिवे
कंठातील स्वर मंजुळ
भावमधुर गीत नवे
सकलशरण, मनमोहन
सृजन तूच, तूच विलय

७ मे २०१६

No comments:

Post a Comment